आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराधारूर : सात वर्षांपूर्वी ट्रांझिस्टर बाॅम्ब बनवून मित्राचा बदला घेण्यासाठी ते मित्राच्या नावे एसटीद्वारे पार्सल पाठवले. मात्र ते पार्सल कंडक्टरने कुतुहलापोटी घरी नेल्यानंतर त्याचा स्फोट झाला. या स्फोटात कंडक्टरचा हात निकामी झाला. ही घटना केज तालुक्यातील काळेगाव येथे घडली होती. या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला केंद्रेवाडी येथील बाबा उर्फ मुंजाबा गिरी हा आरोपी पॅरोलवर सुटल्यानंतर फरार झाला होता. त्याला अखेर चार वर्षांनंतर पोलिसांनी पुणे येथून रविवारी रात्री अटक केली. ओळख लपवण्यासाठी तो डोक्यावरील केस वाढवून पुण्यातील वेगवेगळ्या कंपन्यांत काम करत फिरत होता. दरम्यान त्याला सोमवारी दुपारी धारूर न्यायालयात हजर करण्यात आले होते. धारूर न्यायालयाने त्याला औरंगाबाद येथील तुरुंगात हलवण्याचे आदेश दिले आहेत.
अंबाजोगाई तालुक्यातील केंद्रेवाडी येथील बाबा उर्फ मुंजाबा गिरी याचे गावातील एका मित्राबरोबर २०१२ मध्ये बिनसले होते . त्याला अद्दल घडवण्यासाठी बाबा गिरी याने रेडिओमध्ये स्फोटके भरून ठेवले होते. हा रेडिओ त्याने मित्राच्या घरी जावा अशा पद्धतीने पार्सल तयार केले होते. सदरील पार्सल हे एसटीमध्ये केंद्रेवाडी येथे जाण्याऐवजी बसच्या कंडक्टरने ते केज तालुक्यातील काळेगाव येथील आपल्या घरी नेले होते. पार्सल फोडल्यानंतर त्यात रेडिओ निघाला होता. रेडीओ सुरू करताच स्फोट होऊन कंडक्टरसह कुटुंबीय जखमी झाले होते.
सदरील गुन्हा उघडकीस आल्यानंतर यात आरोपी म्हणून गिरी यांचे नाव समोर आले होते. या प्रकरणात गिरी याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली हाेती. त्याची रवानगी तुरुंगात झाली.
वेगळ्या पेहरावात पुण्यात काम करत होता
मुंजाबा गिरी याने फरार झाल्यानंतर डोक्यावरील केस वाढवले आहेत. केस वाढवून व वेगवेगळी नावे सांगून तो विविध कंपन्यांसह तसेच इतर ठिकाणी काम करत हाेता. परंतु पुणे पोलिसांनी त्याचे पितळ उघडे पाडले.
पॅरोलवर सुटल्यानंतर झाला फरार
३१ ऑगस्ट २०१५ मध्ये एक महिन्याच्या सुटीवर औरंगाबादच्या हर्सूल कारागृहातून तो गावी आला होता. त्यानंतर तो फरार झाला होता. या प्रकरणात तुरुंग अधिकाऱ्यांनी धारूर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला होता. चार वर्षांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. धारूर पोलिसांना तो पुणे येथे एका कंपनीत काम करित असल्याची माहिती मिळताच पुणे पोलिसांनी त्याला अटक केली. धारूर पोलिस ठाण्यातील सपोनि आर .बी. बनकर, राठोड, माळेकर यांनी रविवारी मध्यरात्री त्याला पुणे येथे जाऊन ताब्यात घेतले. त्यास सकाळी धारूर येथे आणून दुपारी धारूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने औरंगाबाद येथील तुरुंगात हलवण्याचे आदेश दिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.