आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाविकास आघाडीला द्या सत्तास्थापनेची संधी, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसचे राजभवनात पत्र

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सरकारकडे बहुमत नाही. ते बहुमत दाखवण्यास असमर्थ ठरल्यानंतर शिवसेना पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी व अन्य पक्षांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करू शकते. आमच्याकडे १६२ आमदारांचे संख्याबळ आहे, असे पत्र या तिन्ही पक्षांच्या वतीने साेमवारी राजभवनात देण्यात आले.

या पत्रावर तिन्ही प्रमुख पक्ष, तीन घटक पक्ष व ७ अपक्ष आमदारांच्या सह्या असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. साेमवारी राज्यपाल कोश्यारी हे मुंबईबाहेर होते. पण, राज्यपालांनी अनुमती दिल्यास त्यांच्यासमोर १६२ आमदारांची परेड करण्याची आमची तयारी असल्याचेही ते म्हणाले. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि आपण स्वत: राजभवनात राज्यपालांच्या सचिवांची भेट घेतली. त्यांना महाआघाडीच्या १६२ आमदारांचे पत्र सादर केले. त्यावर प्रत्येकाची स्वाक्षरी आहे, असे पाटील यांनी सांगितले.

राष्ट्रपती राजवट लागू नये म्हणून घेतली खबरदारी

- महाविकास आघाडी : शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पार्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि ७ अपक्ष अशा एकूण १६२ आमदारांच्या सह्या आहेत.
- फडणवीस-पवार सरकारचा विश्वासदर्शक ठरावावेळी पराभव झाल्यास राज्यपाल पुन्हा राष्ट्रपती राजवटीची किंवा विधानसभा निलंबित करण्याची शिफारस करू शकतात. त्यामुळे आपला दावा राहावा म्हणून महाविकास आघाडीने ही खबरदारी घेतली आहे.
- राज्यपालांना जय महाराष्ट्र : राज्यपाल यांना दिलेल्या पत्रात शिवसेनेला सरकार स्थापनेची संधी देण्याची विनंती केली आहे. तसेच राज्यपाल यांना पत्रात 'सस्नेह जय महाराष्ट्र' घालण्यात आला आहे. जयंत पाटील यांचे पद राष्ट्रवादीचे विधिमंडळ नेते असे नमूद केले आहे.