आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Less Work For Police With High Blood Pressure; Nagpur Police Decision: 24 Policemen Were Died In The Year Due To Poor Health

उच्च रक्तदाब असलेल्या पोलिसांना कमी काम; नागपूर पोलिसांचा निर्णय, तब्येतीच्या हेळसांडीमुळे वर्षभरात २४ पोलिसांचा मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संग्रहित छायाचित्र - Divya Marathi
संग्रहित छायाचित्र
  • उपराजधानी नागपूरमध्ये गुन्हेगारीत मोठी घट

नागपूर- गुन्ह्यांचे वाढते प्रमाण व त्यामुळे येणारा ताणतणाव, प्रकृतीची होणारी हेळसांड यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांचे ह्रदयविकार, उच्च रक्तदाब व अन्य आजारांनी मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत अाहे. उपराजधानी नागपुरात मावळत्या वर्षात तब्बल २४ कर्मचारी यामुळे  दगावले असून ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन अशा आजारांनी ग्रस्त कर्मचाऱ्यांची वेगळी वर्गवारी तयार करून त्यांच्याकडे कमी जोखमीची कामे सोपवण्याचा महत्त्वाचा निर्णय नागपूर शहर पोलिसांनी घेतला आहे. 
नागपूर पोलिस दलाच्या २०२० च्या प्राथमिकतांमध्ये पोलिस कर्मचाऱ्यांच्या प्रकृतीकडे गांभीर्याने लक्ष पुरवले जाणार असून कर्मचाऱ्यांचे अशा पद्धतीने होणारे मृत्यू टाळण्याच्या प्रयत्न होतील, अशी ग्वाही नागपूरचे पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी दिली. २०१९ या वर्षात नागपूर शहर पोलिस दलातील तब्बल २४ कर्मचारी गंभीर आजारांपायी दगावले आहेत. काही कर्मचाऱ्यांचा ड्यूटीवर असतानाच प्रकृती बिघडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यावर आम्ही गंभीर उपाययोजना करत आहोत, अशी माहिती डॉ. उपाध्याय यांनी दिली. यासाठी पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कठोर आरोग्य तपासणी राबवली जाणार आहे. तपासणीतील निष्कर्ष लक्षात घेऊन कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अ, ब आणि क असे वर्गीकरण केले जाणार आहे. यात हृदयविकार, उच्च रक्तदाब, गंभीर मधुमेह व अन्य गंभीर आजार असलेल्या कर्मचाऱ्यांना क वर्गवारीत ठेवले जाणार असून त्यांंना कमी जोखमीची जबाबदारी दिली जाणार आहे. ब वर्गवारीत त्या खालोखाल आजार असलेल्या कर्मचाऱ्यांना टाकले जाणार आहे. अ वर्गवारीत आढळून येणाऱ्या संपूर्णपणे फिट कर्मचाऱ्यांना जोखमीची तसेच दगदगीची कामे सोपवली जाणार आहेत. पोलिस ठाणे आणि शाखानिहाय वर्गवारीनुसार कर्मचाऱ्यांच्या याद्या लावल्या जाणार असल्याचे डॉ. उपाध्याय यांनी सांगितले. गंभीर आजार असलेल्या कर्मचाऱ्यांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे कौन्सिलिंग करून त्यांनी काय काळजी घ्यायची, याचे धडे दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.उपराजधानी नागपूरमध्ये गुन्हेगारीत मोठी घट

राजकीय वर्तुळात नागपूरचा उल्लेख क्राइम कॅपिटल असा केला जात असताना २०१९ या वर्षात नागपुरात गुन्ह्यांच्या प्रकरणांत ८५३ प्रकरणांची घट झाल्याचा दावा नागपूर पोलिसांनी केला आहे. खुनाच्या वाढलेल्या सहा घटना वगळता इतर सर्व गंभीर गुन्ह्यांमध्ये घट झाल्याचे पोलिस आयुक्त डॉ. उपाध्याय यांनी सांगितले. एमपीडीए, मकोका व इतर प्रतिबंधात्मक तरतुदींमधून सराईत गुन्हेगारांवर व्यापक प्रमाणात कारवाई झाल्याने गुन्ह्यांत घट झाल्याचे पोलिसांनी सांगितले. खुनाच्या घटनांमध्ये बहुतांश घटना घरगुती वा आपसातील वादातून घडलेल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले. शहरात लागलेल्या साडेतीन हजारांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळेही गुन्हेगारीवर अंकुश लागल्याचा पोलिसांचा दावा आहे.

बातम्या आणखी आहेत...