मुख्यमंत्री नसतील तर / मुख्यमंत्री नसतील तर मीही नाही; सिटी बसच्या लोकार्पणाआधीच मनपा आयुक्तांचे महापौरांना पत्र

आयुक्त डॉ. निपुण विनायक म्हणाले,‘मुख्यमंत्री नसतील तर मीही नाही’ असा पवित्रा घेत कार्यक्रम पत्रिकेत माझे नावही टाकू नका.

Dec 22,2018 07:43:00 AM IST

औरंगाबाद- शंभर कोटींच्या रस्ते कामाचे भूमिपूजन, शहर बससेवा तसेच एसटीपी प्लँटचे लोकार्पण, खासगी संस्थेकडून कचरा संकलन कामांचा प्रारंभ २३ डिसेंबरला युवा सेना नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी २ दिवसांपूर्वी जाहीर केले. या कार्यक्रमासाठी आदित्य यांची तारीख निश्चित केल्यावर महापौरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही निमंत्रण दिले. मात्र, त्यांनी स्पष्ट नकार देत ३ जानेवारीला येतो, असे स्पष्ट केले. यावरून भाजप-शिवसेनेत राजकीय वाद सुरू असतानाच मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी ‘मुख्यमंत्री नसतील तर मीही नाही’ असा पवित्रा घेत कार्यक्रम पत्रिकेत माझे नावही टाकू नका, असे बजावले.

मनपाच्या इतिहासात प्रथमच असे होत आहे. मात्र, महापौरांनी आदित्य यांच्या हस्ते नियोजित कार्यक्रम होतील, असे जाहीर केले. दरम्यान, भाजपने या कार्यक्रमास उपस्थित राहायचे की नाही, याबाबत निर्णय घेतलेला नाही. दुसरीकडे वाजत-गाजत येणाऱ्या ४ बस लोकार्पणानंतर किमान २ दिवस तशाच उभ्या राहणार आहेत. शंभर कोटीचे रस्ते, शहर बस सेवेचे श्रेय घेण्यावरून गेल्या आठ दिवसांपासून सेना-भाजप युतीत ओढाताण सुरू आहे. त्यात भूमिपूजन, लोकार्पण कोणाच्या हस्ते करायचे, या मुद्याची भर पडली. महापौरांनी पक्ष महत्वाचा मानत आधी आदित्य ठाकरे यांची तारीख निश्चित केली. त्यावर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतल्यावर बुधवारी (१९ डिसेंबर) मुख्यमंत्ऱ्यांना निमंत्रण दिले. पण आधी आदित्यला निमंत्रण दिल्याचे वृत्त भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आधीच कळवले असल्याने मुख्यमंत्र्यांनी ३ जानेवारीला येतो, असे म्हटले.

खर्चाच्या संचिकेवरही सही नाही :
२३ डिसेंबरच्या कार्यक्रमासाठी मंडप उभारणी, ध्वनी व्यवस्था आदींवरील खर्चाच्या फाईलवर २१ रोजी रात्री उशिरापर्यंत सही झालेली नव्हती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २२ पर्यंत सही झाली नाही तर कार्योत्तर मंजुरीचा पर्याय महापौरांनी ठेवला आहे.

कचरा संकलनाचेही तसेच :
खासगी संस्थेकडून कचरा संकलनाचे काम जानेवारीत सुरू होईल तेव्हा या कामासाठी लागणारी वाहने, साहित्य शहरात येईल. तरीही या सेवेचे उद्घाटन होत आहे. २३ डिसेंबरला ४ बसचे लोकार्पण होईल. पण फिटनेस चाचणी फेरी, आरटीओ पासिंगला वेळ लागणार असल्याने २५ किंवा २६ डिसेंबरला बस लोकांसाठी उपलब्ध होतील, असे आयुक्तांनी सांगितले.

आयुक्तांचे पत्र :
मुख्यमंत्र्यांविना होत असलेला हा कार्यक्रम पुढे अडचणीचा ठरू शकतो, असे लक्षात येताच आयुक्त विनायक यांनी २१ डिसेंबरला महापौरांना एक पत्र लिहून मुख्यमंत्र्यांच्याच हस्ते भूमिपूजन, लोकार्पण करणे योग्य राहील, असे म्हटले. कार्यक्रम पत्रिकेत माझे नाव टाकू नये, असेही आयुक्तांनी बजावले.

X