आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिबट्याने तीन शेळ्या, वगारीचा पाडला फडशा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवना -  सिल्लोड तालुक्यातील शिवना येथील शिवारात शनिवारी (दि. २७) सकाळी सातच्या सुमारास बिबट्याने तीन शेळ्या फस्त करत एका म्हशीच्या वगारीचा फडशा पाडला. अजिंठा-बुलडाणा राज्य रस्त्यावरील खोल पाणंद शिवारात इंदासींनीआई माता मंदिरावजवळ ही घटना घडली.  

 
 वनपरिक्षेत्र अधिकारी एस. पी. मागदरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक व्ही. बी. सपकाळ यांनी पंचनामा केला. शिवाय परिसरातील शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले. शिवना शिवारातील ( गट क्र.२६८) दादाराव काळे व रवींद्र काळे यांच्या शेतात गोठ्यात बांधलेली जनावरे सकाळी चारा पाणी करून झाल्यावर बाहेर बांधली होती. नेहमीप्रमाणे दादाराव काळे म्हशीचे दूध घेऊन पहाटे साडेसहाच्या दरम्यान घरी निघून गेले. त्यानंतर सातच्या सुमारास बिबट्याने शेतात बांधलेल्या तीन शेळ्या फस्त करून एक वगारीचा फडशा पाडला.

 

परिसरातील शेतकऱ्यांच्या लक्षात अाल्यानंतर गजानन राऊत, भाऊसाहेब काळे, सुनील काळे, कौतिक काळे, भगवान राऊत, प्रमोद राऊत यांनी वन विभागाला ही माहिती दिली. मागदरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल बलांडे, व्ही. बी. सपकाळ यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यास मदत देण्याची मागणी केली जात आहे.  जंगलातील पाणीसाठे आटल्यामुळे वन्यप्राणी मानवी वस्तींकडे धाव घेत आहेत. त्यामुळे वनातील साठे पाण्याने भरण्याचीही आवश्यकता आहे. त्यामुळे प्राणी वस्तीकडे येणार नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे . 

 

खबरदारी घ्यावी   
परिसरातील शेतकऱ्यांनी रात्री अपरात्री एकटे फिरणे टाळावे, प्रथम दर्शनी हे बिबट्याच्याच पायाचे ठसे आहेत. आपापले पशुधन सुरक्षित राहावे म्हणून गोठे अधिक मजबूत करावेत. याशिवाय प्रत्येक शेतकऱ्यांनी बांधावर शेणाच्या गोवऱ्या जाळून त्यावर मिरचीची भुकटी टाकावी. जेणेकरून त्या वासाने बिबट्या शेतवस्तीकडे येणार नाही, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी एस. पी. मागदरेंनी दिली.  

 

बातम्या आणखी आहेत...