आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एन-१ मध्ये बंगल्याच्या सीसीटीव्हीत पहाटे ३.५७ ला दिसला होता बिबट्या

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संजय चिंचोले 

औरंगाबाद - सिडको एन-१ भागातील काळा गणपती मंदिराच्या मागील बाजूस मंगळवारी पहाटे शिरलेल्या बिबट्याने एकच धुमाकूळ उडवून दिला. साडेनऊ तासांनंतर त्याला जेरबंद करण्यात आले. हा बिबट्या सोयगाव येथील जंगलातील असावा. शिकारीच्या शोधात तो शहराजवळ आला. चिकलठाणा एमआयडीसीतील बंद कंपन्यांच्या आवारातील झुडपांमुळे तो थेट सिडकोत आला असावा, असा कयास वन खात्याचे अधिकारी लावत आहेत. दरम्यान, एन-१ येथील रहिवासी, वास्तुविशारद शरद हिवर्डे यांच्या बंगल्यातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये ३ डिसेंबर रोजी पहाटे ३.५७ मिनिटांनी बिबट्या दिसत आहे. 

सोयगावच्या जंगलातून बिबट्या इतक्या सहजपणे दाट नागरी वस्ती असलेल्या सिडको एन-१ मध्ये कसा शिरला याबद्दल चर्चा सुरू आहे. यासंदर्भात वन अधिकारी प्रकाश भगत म्हणाले की, सहज शिकार मिळावी म्हणून बिबट्या गावांजवळच भटकत असतो. खेड्यांमध्ये बांधून ठेवलेली वासरे, गायी, डुकरे आणि भटके कुत्रे हे त्याचे आवडते खाद्य आहे. तो सहसा दिवसा उसामध्ये लपतो आणि सायंकाळ होताच बाहेर पडतो. सध्या फुलंब्री, पळशी, आडगाव, वडखा, गोपाळपूर, नारेगाव, पिसादेवी, पोखरी आदी भागात उसाचे क्षेत्र बऱ्यापैकी आहे. शिवाय तिकडे डोंगर आणि झाडेझुडपेही आहेत. त्यामुळे तो सोयगावच्या जंगलातून थेट पिसादेवीपर्यंत आला. नारेगाव येथे हाॅटेलचालक उघड्यावर मास टाकतात. त्यावर ताव मारण्यासाठी कुत्रे असतात. त्यामुळे बिबट्या तेथे पोहोचला आणि चिकलठाणा एमआयडीसीतील कंपन्यांच्या आवारातून चालत सिडको एन-१ भागात शिरला असे दिसते.
दरम्यान बिबट्याला सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास गौताळ्यात सोडण्यात आले. या वेळी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, तहसीलदार संजय वारकड, वनक्षेत्रपाल अधिकारी राहुल शेळके, शशि तांबे, नायब तहसीलदार हारून शेख, तलाठी विकास वाघ व वन कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.बातम्या आणखी आहेत...