आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजेच्या धक्क्याने आई-मुलाचा मृत्यू,मुलाला वाचवताना आईही चिकटली; कपडे वाळवण्याच्या तारेत वीजप्रवाह

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • ग्राहकांनी काळजी घ्यावी, त्वरित कळवावे

सोलापूर- विजेच्या धक्क्याने आई-मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी घडली. अंघोळीनंतर कपडे घेताना मुलगा तारेला चिकटला, त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात आईही चिकटली. यात दोघांचा अंत झाला. शनिवारी रात्री वादळ व अवकाळी पावसामुळे कपडे वाळवण्याच्या तारेत विजेचा प्रवाह शिरल्याने ही घटना घडली.

अजय गंजी (वय २४) आणि शशिकला गंजी (वय ५२, दोघे रा. रविवार पेठ) अशी त्यांची नावे आहेत. एकाच अंत्ययात्रेत दोघांचे शव पाहणारे हळहळत होते.

अजय अंघोळ झाल्यानंतर समोरील कपडे वाळवण्याच्या तारेवरून कपडे घेत होता. तो चिकटल्याचे पाहून कपडे धुवत बसलेली आई शशिकला ‘अज्या अज्या’ म्हणत पुढे आल्या. काय झाले आहे हे त्यांना कळलेच नाही. त्यांनी थेट ओल्या हाताने अजयला ओढण्याचा प्रयत्न केला. त्यात त्याही चिकटल्या. त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात वडील गणेश गंजी यांचे बोट भाजल्याने चांगलेच काळवंडले.


रविवार पेठेत चौगुले यांच्या वाड्यात मातीच्या भिंती आणि वर लोखंडी पत्रे आहेत. यातील चार भाडेकरूंपैकी गंजी कुटुंबीय. सकाळी सहाला पाणी भरताना भाडेकरू अनिता आडकी यांना ओल्या भिंतीत विजेचा हलका प्रवाह जाणवला. त्यांनी कल्पना दिल्यानंतर काहींनी विजेची बटणं बंद केली. मात्र, याचा उपयोग झाला नाही. लोखंडी तार एका बाजूला भिंतीत खिळा मारून तर दुसरे टोक वीजजोड पाइपला बांधलेले होते. त्यावर कपडे वाळवण्यात येत होते.


घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. आई विड्या वळण्याचे काम करत, वडील टेलर काम, भाऊ कॅन्टीनमध्ये तर अजय सोडा वॉटरच्या दुकानात कामाला होता. मोठ्या भावाचे लग्न झाले असून त्याला एक अपत्य आहे. अजय हा मनमिळाऊ स्वभावाचा असल्यामुळे मोठ्या प्रमाणात मित्रमंडळी जमली होती आणि सर्वांचे डोळे ओले दिसत होते.

अशी मिळू शकते भरपाई

महावितरणचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. उद्या विद्युत निरीक्षक मंडळाचे अधिकारी येतील आणि या घटनास्थळाची पाहणी करतील. मीटरपर्यंत आलेल्या विद्युत प्रवाहाची जबाबदारी ही महावितरणची असते. तर आतील जबाबदारी ग्राहकाची असते. त्यानुसार भरपाई मिळेल.

ग्राहकांनी काळजी घ्यावी, त्वरित कळवावे

आर्थिक मदतीचा निर्णय विद्युत निरीक्षकांच्या अहवालावर अवलंबून असतो. नियमानुसार असेल तर दोन दिवसांत मृताच्या कुटुंबीयांना २० हजार रुपये दिले जातात. नंतर दोन ते अडीच महिन्यात प्रति ३ लाख ८० हजार रुपये दिले जातात. विजेचा धक्का लागू नये यासाठी ग्राहकांनी आयएसआय मार्कची विद्युत उपकरणे वापरावीत. तसेच प्रत्येकांनी घरात अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर बसवावा. महावितरणची जेवढे उपकरणे आहेत त्यांना काहीही बांधू नये. काही अडचण असल्यास त्वरित महावितरणशी संपर्क साधावा.’’ ज्ञानदेव पडळकर, अधीक्षक अभियंता, महावितरण

बातम्या आणखी आहेत...