आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिवावर बेतले पण..!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

25-30 वर्षांचे वय हा गद्धेपंचवीशीचा काळ असतो. परिणामांचा कसलाही विचार न करता बेधडक कृती करण्याची ऊर्मी सहज उफाळून येत असते. 2002 ची ही घटना. लहान भावाला व्यवसाय करण्यासाठी म्हणून मालवाहतूक टेम्पो घेऊन दिला होता, परंतु काही अडचणीमुळे त्याचे व्यवसायाकडे म्हणावे तसे लक्ष नव्हते. एके दिवशी निर्णय घेतला, आपण स्वत: मालवाहतूक करायची आणि लागलीच शेजारच्या गावातील (चिंचोली, जहागीर) शेतीचा माल भरण्यासाठी टेम्पो घेऊन मी निघालो. सोबत माल भरण्यासाठी तीन मजूर होते. उमरगा शहरापासून दोन किलोमीटर पुढे गेल्यानंतर एका आडरस्त्यावरील पुलाजवळ समोरून एक सायकलस्वार आला. आयुष्यात पहिल्यांदाच मी टेम्पो चालवत होतो. त्यामुळे त्या सायकलस्वाराला वाचविण्याची माझी केविलवाणी धडपड सुरू झाली. त्यापूर्वी फक्त दोनचाकी वाहनच चालविले असल्यामुळे ब्रेक दाबायचे म्हटले की, उजव्या पायाचा वापर करणे हे समीकरण मनामध्ये पक्के बसले होते. सवयीप्रमाणे मी उजवा पाय दाबला आणि साहजिकच तो अ‍ॅक्सिलेटरवर पडला. क्षणात टेम्पोने प्रचंड वेग घेतला आणि माझ्या डोळ्यासमोर माझी अंत्ययात्रा तरळून गेली. मी पटकन डोळे मिटले. पुढच्याच क्षणी धाडकन आवाज आला. डोळे उघडून पाहिले तर पुलाचा लोखंडी कठडा तोडून टेम्पो 15 ते 20 फूट खोल नदीपात्रामध्ये चारही टायरवर जशास तसा उभा होता. सोबतच्या मजुरांकडे मी पाहिले आणि काय आश्चर्य, त्यांना साधे खरचटलेसुद्धा नव्हते. एवढा मोठा अपघात होऊनसुद्धा कसलीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही, याचे आश्चर्य जरी असले तरी आजही या प्रसंगाची साधी आठवण झाली की, शहारून अंगावर काटा येतो. म्हणतात ना, काळ आला होता पण वेळ आली नव्हती. तेव्हापासून एक धडा मी घेतला, की आयुष्यात कसलाही कठीण प्रसंग आला तरी पूर्ण विचाराअंतीच निर्णय घ्यायचा. कारण परमेश्वर पुन्हा-पुन्हा संधी देत नाही.