आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नी, गर्भवती प्रेयसीचा खून करणाऱ्यास आजन्म कारावास, अंबाजोगाईच्या जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

अंबाजोगाई - अल्पवयीन मुलीसोबतच्या अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या पत्नीचा खून करून पतीने नंतर गर्भवती प्रेयसीचाही खून केला होता. चार वर्षापूर्वी अंबाजोगाई तालुक्यातील येल्डा शिवारात हे हत्याकांड घडले होते. याप्रकरणी सोमवारी अंबाजोगाई विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.बी. पटवारी यांनी आरोपी पतीस पत्नीचा खून केल्याप्रकरणी दोषी ठरवून आजन्म जन्मठेप आणि 20 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. 


येल्डा शिवारात वकिलाची डाग नामक शेतात दिलीप हनुमंत खोडवे आणि त्याची पत्नी प्रीती (वय 21) हे दोघे राहत होते. दिलीप खोडवे जनावरे चारण्यासाठी दररोज शेताच्या बाजूच्या डोंगरावर जात असे. त्याच ठिकाणी जनावरे चारण्यासाठी येणाऱ्या एका अल्पवयीन मुलीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत फूस लाऊन दिलीपने तिच्यासोबत अनैतिक संबंध प्रस्थापित केले. त्यातून ती अल्पवयीन पीडिता गर्भवती राहिली. याची कुणकुण दिलीपच्या पत्नीला लागली होती आणि दिलीपसाठी ती अनैतिक संबंधातील अडसर ठरू लागली होती. त्यामुळे दि. 4 ऑक्टोबर रोजीच्या रात्रीतून कधीतरी दिलीपने स्वतःच्या घरात पत्नीचा गळा दबून खून केला आणि त्यानंतर शेतात लिंबाच्या झाडाखाली गर्भवती प्रेयसीचाही गळा आवळला. दोघींचा खून केल्यानंतर दिलीपने स्वतःही विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. दि. 5 ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास या प्रकरणास वाचा फुटली आणि सर्वत्र एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सोमनाथ गिते, सहाय्यक पोलिस निरीक्षक लाटकर, पीएसआय कांबळे, पोलिस कर्मचारी नागरगोजे, डापकर, डोंगरे आणि राऊत यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन दिलीप खोडवे यास रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतर दिलीप ठणठणीत बरा झाला.
दरम्यान, अल्पवयीन पिडीतेच्या वडिलांच्या फिर्यादीवरून दिलीपवर अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात कलम 302, 676(अ), 309, पोक्सो आणि  ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी हरी बालाजी आणि विशाल आनंद यांनी सखोल तपास करून याप्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्यांना तपासात हेड कॉन्स्टेबल कांगणे यांनी मोलाचे सहकार्य केले. या प्रकरणाची सुनावणी अंबाजोगाई विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.बी. पटवारी यांच्यासमोर झाली. दोन्ही बाजूंनी साक्षी पुरावे होऊन 16 साक्षीदार तपासल्यानंतर न्यायाधीश पटवारी यांनी आरोपी दिलीप खोडवे यास पत्नीचा खून केल्याप्रकरणी दोषी ठरविले आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावली. दिलीपने अल्पवयीन पीडितेचा खून केल्याचा आरोप मात्र न्यायालयात सिद्ध होऊ शकला नाही. दुसऱ्यानेच खून केल्याचा बनाव 


पत्नी आणि प्रेयसीचा खून केल्यानंतर दिलीपने स्वतःही औषध प्राशन केले. पत्नीचा खून दुसऱ्यानेच कोणीतरी केला असून तिचा मृतदेह पाहून मला जगावे वाटले नाही, त्यामुळेच मी विषारी औषध घेतले असा बनाव करून सुटका करून घेण्याचा प्रयत्न दिलीपने केला होता. परंतु, पोलीस तपास आणि सरकारी वकिलांच्या युक्तिवादापुढे हा बनाव टिकू शकला नाही. पत्नीच्या चारित्र्यावर उडविले शिंतोडे 

स्वतःचे अनैतिक संबंध लपविण्यासाठी दिलीपने पत्नी प्रीतीच्या चारित्र्यावर संशय व्यक्त करणारी चिट्ठी लिहिली. तसेच पत्नीच्या मृतदेहावरही त्याने अश्लील मजकूर लिहिला होता.