आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेधा पाटकरांचे सरदार पटेलांना पत्र; नोकरशहांना नर्मदा खोऱ्यातून हाकला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे -   अतिप्राचीन नर्मदा संस्कृती, खोऱ्यात वस्ती करून राहणाऱ्या आदिवासी समाजावर होणारी अतिक्रमणे तुम्हालाच दिसू शकतात. तुमच्या ‘पोलादी हातांनी’ येथील नोकरशहांच्या टोळ्या हुसकावून लावा, असे साकडे सामाजिक कार्यकर्त्या डॉ. मेधा पाटकरांनी वल्लभभाई पटेलांनाच घातले आहे.   


जगात सर्वात उंच असणाऱ्या वल्लभभाई पटेलांच्या पुतळ्याचे अनावरण बुधवारी गुजरातेत होत आहे. या पार्श्वभूमीवर पाटकर यांनी पटेल यांना पत्रातून भावना लिहिताना म्हटले की, सरदार...तुमचा उज्ज्वल वारसा दूरवर भिरकावून देत तुमचा १८२ मीटर उंचीचा जगातला सर्वात उंच पुतळा उभारला जातो आहे. आपला हा नवा अवतार कोणी बांधलाय याची कल्पना तुम्ही करू शकता? अनेक चिनी, स्थानिक आदिवासी व मजुरांनी रात्रंदिवस काम करून आदिवासींचे दैवत असलेल्या टेकडीवर पुतळा उभा केला आहे. या पुतळ्यासाठी वापरलेली जमीन कोणाची, हे नियोजन कोणाचे हे प्रश्न तुम्ही नक्की विचाराल. येथील जमीन, नदी, टेकडी हे सगळे आदिवासींचे आहे. पक्षपात आणि भ्रष्टाचारापासून दूर राहणारे कॅबिनेट मंत्री तुम्हाला हवे होते. परंतु, या पुतळ्याच्या बांधकामासाठी गरीब, फेरीवाले, छोट्या व्यापाऱ्यांचे शोषण करण्यात आले. तुमचा वारसा पणाला लागला आहे का सरदार? लाखो शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे कसे सहन करू शकतात?, असा प्रश्न पाटकर यांनी मोदींचे नाव न घेता विचारला आहे.  


आदिवासी रडत आहेत :  पुतळ्याच्या उंचीचा आनंद काही जण साजरा करत असताना आदिवासी मात्र जयजयकार करण्याच्या स्थितीत नाहीत. ते उत्सव नव्हे, तर शोक करत आहेत. ते निषेध करत आहेत. कारण या पुतळ्यामुळे त्यांची नदी, त्यांच्या देवदेवताच नव्हे तर त्यांची संस्कृतीच धोक्यात आली आहे, असे त्यांनी म्हटले. 

 

सरदार...लाज वाटते की, स्थानिकांना वगळून पुतळ्यासाठी चिनी कामगार आणले
सरदार तुम्हाला सांगायला लाज वाटते की आदिवासींना वगळून दीड हजार चिनी कामगारांना कामासाठी आणले. तुमचे नाव वापरून कोणते आराखडे आखले गेले, कशाची प्रसिद्धी केली गेली हे सांगताना मी हादरून गेले...मॉल्स, हॉटेल्स, गेस्ट हाऊस, हेलिपॅड, फूड प्लाझा आदी नर्मदेच्या काठावर उभारले जात आहे. कैक वर्षांपासून तुमच्या नावे उभारलेल्या धरणामुळे ३५ हजारांपेक्षा जास्त विस्थापित झालेली कुटुंबे अजूनही पुनर्वसनासाठी झगडत असताना हे सगळे घडते आहे, अशी खंत पाटकर यांनी पटेलांच्या पुतळ्याकडे व्यक्त केली आहे. 

बातम्या आणखी आहेत...