आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेहुण्याचा खून करणाऱ्यास जन्मठेप; दीड हजारांचा दंड, बीड येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड : बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला त्रास देणाऱ्या मेहुण्याचा धारधार शस्त्राने खून केल्याच्या प्रकरणात एका अारोपीस येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्या. यू.टी. पोळ यांनी दोषी ठरवून जन्मठेप व दीड हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

शहरातील पेठ बीड ठाणे हद्दीत दोन वर्षांपूर्वी घडलेल्या खुनाच्या प्रकरणात बीडच्या न्यायालयाने बुधवारी (दि.२२) हा निकाल दिला. शहरातील गांधीनगर भागातील जलील उर्फ जल्लू नसीर अहेमद (३० ) हा विवाहित असून त्यास तीन मुली व एक मुलगा अशी चार अपत्ये आहेत. जलील हा कॅरमचे दुकान चालवत होता. लग्नास ६ वर्षे उलटल्यानंतर त्याने पत्नी दिलशाद बेगमच्या चारित्र्यावर संशय घेण्यास सुरुवात केली. दरम्यान, २६ मार्च २०१७ रोजी जलील याने पत्नीसोबत भांडण केले. यावेळी त्याचा मेहुणा शेख अमजद शेख अहेमद उर्फ बाबू, सासू शेख शफिया शेख अहेमद उर्फ बाबू हेही तेथेच उपस्थित होते. दोघा पती-पत्नीतील वाद विकोपाला गेल्यानंतर पत्नी दिलशाद बेगम व सासू शेख शफिया यांनी जलील यास शिवीगाळ करुन जिवे मारण्याच्या धमक्याही दिल्या. त्या दोघी एवढ्यावरच थांबल्या नाही तर त्यांनी त्याचे हात घट्ट पकडून ठेवले. एवढ्यात त्याचा मेहुणा शेख अमजद शेख बाबू उर्फ अहेमद याने त्याच्या कमरेला असलेल्या खंजीरने जलीलच्या छातीत सपासप वार केला. झटापटीत तो नालीत कोसळला. यावेळी आवाज ऐकून जवळच असलेला त्यांचा भाऊ फईम उर्फ पमू हा धावत आला. या वेळी त्याने सोडवासोडवचा प्रयत्न केला तेव्हा त्याच्याही छातीत खंजीरने वार केला. जलीलचे बंधू सय्यद अखिल अहेमद सय्यद नसीर अहेमद हे तेथून जात होते. त्यांनी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत तिन्ही मारेकरी पळून गेले. गल्लीतील लोकांच्या मदतीने सय्यद अखिल यांनी जलीलला तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. वर्मी घाव बसल्याने जलील उर्फ जल्लूचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाला.

दहा साक्षीदार तपासले

न्यायाधीश यू. टी. पोळ यांच्यासमोर या खून प्रकरणाची सुनावणी झाली. सहायक सरकारी वकील अनिल तिडके यांनी या प्रकरणात १० साक्षीदार तपासले. त्यांचा युक्तिवाद, साक्षी पुरावे ग्राह्य धरून आरोपी शेख अमजद शेख अहेमद यास न्यायालयाने दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.