आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकृत रिक्षाचालकाला हिंमतबाज महिलेने शिकवला धडा; अश्लील हावभावामुळे अटक, परवाना रद्द अन‌् नाेकरीही गेली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - अश्लील हावभाव करणाऱ्या रिक्षाचालकाला एका उच्चशिक्षित महिलेने चांगलाच धडा शिकवला. या महिलेच्या तक्रारीवरून पाेलिसांनी रिक्षाचालकाला अटक करून त्याचा परवाना रद्द केला. इतकेच नव्हे तर त्याची रिक्षाही स्क्रॅप करण्याची शिफारस आरटीआेकडे केली आहे.

मंगळवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास नाशिकहून सातपूरकडे येणाऱ्या रिक्षात (एमएच १५ झेड १६९२) दाेन उच्चशिक्षित नाेकरदार महिला बसल्या हाेत्या. त्यापैकी एक महिला एबीबी सर्कलवर उतरली. दुसरी महिला रिक्षात एकटीच असल्याची संधी साधत चालकाने तिला कळेल या हेतूने अश्लील हावभाव केले. 

रिक्षाचालकाचा विकृतपणा महिलेच्या निदर्शनास आल्याने तिने प्रसंगावधान राखत रिक्षा सातपूर पाेलिस ठाण्याजवळ आली असता चालकाला थांबण्यास सांगितले. ‘माझे काम करून येते’ असे सांगत नाेकरदार महिलेने रिक्षाचा क्रमांक लक्षात ठेवला. ती महिला थेट पाेलिस ठाण्यात गेल्याचे पाहून रिक्षाचालकाने तेथून पळ काढला. पाेलिस ठाण्यात गेलेल्या महिलेने वरिष्ठ निरीक्षक विलास जाधव यांची भेट घेऊन रिक्षाचालकाचा विकृतपणा सांगितला. जाधव यांनी क्षणाचाही विलंब न करता रिक्षाचालकास घेऊन येण्याचे फर्मान साेडले; मात्र बाहेर रिक्षाचालकच नसल्याचे पाेलिस कर्मचाऱ्यांनी सांगितले. पाेलिसांनी तक्रारदार महिलेच्या सांगण्यावरून रीतसर फिर्याद नाेंदवून घेत कलम ५०९ अन्वये गुन्हा दाखल केला. महिलेने सांगितलेल्या क्रमांकावरून जाधव यांनी तत्काळ आरटीआे कार्यालयाशी संपर्क साधून रिक्षाची माहिती घेतली. त्याआधारे तपास केला असता रिक्षा शांताराम चिंधा आहेर याची असल्याची माहिती मिळाली. पाेलिसांनी त्याला ताब्यात घेऊन खात्री करण्यासाठी संबंधित तक्रारदार महिलेला आेळख पटवण्यासाठी व्हाॅट्सअॅपवर त्याचा फाेटाे पाठवला. महिलेने त्यास आेळखताच पाेलिसांनी त्याला त्वरित अटक केली. त्याची अधिक चाैकशी केली असता ताे रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करतानाच एका सिक्युरिटी एजन्सीकडे गार्डचे काम करत असल्याचेही समजले. तेथूनही त्याला कामावरून काढावे अशी शिफारस पाेलिसांनी केली आहे.


महिलांची सुरक्षितता महत्त्वाची 
असे कृत्य करणाऱ्याकडून भविष्यात एखादी अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. ताे काम करीत असलेल्या ठिकाणावरही महिला कर्मचारी असतात. त्यांची सुरक्षितताही महत्त्वाची असल्याने त्याला कामावर ठेवू नये असे पत्र दिले आहे .
- विलास जाधव, वरिष्ठ पाेलिस निरीक्षक, सातपूर