आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये घुसून बिबट्याने केली पाच चितळ, तीन काळवीट आणि चौसिंगाची शिकार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- येथील गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयातील रेस्क्यू सेंटरमध्ये (वन्यप्राणी बचाव केंद्र) शिरत एका बिबट्याने 5 चितळ, 3 काळवीट व एक चौसिंग्याला ठार केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. हा बिबट्या काटोल मार्गावर असलेल्या गोरेवाडा जंगलातून आल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे गोरेवाडा केंद्राला इलेक्ट्रॉनिक तारेचे कुंपण आहे. ते ओलांडून बिबट्याने सुमारे 15 फूट पिंजऱ्यात शिरून काळविटासह चौसिंग्याला ठार केल्यामुळे येथील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह लागले आहे.

 

यासंदर्भात गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाचे विभागीय वनाधिकारी नंदकिशोर काळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सुरक्षा व्यवस्थेत काही त्रुटी राहिल्याचे मान्य केले. नेमक्या काय त्रुटी राहिल्या त्याचा अभ्यास करून त्या दूर करण्यात येतील, असे काळे यांनी सांगितले.

 

तीन वर्षांपूर्वीही केली होती शिकार

डिसेंबर 2015 मध्ये गोरेवाडा प्राणी बचाव केंद्र स्थापन करण्यात आले. त्यानंतर चार महिन्यांनी एप्रिल 2016 मध्ये बिबट्याने आत प्रवेश करून तीन ब्लॅक बकची शिकार केली होती. त्यानंतर सुरक्षेचा उपाय म्हणून जानेवारी 2019 मध्ये इलेक्ट्रॉनिक फेन्सिंग करण्यात आले. मात्र, त्यानंतरही बिबट्याने आत प्रवेश करून हरिण मारली. कुंपणामध्ये कुठे फट राहिली की बिबट्याला कुंपणावरून आतमध्ये उडी मारता यावी अशी उंच जागा मिळाली, याचा तपास करू आणि त्रुटी दूर करू, असे काळे यांनी सांगितले. इलेक्ट्रॉनिक फेन्सिंग करताना एनटीसीएच्या अटींचे पालन करण्यात आले. कोणत्याही बाबीचे उल्लंघन करण्यात आले नाही, असे काळेंनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...