आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापापरी- कृषी विज्ञान केंद्र मोहोळ यांच्या वतीने "पोषण परसबाग व पोषण मूल्य आधारित शेती पद्धती प्रकल्प" व यूनिसेफ अंतर्गत प्रायोगिक तत्वावर 100 कुटुंबासमोर परसबाग निर्मिती करण्यात येणार आहे. त्यासाठी 20 जुलै रोजी भैरवनाथ मंदिरात महिलांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. निरोगी विष मुक्त अन्न व पालेभाज्या निर्मिती यातून होणार असल्याचे कृषी विज्ञान केंद्राचे अन्नशास्त्र विभागाचे विषय तज्ञ दिनेश क्षीरसागर यांनी दैनिक दिव्य मराठीला सांगितले.
महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांच्या सहयोगाने एम. एस. स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशन यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली युनिसेफ या संस्थेच्या अर्थसाहाय्याने “पोषण मूल्य आधारित शेती पद्धती” प्रकल्प राबवण्यात येत आहे. त्या अनुषंगाने सदर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. पुढील आठवड्यापासून प्रत्यक्षात या कामास सुरुवात करण्यात येईल.
ग्रामीण भागाचा विचार केला तर त्या ठिकाणचे सर्व लोक हे शेतीशी निगडीत आहे. परंतु, त्यांच्या कष्टाच्या मानाने आहारात पोषक घटकांची कमतरता अधिक आहे.लहान बालके व महिलांच्या बाबतीत हे प्रमाण दुप्पट आहे. त्यामुळे अनेक आरोग्य विषयक तक्रारी निर्माण झाल्याचे आढळून येत आहे शिवाय रासायनिक फवारण्यांच्या अती वापराने आरोग्यावर त्याचे विपरीत परिणाम दिसून येत आहेत. म्हणूनच सेंद्रिय पद्धतीने पोषण परसबाग संकल्पना ग्रामीण भागात रूजाल्यास आरोग्यदायी भाजीपाला शेतकरी कुटुंबास उपलब्ध होईल. हा उद्देश ठेवूनच कृषी विज्ञान केंद्रातर्फे सदर कार्यक्रम राबवण्यात आला.
या प्रकल्पासाठी पोखरापूर मधील 100 महिलांना 'परसबाग' का तयार करावी, त्याचे आपल्या शारिरीक आरोग्यासाठी फायदे कसे व कोणते आहेत, परसबागेत कोणत्या फळभाज्या व पालेभाज्या कशा पध्दतीने आखणी करून किती प्रमाणात लागवड करावी याचे मोठ्या डिजिटल स्क्रीन वर फोटोसहित संपूर्ण माहिती देण्यात आली.
संतुलित आहार, पोषण मुल्ये व त्याकरिता पोषण मूल्य आधारित शेती पद्धतीचे महत्त्व विषद केले. तसेच, पोषण मूल्य आधारित शेती पद्धतीचे फायदे, त्याकरिता जमिनीची निवड, आराखडा, हंगामानुसार पिकांची व बियाण्यांची निवड, लागवडीसाठी आवश्यक साधन सामग्री व व्यवस्थापन याविषयी सविस्तर माहिती दिली.
या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख तानाजी वळकुंटे, बचत गट सहयोगीनी नीलिमा गाडेकर , ज्ञानेश्वर तांदळे,नितिन बाग़ल, महिला आर्थिक विकास महामंडळ मोहोळ महेश वाघमोडे , समूह संघटक- हरिदास कारंडे , गावातील सर्व बचत गट अध्यक्ष, सचिव, 100 पेक्षा अधिक महिला कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.