आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Letting Go Of The Complexity Of The Literature Article Bt Mukta Dabholkar

साहित्यातील साचलेपणाची कोंडी फुटू देत

एका वर्षापूर्वीलेखक: एन. रघुरामन
  • कॉपी लिंक

एका शाळेत मुलांना ‘माझे मामा’ या विषयावर निबंध लिहायला सांगितला होता. तर एका मुलाने लिहिले की, माझे मामा आले. ते खूप प्यायले होते आणि गपगार पडून राहिले....असा निबंध आपण वर्गात स्वीकारू शकतो का?   नव्याने शिकू लागलेली सगळी माणसं लिहिती व्हावी, असं वाटत असेल तर जोपर्यंत आपण नव्या दिशा स्वीकारत नाही तोपर्यंत ही माणसं किंवा बायका तरी लिहित्या होतील का, असा प्रश्न मला पडतो. मग अशा वेळेला आपण जे यशस्वी झालेलं असेल, त्याची भ्रष्ट नक्कल करत असतो. उदा. ‘धरतीमातेने हिरवा शालू पांघरला होता’. ही एक उपमा आहे. पण मी जर माझ्या अनुभवांबद्दल लिहीत असेन तर कधी तरी मला हे समजतं की, उपमा ह्या एक साहित्यिक अलंकार असतात. मी एका दुसरीच्या मुलीच्या निबंधात वाचलं होतं. डोंगरातून सूर्य उगवतो म्हणजे सूर्य हे त्या डोंगराचं बाळ आहे आणि त्या आईने त्याला मांडीवर घेतलं आहे. म्हणजे ज्या मुलीने हे लिहिलं, तिला उपमा अलंकार माहितीदेखील नाही. कारण तिच्या अभिव्यक्तीला, तिच्या मतांना त्या वर्गखोलीत किंमत मिळाली होती, वाव मिळाला होता. त्यामुळे आपल्याला अशा प्रकारचं सकस साहित्य स्त्रियांमधून, मुलांमधून निर्माण करायचं असेल तर आपल्या प्रत्येकाच्या अभिव्यक्तीला इथल्या व्यवस्थेमध्ये पैस मिळाला पाहिजे. त्यासाठी आपण शाळा किंवा पालक म्हणून काय करू शकतो? तर ज्ञानरचनावाद स्वीकारू शकतो.  ज्ञानरचनावादात पूर्वज्ञान सक्रिय करणं, हा खूप मूलभूत टप्पा आहे. कोणतीही गोष्ट मुलांपर्यंत पोहोचवायची असेल तर म्हणजे उदा. नाझींच्या काळात जर्मनीमध्ये काय काय घडलं? हा इतिहासातला महत्त्वाचा दु:खद अध्याय तुम्हाला मुलांपर्यंत पोहोचवायचा आहे. दुसरं महायुद्ध इतिहासात अनेकदा येतं. मराठीत यासंदर्भात दोन पुस्तकं खूप प्रसिद्ध झाली आहेत. एक माधुरी पुरंदरेंनी लिहिलेलं ‘हॅनाची सुटकेस’ आणि मंगला निगुडकरांचा ‘डायरी ऑफ अॅन फ्रँक’चा अनुवाद. आपण मुलांना जर्मनीमध्ये झालेल्या ज्यूंच्या हत्या किंवा होलोकॉस्टविषयी सांगितलं तर ही दोन पुस्तकं वाचायला देऊ शकतो. त्यानंतर शिंडलर्स लिस्टसारखे सिनेमे दाखवू शकतो. ‘लाइफ इज ब्यूटिफुल’ या सिनेमात एक बाप आणि एक चार वर्षांचा मुलगा या दोघांना हिटलरच्या छळछावणीत ठेवलेलं असतं. त्या मुलाला या जगाचं एवढं भयानक रूप एवढ्या लवकर दिसू नये, म्हणून बापाने मुलाला सांगितलं असतं की, हा सगळा एक खेळ चाललाय. तू जर या खेळात हरला नाहीस तर तुला एक मोठा रणगाडा बक्षीस मिळणार आहे. तो बाप पूर्णवेळ त्या छळछावणीत असाच वागत राहतो की, जणू काही मी एक खेळ खेळतोय. त्या मुलाचा जीवन हे सुंदर आहे... यावरचा विश्वास उडू नये म्हणून तो अतोनात प्रयत्न करत असतो. अगदी नाझींचे लोक त्याला मारायला घेऊन जात असतात, तेव्हा तो हसत हसत मृत्यूच्या दारात जातो. असा सिनेमा आपण मुलांना दाखवला पाहिजे. आपल्याला ‘टाॅलरन्स’ या मूल्याबद्दल बोलायचंय, दाभोलकर-पानसरेंच्या हत्यांबद्दल बोलायचंय, या घटनांबद्दल मुलांनी अभिव्यक्त व्हावं असं वाटतंय तर मुलांनी अनेक अंगांनी जग बघावं, या दृष्टीनं प्रयत्न केला पाहिजे.  स्वत:देखील अभिव्यक्त व्हायचं असेल तर जगाला अनेक अंगांनी भिडावं लागतं. त्यानंतर आपली खरी प्रतिक्रिया उमटेल. माझी एक अमेरिकेतील बहिणीची मुलगी आहे. तिला अशा प्रकारचा इतिहास शिकवण्यात आला तेव्हा तिने एक गोष्ट लिहिली. तिने कल्पना केली की, एक मुलगी आहे, तिचे वडील डॉक्टर आहेत. ज्यू लोक त्या कुटुंबाला पकडून नेतात. वडील डॉक्टर असल्याने त्या मुलीने लहानपणापासून वडील कशा पद्धतीने उपचार करतात, हे पाहिलेले असते. ती ज्या छावणीत जाते, तिथे स्वत: डॉक्टर असल्यासारखी वागायला लागते आणि उपचार करू लागते. एका १२ वर्षंाच्या मुलीने ज्यूंचं होलोकॉस्ट शिकल्यानंतर त्यातून एक कल्पना काढून दीर्घ कादंबरी लिहिली. तुम्हाला लेखक घडवायचे असतील तर तुम्हाला कशा प्रकारचं शिक्षण द्यावं लागेल, हे यातून कळतं. आपण मुलांना कशा प्रकारचं एक्स्पोजर वर्गात देऊ इच्छितो, याचा सर्वांनी विचार करावा.   महिला म्हणून आपण स्वत:च्या आयुष्याकडे कोणत्या नजरेनं बघू इच्छितो, हेही पाहूयात. महिलांच्या आयुष्यात गेल्या काही दशकांमध्ये जो काही बदल घडलेला आहे, त्याचं समीक्षण आपण आपल्या साहित्यातून करू इच्छितो का? गेल्या काही वर्षांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात बचत गट निर्माण झाले, त्यावर जे अभ्यास झाले त्यातून दोन गोष्टी पुढे आल्या. एक म्हणजे बाईची पत वाढली पण त्यासोबतच बाईचे कष्टपण दुप्पट झाले. बाई बचत गटातून पैसे मिळवण्यासाठी अक्षरश: गुलामासारखी राबायला लागली. मग या गटांतील बायका लिहित्या झाल्यात का? त्यांनी त्यांचे अनुभव लिहिलेत का? महाराष्ट्रात ७३ व्या घटनादुरुस्तीनंतर लाखो बायका सरपंचपदावर आल्या. पण सत्तेवर आलेल्या बायकांनी त्यांचे अनुभव लिहिलेत का? मी सरपंच कशी झाले किंवा सरपंच म्हणून काम करताना मला काय काय प्रसंगांना सामोरं जावं लागलं, हे सगळे मोठ्या कादंबऱ्यांचे विषय आहेत. अर्थातच कादंबरी लिहिण्यासाठी दैनंदिन व्यवधानं बाजूला ठेवावी लागतात. कारण कादंबरीचा पैस खूप मोठा असतो. पण बाईचे जे आयाम बदलले आहेत. या सगळ्या गोष्टी जगणाऱ्या बायका कशा लिहित्या होतील, त्यांच्यासाठी लिहिण्याची दालनं कशी खुली होतील, हे बघायला लागेल. अशा प्रकारच्या महिला साहित्य संमेलनांमध्ये हे प्रयत्न झाले पाहिजेत.  त्यानंतर मी नव्या माध्यमांबद्दल बोलेन. मी जेव्हा पहिल्यांदा टिकटॉक हा प्रकार बघितला तेव्हा दिग्मूढ झाले. कोणाला या पद्धतीने का अभिव्यक्त व्हावं वाटतं, हा प्रश्न निर्माण झाला. पण टिकटॉक व्हिडिओ म्हणजे काही गाणी निवडायची, त्यावर स्वत: हावभाव करायचे आणि दोन-दोन मिनिटांचे स्वत:चे व्हिडिओ अपलोड करायचे. टीकटॉक व्हिडिओचे स्टार असतात, त्यांना काही कोटींच्या घरात फॉलोअर्स असतात. म्हणजे या समाजातला खूप मोठा वर्ग असा आहे, ज्याला टिकटॉक या माध्यमातून व्यक्त व्हावं वाटतं. किंवा गलीबॉय चित्रपटाचं उदाहरण घेऊ. पाश्चात्त्य देशांत जे अाफ्रिकन अमेरिकन आहेत, त्यांच्या दु:खाच्या अभिव्यक्तीसाठी रॅपिंग म्हणजे भरभर एकामागोमाग एक शब्द बोलायचे.. हे माध्यम वापरतात. मुंबई विद्यापीठात रॅपिंगचा एक अभ्यासक्रमही सुरू केला आहे. अभिव्यक्तीची अशी अनेक नवी माध्यमं येत आहेत. मग यातलं महिलांना सूट होईल, असं कोणतं माध्यम आहे, याचा मी विचार केला. मी फॅन फिक्शन या माध्यमाबद्दल वाचलं होतं. जॉन ग्रीन नावाच्या लेखकाचं एक तरुणांमध्ये प्रसिद्ध पुस्तक आहे. त्याच्या एका कादंबरीतील नायिका आहे. ती समजा एका टीव्ही सीरियलची फॅन असेल. तर त्यातील पात्रांच्या आयुष्याबद्दल ती समांतर असे फॅन फिक्शन लिहीत असते. अशी अनेक माणसं सोशल मीडियावर फॅन फिक्शन लिहीत असतात. मला वाटलं की कदाचित मराठी मालिकांमधील बायकांच्या आयुष्यावर आपल्या महिला फॅनफिक्शन लिहू शकतील का? आज लेखन हे इतक्या छोट्या गटात अडकलेलं आहे, मर्यादित प्रकारांमध्ये अडकलेलं आहे, ते फाॅर्म्स अनेकदा तरुण पिढी टॅपच करत नाही, तर असे कुठले फॉर्म असतील की जे या भिंती भेदून लाखो-करोडो लोकांपर्यंत आपल्याला घेऊन जाऊ शकतील, याचा विचार केला पाहिजे. तरच जास्तीत जास्त लोकं लिहिती होतील. समाजमाध्यमांच्या उद्रेकाचा वापर आपण प्रत्येकाच्या अभिव्यक्तीला वाव कसा मिळेल, यासाठी करता येईल.  सावित्रीबाईंबद्दलची अनेक भाषणं होतात. पण सावित्रीबाईंना शिकवायचं होतं म्हणून जोतिरावांनी वडिलांना सोडलं, हे फार वेळा सांगितलं जात नाही. आज एखाद्या पुरुषाने बायकोच्या शिक्षणासाठी घर सोडलं तर त्याची समाजात किती निर्भर्त्सना होईल?    महर्षी कर्वेंचं वाक्य मी लिहून ठेवलेलं आहे. ते म्हणतात, मी खूप बायकांना स्वत:च्या पायावर उभं करू शकलो, त्यांना उपजीविकेचं साधन मिळवून देऊ शकलो. पण त्यांच्यामध्ये उत्साह निर्माण करू नाही शकलो. हा उत्साह मुलींमध्ये निर्माण होण्यासाठी आपण काही करतो का? त्यांना त्यांचं आयुष्य सांगण्यासारखं आहे, असं वाटावं, हे काम ताराबाई शिंदेंनी केलं. ते केवळ अद्भुत आहे. शिक्षणाचं हे उद्दिष्ट असलं पाहिजे. शिक्षणातून महिलांच्या डोक्यात प्रश्न विचारण्याचा किडा सतत वळवळत ठेवला पाहिजे. तो जोपर्यंत वळवळता राहत नाही, तोपर्यंत सकस साहित्यनिर्मिती होऊ शकणार नाही, असं मला वाटतं.  आपल्यापैकी प्रत्येकीला हे समजलं पाहिजे की, आपण स्त्री म्हणून कसे घडवले गेलो? मी पुरोगामी कुटुंबात जन्मले तरीही मीसुद्धा एक स्त्री म्हणून घडवली गेली आहे. त्यामुळे प्रत्येकीनी आपल्या आयुष्याकडे वळून पाहताना हा विचार केला पाहिजे की, कोणत्या-कोणत्या भावना माझ्यामध्ये निर्माण केल्या गेल्या आहेत, याची मला जाण करून द्यावी लागेल. ती जाण जेव्हा निर्माण होईल, तेव्हा मला लिहिता येईल. मुलांच्या बाबतीत म्हणायचंं असेल तर त्यात साहित्य हा शाळेतल्या शिक्षणाचाही गाभा-घटक झालं पाहिजे. त्यामुळे एका बाजूला साहित्याप्रती लहान मुलांना घेऊन जाणं आणि दुसऱ्या बाजूला बायका लिहित्या व्हायच्या असतील तर त्यांना प्रश्न विचारायला उत्तेजन देणं, या दोन गोष्टी आपल्याला कराव्या लागतील.  शब्दांकन - मंजिरी काळवीट