आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिबट्याचा हल्ला परतवून लावत मजुराने केली स्वत:ची सुटका...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - डरकाळी फोडत आलेल्या बिबट्याने काही कळायच्या आतच द्राक्ष बागेच्या कुंपणावरून थेट अंगावर झेप घेतली. बिबट्या मानगूट पकडणार तोच शेतात पाणी भरणाऱ्या मजुराने दोन्ही हातांच्या ताकदीने बिबट्याचा हल्ला परतवून लावत चपळाईने धूम ठोकल्याची घटना तालुक्यातील बेलू येथे घडली. या घटनेत दशरथ लासू चौधरी (३५) हे गंभीर जखमी झाले. सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडलेल्या या घटनेने बेलू शिवारात भीतीचे वातावरण आहे.     


बेलू शिवारात कडवा कालव्या शेजारी रामदास कचरू तुपे यांची द्राक्षबाग आहे. सोमवारी द्राक्ष बागेला शेतमजूर दशरथ लासू चौधरी (रा. वडोली, ता. कपराडा, जि. बलसाड) हे पाणी देत होते. याचवेळी कुंपणावरून बिबट्याने डरकाळी फोडत चौधरी यांच्या अंगावर झेप घेतली. बिबट्याच्या जबड्यात दशरथ यांची मान जाणार तोच त्यांनी प्रसंगावधान राखत व हिंमत एकवटून बिबट्याचे पुढील दोन्ही पाय पकडून बाजूला ढकलल्याने बिबट्या जमिनीवर कोसळला. या वेळी दशरथ यांच्या डाव्या खांद्याला व उजव्या हाताला बिबट्याच्या पंजाने गंभीर जखमा झाल्या. हल्ला परतवून लावत चपळाईने दशरथ यांनी घटनास्थळाहून पळ काढला.  त्यानंतर बिबट्या तेथून पळून गेल्याचे त्याने सांगितले.

बातम्या आणखी आहेत...