आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीची हत्या करणाऱ्या शिक्षकाला जन्मठेप; टेंभुर्णीजवळ मारहाण करून केला होता खून

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- मुंब्रा ठाणे येथील नगरपालिका शाळेतील शिक्षक सुभाष निवृत्ती भोसले (वय ५०) याला बुधवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एम. पाटील यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. पत्नी सुनंदा यांचा खून केल्याचे न्यायालयात सिद्ध झाल्यामुळे मागील सोमवारी त्यांना दोषी धरण्यात आले हाेते. आज त्यांना शिक्षा सुनावली. सुभाष हा अटकेत असल्यापासून न्यायालयीन कोठडीतच आहे. तो मूळचा मोहोळ तालुक्यातील मसले चौधरी येथील रहिवासी आहे. मुंब्रा येथील सुनंदा या महिलेशी प्रेमविवाह केला होता. दोघांत वितुष्ट आल्यामुळे हा प्रकार त्याने केला होता. 


असा केला खुनाचा बनाव 
आईची तब्येत बिघडली आहे. तिला पाहण्यासाठी आपण गावी जाऊ, असा बहाणा करून ठाणे मुंब्रा येथून दोघे कारमध्ये आले. टेंभुर्णीजवळ आल्यानंतर खड्ड्यात कार घेऊन पत्नीच्या डोक्यात टॉमी घातली. बेशुद्धावस्थेत कारमध्ये सोडून पोलिसांत धाव घेतली. पोलिसात चोरट्यांच्या हल्ल्यात आम्हाला मारहाण झाली. दागिने घेऊन पळून गेले अशी तक्रारही दिली. पण, पोलिसांनी या घटनेचा छडा लावला. तोच आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. 


सुनंदा तिसरी पत्नी 
सुनंदा ही तिसरी पत्नी. पहिली पत्नी १९९७ साली आजाराने वारली. दुसऱ्या पत्नीसोबत २००५ रोजी विवाह केला होता. त्याच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली. सुनंदा ही तिसरी पत्नी होती. दोघांचा प्रेमविवाह झाला होता. खुनाची घटना २८ मे २०१४ रोजी घडली होती. चौकशीनंतर मात्र तोच मारेकरी निघाला. टेंभुर्णी पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक के. एन. पाटील यांनी तपास करून न्यायालयात दोषारोप पत्र पाठवले होते. सरकारतर्फे आनंद गोरे, आरोपीतर्फे मिलिंद थोबडे या वकिलांनी काम पाहिले. 

बातम्या आणखी आहेत...