आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मैत्रिणींनो, समरसून जगा... तुमच्या आनंदात दडलाय भवतालाचा सुगंध!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लष्करी सेवेतील ‘थ्री स्टार रँक’ धारण करतानाचा हा क्षण माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा अन् अभिमानाचाही... - Divya Marathi
लष्करी सेवेतील ‘थ्री स्टार रँक’ धारण करतानाचा हा क्षण माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा अन् अभिमानाचाही...
  • कुणालाही अभिमान वाटेल, स्फूर्तिदायी ठरेल, असा माधुरीताईंचा हा प्रवास त्यांच्याच शब्दांत…

लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर

देशाच्या लष्करी सेवेत आजवर ज्या स्त्रियांनी थ्री स्टार रँक प्राप्त केली, त्यामध्ये व्हाइस अॅडमिरल डॉ. पुनिता अरोरा आणि एअर मार्शल पद्मावती बंडोपाध्याय यांच्या जोडीने आता लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांचे नाव जोडले गेले आहे. कुणालाही अभिमान वाटेल, स्फूर्तिदायी ठरेल, असा माधुरीताईंचा हा प्रवास त्यांच्याच शब्दांत…




अगदी लहानपणापासून माझ्यासमोर माझ्या आजीचा आदर्श होता. डॉ. सरलादेवी खोत (आधीची अक्कूताई चिटणीस) माझी आजी.. त्या काळातली डॉक्टर होती. पराकोटीचा संघर्ष आणि संकटे झेलत तिने वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण केला आणि रुग्णसेवेचा वसा घेतला. सुदैवाने मी अशा कुटुंबात जन्म घेतला, जिथे पुरोगामी वातावरण होते. आम्ही तिघी बहिणी. पण ‘मुलगा नाही’, अशी खंत कधीच कुठल्याच स्वरुपात आमच्याकडे व्यक्त झाली नाही. अतिशय उच्चशिक्षित, सुसंस्कारित आणि सुधारकी विचारांच्या घरात वाढल्याने वृत्तींचा संकुचितपणा कधीच स्पर्श करू शकला नाही. वडील इंजिनिअर होते आणि रेल्वेमध्ये काम करत असल्याने त्यांच्या वरचेवर बदल्या होत असत. त्यामुळे आमचे शिक्षणही वेगवेगळ्या ठिकाणी झाले. लखनौ, पुणे, मुंबई, गोरखपूर… अशा खूप ठिकाणी वास्तव्य झाले. लष्करी सेवेतील ‘पोस्टिंग’च्या या सवयीमुळे बदलत्या वातावरणाशी, परिस्थितीशी जुळवून घेणे मला कधीच अवघड वाटले नाही. उलट बदल मला स्वागतार्ह वाटतो. नव्या ठिकाणी नवे वातावरण, नवी माणसे, नवा प्रदेश, नव्या ओळखी होण्याची संधी मिळते. आमच्यासमोर डॉक्टर आजीचा इतका आदर्श होता, की मी आणि माझी बहीण ठरवून मेडिकलकडे गेलो. धाकटी बहीण मात्र वडिलांसारखी इंजिनिअर झाली. माझी आजी त्या काळी बालविधवा होती. पण, तिच्या हुशारीची जाणीव कुटुंबाला होती. त्यांनी आजीला महर्षी कर्वे यांच्या हिंगणे स्त्री शिक्षण केंद्राकडे सुपूर्द केले आणि आजीने नंतर इतिहास घडवला. ती आफ्रिकेत जाऊन वैद्यकीय सेवेत रमली. माझ्या बहिणीने तर आजीच्या या कर्तृत्वावर एक पुस्तकही लिहिले आहे.

गदी लहानपणापासून माझ्यासमोर माझ्या आजीचा आदर्श होता. डॉ. सरलादेवी खोत (आधीची अक्कूताई चिटणीस) माझी आजी.. त्या काळातली डॉक्टर होती. पराकोटीचा संघर्ष आणि संकटे झेलत तिने वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण केला आणि रुग्णसेवेचा वसा घेतला. सुदैवाने मी अशा कुटुंबात जन्म घेतला, जिथे पुरोगामी वातावरण होते. आम्ही तिघी बहिणी. पण ‘मुलगा नाही’, अशी खंत कधीच कुठल्याच स्वरुपात आमच्याकडे व्यक्त झाली नाही. अतिशय उच्चशिक्षित, सुसंस्कारित आणि सुधारकी विचारांच्या घरात वाढल्याने वृत्तींचा संकुचितपणा कधीच स्पर्श करू शकला नाही. वडील इंजिनिअर होते आणि रेल्वेमध्ये काम करत असल्याने त्यांच्या वरचेवर बदल्या होत असत. त्यामुळे आमचे शिक्षणही वेगवेगळ्या ठिकाणी झाले. लखनौ, पुणे, मुंबई, गोरखपूर… अशा खूप ठिकाणी वास्तव्य झाले. लष्करी सेवेतील ‘पोस्टिंग’च्या या सवयीमुळे बदलत्या वातावरणाशी, परिस्थितीशी जुळवून घेणे मला कधीच अवघड वाटले नाही. उलट बदल मला स्वागतार्ह वाटतो. नव्या ठिकाणी नवे वातावरण, नवी माणसे, नवा प्रदेश, नव्या ओळखी होण्याची संधी मिळते. आमच्यासमोर डॉक्टर आजीचा इतका आदर्श होता, की मी आणि माझी बहीण ठरवून मेडिकलकडे गेलो. धाकटी बहीण मात्र वडिलांसारखी इंजिनिअर झाली. माझी आजी त्या काळी बालविधवा होती. पण, तिच्या हुशारीची जाणीव कुटुंबाला होती. त्यांनी आजीला महर्षी कर्वे यांच्या हिंगणे स्त्री शिक्षण केंद्राकडे सुपूर्द केले आणि आजीने नंतर इतिहास घडवला. ती आफ्रिकेत जाऊन वैद्यकीय सेवेत रमली. माझ्या बहिणीने तर आजीच्या या कर्तृत्वावर एक पुस्तकही लिहिले आहे.

आजीसारखे आपणही डॉक्टर व्हायचे, असे मला सुरूवातीपासून वाटायचे. मात्र, लष्करी सेवेचे क्षेत्र एका वेगळ्याच घटनेने माझ्या आयुष्यात आले. मी पुण्यात फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत असताना, माझ्या मैत्रिणीसोबत पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयात (एएफएमसी) गेले होते. मैत्रिणीचे वडील लष्करी सेवेत होते. त्या परिसराचे दर्शन मला प्रभावित करून गेले. अतिशय रम्य परिसर, शिस्तबद्ध वागणूक, सौंदर्यदृष्टीची जपणूक, नीटनेटकेपणा, वेळेचा काटेकोरपणा आणि खेळांची सोय... हे सारे मला तिथे जाणवले. लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाने मला आकर्षित केले आणि आपण इथेच शिकायचे, हे मी ठरवून टाकले. घरातून कायमच पाठिंबा होता. यथावकाश मी डॉक्टर झाले. मला लहान मुले खूप आवडतात. ती आनंदी असतात, मजेत असतात. उद्याची चिंता करत नाहीत. ‘आज’चा क्षण जगतात. दुसरी गोष्ट म्हणजे, आपल्याला काय होतंय, काय दुखतंय.. हे लहान असल्याने ती सांगू शकत नाहीत. त्यांनी न सांगता ते ओळखणं ही गोष्ट मला फार आव्हानात्मक वाटते. लहान मुलांकडून ही समजून घेण्याची कला शिकता येते. या सर्व विचारांतून मी उच्च वैद्यकीय उच्चशिक्षणातील बालवैद्यकशास्त्र शाखा निवडली. तेव्हा लष्करी सेवेत त्या शाखेचा समावेश नव्हता, त्यामुळं मी एक वर्ष प्रतीक्षा केली. अखेरीस ती शाखा सुरू करण्यात आली आणि मी पुन्हा प्रवाहात आले. मला स्टडी लिव्ह मंजूर झाली आणि सुवर्णपदक मिळवत मी शिक्षण पूर्ण केले. दरम्यान ‘एनडीए’मधून (नॅशनल डिफेन्स अकॅडमी) शिक्षण पूर्ण करून माझे भावी पती राजीव हेही लष्करी सेवेत रुजू झाले होते. आमचे लग्न झाले आणि दोघांची लष्करी सेवेतील वाटचाल सुरू झाली.

देशाच्या लष्करी सेवेत कार्यरत असताना, एक स्त्री म्हणून कधीच प्रतिकूल अनुभवाला सामोरे जावे लागले नाही, हे मी आवर्जून सांगेन. तुमच्या कर्तव्यात, जबाबदारीत, शिस्तपालनात तुम्ही चोख असाल, तर यश मिळते, हा माझा अनुभव आहे. सैन्यात स्त्रियांना उत्तम संधी आहेत. अत्यंत यशस्वी, धाडसी कारकीर्द येथे घडवता येते. मला माहेर-सासरच्या कुटुंबाकडून नेहमी पाठिंबा मिळाला. सगळ्यांनी माझे कौतुकच केले. त्याविषयीची कृतज्ञता माझ्या मनात सदैव असते.

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मी माझ्या सगळ्या सख्यांना, मैत्रिणींना हेच सांगेन, की जिद्द ठेवा. तुमच्या आवडी मनापासून जपा. त्यासाठी जरूर तिथे संघर्ष करा. लढा, पण हार मानू नका. स्त्रियांजवळ जन्मजात ‘मल्टिटास्किंग’चे कौशल्य असते. त्या एकाच वेळी खूप वेगवेगळ्या गोष्टी करू शकतात. या गुणाचा पुरेपूर वापर करा. आपण अतिशय समर्थ, शक्तिशाली असतो. फक्त अनेकदा हे सामर्थ्य ‘झाकलं माणिक’ असतं. त्या सामर्थ्याचा आविष्कार करा. ते प्रकट होण्याला अवकाश मिळवून द्या. त्यासाठी परिश्रमही घ्याच; तसेच आपल्यात योग्य ते बदल घडवा. काळानुरूप काही नवी कौशल्ये आत्मसात करा. स्वत:ला अपडेट ठेवा. भवताल कसा बदलतो आहे, याचे भान ठेवा. मूल्य, निष्ठा, विवेक यात कधीच तडजोड करू नका, पण कालबाह्य गोष्टी कवटाळून ठेवू नका. ज्या क्षेत्रात काम करायचे आहे किंवा करत आहात, त्या क्षेत्रातले अद्ययावत ज्ञान मिळवा. पुरेशा व्यावसायिक राहा. वेळेचे काटेकोर नियोजन करा आणि पाळा. टाइम मॅनेजमेंट ही गरज आहे. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, सगळ्या आघाड्यांवर समतोल विचार करण्याची सवय लावून घ्या. त्यासाठी विवेकाचा वापर करा. जे काम करायचे, ते अचूक, वेळेत, दर्जेदारच असेल, हे कटाक्षाने सांभाळा. कामाचे प्राधान्यक्रम ओळखून त्यानुसार आचरण करा. अवांतर वाचनाची सवय ठेवा. त्यातून तुलनात्मक विचाराला चालना मिळेल. दृष्टिकोन घडवायला मदत होईल. 

शेवटी खूपच महत्त्वाची गोष्ट शेअर करायला मला आवडेल, ती म्हणजे मिळालेल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण मनमुराद जगा. प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. आपल्या आवडी, छंद जपा. समरसून जगा. स्वत:कडे कधीच दुर्लक्ष करू नका. आपण समर्थ, आनंदी राहिलो, की भवतालही तसा होत जातो, हे विसरू नका!                
शब्दांकन : जयश्री बोकील, पुणे.
 

बातम्या आणखी आहेत...