आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइस्लामाबाद - क्रिकेटपटू ते राजकारणी असा प्रवास केलेले पाकिस्तानच्या तहरीके इन्साफ पाकिस्तान पक्षाचे प्रमुख इम्रान खान पाकचे पंतप्रधान म्हणून निवडून आले आहेत. पण इम्रान खानचे खासगी आयुष्य अत्यंत वादग्रस्त ठरलेले आहे. जाणून घेऊयात त्याच्या बाबतीत काही खास गोष्टी.
>> राजकारणात उतरण्यापूर्वी क्रिकेटर असलेल्या इम्रानने पाकिस्तानला 1992 मध्ये वर्ल्ड कप विजेता बनवले होते. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये हा वर्ल्डकप झाला होता. अखेरच्या सामन्यात 72 धावांच्या खेळीने त्याने सामनावीर पुरस्कार मिळवला होता. विशेष म्हणजे निवृत्तीनंतर पुनरागमन केल्यानंतर वयाच्या 40 व्या वर्षी त्याने पाकला विश्वविजेता बनवले होते.
>> इम्रान खानचे संपूर्ण नाव इम्रान खान नियाजी आहे. त्याचा जन्म 5 ऑक्टोबर 1952 ला लाहोरमधील एका सधन पख्तून कुटुंबात झाला होता. त्याचे वडील इकरमुल्लाह खान नियाजी सिव्हील इंजिनीअर होते. त्यांच्या आईचे नाव होते, शौकत खान.
>> इम्रान खानचे शालेय शिक्षण इंग्रजी माध्यमातील एचिसन कॉलेजमध्ये झाले. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी तो रॉयल ग्रामर स्कूल इंग्लंडला गेला होता.
>> इम्रान खानने 1972 मध्ये ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमधून पॉलिटिक्स आणि इकॉनॉमिक्समध्ये पदवी मिळवली होती.
>> कुटुंबाला क्रिकेटची पार्श्वभूमी असल्याने इम्राननेही अत्यंत कमी वयात इंग्लंडमध्ये क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती.
>> 3 जून 1971 मध्ये इंग्लंड विरोधात झालेल्या बर्मिंघम टेस्टमधून इम्रानने करिअर सुरू केले होते. त्यानंतरल तीन वर्षांनी 1974 मध्ये प्रुडेंशियल कपसाठी पाक टीममध्ये तो निवडला गेला.
>> क्रिकेटमध्ये एंट्री केली तेव्हा इम्रानला प्लेबॉय म्हणून ओळखले जात होते. त्याच्या गर्लफ्रेंडच्या यादीत क्रिस्टिएन बॅकर, सुसान्नाह कॉन्सटेनटाइन, एमा सर्जंट आणि सीता व्हाइट अशा सौंदर्यवतींचा समावेश होता.
>> इम्रानच्या आईचा कॅन्सरने मृत्यू झाला. त्यांच्या स्मरणार्थ इम्रानने 'शौकत खान मेमोरियल ट्रस्ट'ची स्थापना केली. जगभरातून पैसा गोळा करून त्याने आईच्या स्मरणार्थ 'शौकत खान कॅन्सर मेमोरियल हॉस्पिटल' तयार केले. हॉस्पिटल चालवण्यासाठी त्याने क्रिकेटमध्ये मिळालेल्या जवळपास प्रत्येक बक्षीसाचा लिलाव केला. त्याने त्याची आवडती कालही लिलावात काढली होती.
>> इम्रानची समाजवेसा सुरूच होती. त्यात 1996 मध्ये पुढे एक पाऊल टाकत त्याने राजकारणात प्रवेश केला. इम्रानने पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीई) पक्ष स्थापन केला. त्याच्या पक्षाने 2013 मध्येही निवडणूक लढवली होती. पण त्याचा दारुण पराभव झाला.
>> इम्रानने तीन लग्न केली. त्याने 1995 मध्ये पहिला विवाह जेमिमा गोल्डस्मिथ बरोबर केला. ती एका ब्रिटीश अब्जाधीशाची मुलगी आहे. इम्रान आणि जेमिमाला दोन मुले आहेत, सुलेमान इसा आणि कासीम. 2004 मध्ये त्याने जेमिमाला घटस्फोट दिला.
>> त्यानंतर पत्रकार रेहम खानबरोबर त्याने दुसरे लग्न केले. ते 10 महिनेच टिकले. त्यानंतर फेब्रुवारी 2018 मध्ये 65 वर्षे वय असताना इम्रानने 40 वर्षांच्या बुशरा मनेकाबरोबर तिसरे लग्न केले. पाच मुलांची आई असलेली बुशरा मानेका अध्यात्मिक गुरू आहे.
>> इम्रानची दुसरी पत्नी रेहमने तिच्या 'रेहम' पुस्तकात इम्रानवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. इम्रानला 5 अनौरस मुले असल्याचा आरोपही तिने केला आहे. तो अनेक प्रकारच्या ड्रग्जचे सेवन करत असल्याचेही रेहमने म्हटले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.