आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- चंद्रावर पहिले पाऊल ठेवणारा मानव आणि अमेरिकेचा अंतराळवीर नील आर्मस्ट्राँगला मुंबई महापालिकेने बकरी ईदनिमित्त चक्क बकऱ्याची 'कुर्बानी' देण्याचा परवाना जारी केला आहे. यामुळे पालिकेचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला अाहे. दरम्यान, हा वाद मुंबई उच्च न्यायालयात पोहोचला असून न्यायालयाने परवाना पद्धतीला तात्पुरती स्थगिती दिली असून या पद्धतीमधील त्रुटी दूर करण्याचे आदेश दिले अाहेत.
पालिकेच्या देवनार पशुवधगृहामध्ये बकरी तसेच म्हैसवर्गीय प्राण्यांचा वध करण्यात येतो. बकरी ईदच्या काळात या वधगृहावर मोठा ताण असतो. म्हणून पालिका मुंबई महापालिका क्षेत्रातील इच्छितस्थळी बकऱ्यांचा धार्मिक वध करण्यास तात्पुरते परवाने देत असते. यंदा ही पद्धत प्रथमच आॅनलाइन करण्यात आली आहे. देवनार पशुवधगृहातील प्राण्यांचे वध थांबवण्यात यावेत, अशी जनहित याचिका (पीआयएल) जीव मैत्र ट्रस्टने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यावर गुरुवारी सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान मुंबई पालिकेने १० ते २४ आॅगस्ट या कालावधीत कुर्बानीसाठी दिलेल्या परवान्यातील अनागोंदी उघड झाली आहे.
ईदच्या कुर्बानीसाठी आल्या दोन लाख बकऱ्या
यंदा २२ ते २४ आॅगस्टदरम्यान बकरी ईद आहे. त्यासाठी देवनार पशुवधगृहात २ लाखांपेक्षा अधिक बकरे कुर्बानीच्या विक्रीसाठी आले आहेत. अनेक मुस्लिम बांधवांनी बकऱ्याची खरेदी केलेली आहे. देवनार पशुवधगृहात एका पाळीत केवळ ६ हजार बकऱ्यांची कुर्बानी शक्य आहे. मुस्लिम बांधवांना इच्छितस्थळी कुर्बानी देणे शक्य होण्यासाठी पालिकेची आॅनलाइन परवाना पद्धत लवकरात लवकरात सुरळीत होणे गरजेचे आहे.
नाव अंतराळवीराचे, पत्ता कोर्टरूमचा
ज्या व्यक्तींना पालिकेने बकऱ्याच्या कुर्बानीसाठी आॅनलाइन परवाने दिले आहेत, त्यात अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग व शाॅप बदर अशी दोन नावे आहेत. या दोघांचे पत्ते मुंबई उच्च न्यायालयाच्या कोर्ट नंबर १० व ५२ असे दिलेले आहेत. ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास येताच न्यायमूर्तींनी आॅनलाइन परवाना पद्धत सोमवारपर्यंत रद्द केली अाहे. मुंबई पालिकेला यातील त्रुटी दूर करण्याचे आदेश दिले असून पालिका आयुक्तांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.