आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुष्यात घडलेले प्रसंग मांडणे म्हणजे फिल्म नव्हे : उमेश कुलकर्णी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- चित्रपटाला एक कथा असते. पण, ती कथा सांगणे एवढेच उद्दिष्ट नसते. त्या कथेमागे दडलेले सूत्र जगाला सांगायचे असते. आयुष्यात घडलेले प्रसंग मांडणे म्हणजे फिल्म नव्हे, तर ते का सांगायचे आहे, हे म्हणजे फिल्म असते, असे मत दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

 

सहाव्या औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी आयोजित 'मास्टर क्लास'मध्ये ते बोलत होते. या वेळी एमजीएम फिल्म विभागप्रमुख, चित्रपट महोत्सवाचे समन्वयक शिव कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यशाळेच्या सुरुवातीला उमेश कुलकर्णी यांची 'गिरणी' ही शॉर्ट फिल्म दाखवण्यात आली. कुलकर्णी म्हणाले, जगताना आपण बऱ्यापैकी निष्काळजी असतो. आपल्या आजूबाजूच्या घटना आणि माणसांना आपण गांभीर्याने पाहतच नाही. प्रत्येक चेहरा एक लँडस्केप आहे. प्रत्येक चेहऱ्यामागे खूप काही दडलेले आहे. मानवी संवेदनेसोबतच आणखी एक गोष्ट चित्रपटांमध्ये घडते. 


मी म्हणजे, दिग्दर्शक किंवा लेखक एक कथेच्या निमित्ताने एक सूत्र सांगत असतो. तो एक तत्त्ववेत्ताही असतो. कथा सांगणे आणि खिळवून ठेवणे यापलीकडे जाऊन सिद्धांत मांडून त्याला जीवनात उतरवण्यासाठी अवचेतन मनाशी संवाद साधायचा असतो. 


तुमचे सूत्र कोणत्या कथेतून मांडता येईल ते मांडा. जगण्याकडे तुम्ही कसे पाहता यावर ते अवलंबून आहे. आपल्या आयुष्यात जे घडले ते सांगणे म्हणजे फिल्म नाही, तर ते का सांगायचे आहे ते महत्त्वाचे आहे. शिव कदम यांनीही या कार्यशाळेला पुढे नेण्यात मदत केली. 

बातम्या आणखी आहेत...