आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाइल मागितल्याच्या रागातून कुऱ्हाडीने वार करून खून करणाऱ्या आरोपीला जन्मठेप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 नाशिक- मोबाइल मागितल्याचा रागातून कुऱ्हाडीने वार करून खून करणाऱ्या अारोप कैलास शेजूळ याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. सोमवारी (दि. २४) जिल्हा सत्र न्यायाधीश एन. जी. गीमेकर यांच्या न्यायालयाने ही शिक्षा सुनावली. १० ऑगस्ट २०१७ मध्ये पंचशीलनगर एन. डी. पटेलरोडवर हा प्रकार घडला होता. 


अभियोग कक्ष अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंचशीलनगर, एन. डी. पटेलरोड येथे राहणारा मयत विशाल झाल्टे हा या गुन्ह्यातील फिर्यादी हेमंत जगताप यांच्या घरात भाडेकरारावर रहात होता. आरोपी कैलास रामचंद्र शेजूळ (रा. पंचशीलनगर) हे दोघे एकमेकांना ओळखत होते. घटनेच्या दिवशी मयत विशालने आरोपी कैलास शेजुळ याच्या घराचा दरवाजा वाजवला व त्याच्याकडे मोबाइल मागितला. यावरून मयत विशाल आणि आरोपी कैलास दोघांमध्ये वाद झाले. रागाचे रूपांतर हाणामारीत झाले. आरोपी कैलास याने धारदार लोखंडी कुऱ्हाडीने मयत विशालच्या कानावर व मानेवर वार करून गंभीर जखमी केले. दवाखान्यात नेण्यापूर्वी त्याचा मृत्यू झाला. घरमालक जगताप यांच्या फिर्यादीनुसार आरोपी कैलास शेजूळच्या विरोधात भद्रकाली पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सहायक निरीक्षक एस. आर. साबळे यांनी केला. आरोपीच्या विरोधात सबळ पुरावे गोळा केले. आरोपीच्या विरोधात जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. जी. गिमेकर यांनी गुन्ह्यातील साक्षीदार, पंच यांनी दिलेली साक्ष, तपासी अमलदार यांनी सादर केलेल्या परिस्थितीजन्य पुराव्यासह खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेप आणि २५ हजारांचा दंडाची शिक्षा ठोठावली. सरकार पक्षातर्फे रवींद्र एल. निकम यांनी कामकाज पाहिले. पैरवी अधिकारी आर. एस. पिरजादे, न्यायालयीन पोलिस कर्मचारी आर. आर. जाधव यांनी शिक्षा होण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला. 


दुचाकी चोराला एक वर्ष व सहा महिन्यांचा सश्रम कारावास 
दुचाकी चोरी करणाऱ्या आरोपीला एक वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. सोमवारी (दि. २४) अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी ए. एम. शहा यांनी ही शिक्षा सुनावली. अभियोग कक्ष विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २८ जानेवारी २०१५ रोजी नवीन नाशिक बसस्थानक येथून सायंकाळी सहा वाजता शरद न्याहरकर यांची दुचाकी (एमएच १५ बी. पी. २७१६) चोरीस गेली. याबाबत सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास करत जक्की उर्फ जाकीर अक्तार शेख (वय ३०, रा. भद्रकाली) यास अटक केली. या गुन्ह्याचा तपास हवालदार जे. ए. शेख यांनी केला. मुख्य न्यायदंडाधिकारी ए. एम. शहा यांनी १ वर्ष व सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. सरकार पक्षातर्फे अॅड. अशोक करंडे यांनी कामकाज पाहिले. पैरवी अधिकारी डी. एस. काकड यांनी पाठपुरावा केला. 
 

बातम्या आणखी आहेत...