पाण्याच्या शोधात नागरीवस्तीकडे वळला बिबट्या, यावलच्या गाव शिवारातल मुक्त संचार; वन अधिकाऱ्यांची तारांबळ

दिव्य मराठी वेब टीम

Apr 03,2019 05:21:00 PM IST

यावल - तालुक्यातील भालशिव पिंप्रीसेकम या गाव शिवारात बिबट्या मुक्त संचार करताना दिसून आला आहे. रस्त्यावर फिरणाऱ्या या बिबट्याचे फोटो समोर येताच गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यासंदर्भातील माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने परिसरातील जंगल-मळ्यांत पाहणी केली. मात्र, संध्याकाळपर्यंत बिबट्या हाती आला नाही.


या संदर्भात वनविभाग पूर्वचे वनक्षेत्रपाल व्ही.एम. पाटील यांनी माहिती दिली, की पिंप्रीसेकम गाव शिवारात बिबटया दिसून आल्याची तक्रार फोनवरून मिळाली होती. यानंतर तत्काळ वरिष्ठ उप-वनसंरक्षक प्रकाश मोराणकर व सहाय्यक वनसंरक्षक आर.जे. राणे यांच्या नेतृत्वाखाली एस.आर. पाटील (गस्ती पथक), आर. बी. नोनवणे (वनपाल), रुबाब एस. तडवी (वनरक्षक), के.पी. शेळके (वनपाल), जी. बी. डोंगरे (वनपाल), आर. एस. काटे (वनपाल), जीवन नागरगोजे (वनपाल) आणि नंदुवंजारी यांचे पथक घटनास्थळी रवाना झाले.


संध्याकाळी 6 नंतर घरातच राहण्याच्या सूचना
वन विभागाला अद्याप या बिबट्याचा पत्ता लागलेला नाही. तरीही पायाचे ठसे पाहिले असता बिबट्या अडीच वर्षांचा पूर्णपणे विकसित बिबट्या असावा असे सांगितले जात आहे. यानंतर प्रशासनाने ग्रामस्थांना संध्याकाळी 6 ते सकाळी 6 वाजेपर्यंत कुणीही घराबाहेर पडू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत. सोबतच, कुठलेही काम असल्यास लहान मुलांना बाहेर न पाठवणे आणि एकटे न फिरण्याचे देखील सांगण्यात आले आहे. व्ही.एम. पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे, हाच बिबट्या गेल्या आठवड्यात सुकदेव भोलाणे जंगलात दिसून आला होता. त्याने एका वन विभागाच्या कर्मचाऱ्याला जखमी देखील केले होते. हा बिबट्या यावल शहरापासून 6 किमी दूर पिंप्रीसेकम हडकाई नदीच्या खोऱ्यात लपला असावा असे संकेत आहेत. सोबतच, तो दुसऱ्या गावात तर पळाला नसेल ना? याचा देखील शोध घेतला जात आहे.

X
COMMENT