आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​डेक्कन क्वीन व पंचवटी एक्स्प्रेसमधून फिरते ग्रंथालय वाचकांच्या भेटीला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनी रेल्वे विभाग अनोख्या पद्धतीने वाचन प्रेरणा दिन साजरा करणार आहे. यंदापासून रेल्वेत लायब्ररी ऑन व्हील्सची (फिरते ग्रंथालय) अभिनव संकल्पना सुरू करण्यात येत असून याचा शुभारंभ १५ ऑक्टोबरला होणार आहे. मध्य रेल्वेच्या डेक्कन क्वीन (पुणे-मुंबई-पुणे) आणि पंचवटी एक्स्प्रेस (मनमाड-मुंबई-मनमाड) या दोन गाड्यांत लायब्ररी ऑन व्हील्सची (फिरते ग्रंथालय) सुविधा दिली जाणार असल्याची माहिती मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी एका पत्रकाद्वारे दिली. 
तावडे म्हणाले, १५ ऑक्टोबरपासून या दोन्ही रेल्वेगाड्यांतून प्रवास करणाऱ्या मासिक पासधारकांसाठी आरक्षित डब्यांमध्ये राज्य मराठी विकास संस्थेने नेमलेले वाचनदूत प्रवाशांना नि:शुल्क वाचनसेवा देेतील. दरम्यान, राज्य मराठी विकास संस्थेच्या सहकार्याने आणि ग्रंथालय संचालनालयाच्या माध्यमातून राज्यातील 'अ' वर्गाच्या एकूण ३३४ ग्रंथालयांत वाचनध्यास (सलग वाचनाचा उपक्रम) उपक्रमाचे आयोजन केले आहे. या सर्व ग्रंथालयांमधील वाचक-सभासद सलग काही तास वाचनाचा आनंद घेणार आहेत. यांपैकी अनेक ग्रंथालयांतून डॉ. गो. ब. देगलूरकर, डॉ.अरुणाताई ढेरे, डॉ. गो. मा. पवार, कवी दासू वैद्य, नीलिमा बोरवणकर, श्याम भुरके, डॉ. विनय काळीकर, रझिया सुलताना, अमृत देशमुख, वैभव जोशी, लक्ष्मीकांत धोंड असे मान्यवर वाचकांशी संवाद साधतील, असेही तावडे यांनी सांगितले. 


"मला उमगलेले राम गणेश गडकरी, गदिमा, पुलं' कार्यक्रमाचेही आयोजन 
महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीने १५ ऑक्टोबर रोजी 'मला उमगलेले राम गणेश गडकरी, गदिमा व पुल' हा कार्यक्रम रवींद्र नाट्यमंदिरात आयोजित केला आहे. यात प्रवीण दवणे, अरुण म्हात्रे या कवींसह अनेक कलाकार सहभागी होत आहेत. हा कार्यक्रम विनाशुल्क पाहता येईल. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळातर्फे वाई व सातारा परिसरातील शाळा व महाविद्यालयांमध्ये विश्वकोश कसा वाचावा, या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. 


मंत्रालयीन कर्मचाऱ्यांसाठी सोमवारी १०.३० ते ५.३० या वेळेत वाचन तास 
राज्याच्या भाषा संचालनालयातर्फे वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात विविध प्रकाशनांच्या ग्रंथांचे प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे. मंत्रालयातील सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी १५ ऑक्टोबरला सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत 'वाचनतास' उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळेत प्रत्येकाने किमान एक तास मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात जाऊन आवडेल ते पुस्तक घेऊन वाचण्याचे आवाहन शासनाने केल्याची माहिती तावडे यांनी दिली. 

बातम्या आणखी आहेत...