आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिकाऱ्यांना जशी ‘गडचिरोली’ची धास्ती, तशी विरोधकांना ‘बारामती’ची

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई-मनासारखे न वागणाऱ्या अधिकाऱ्यांना विदर्भातील नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात बदली करण्याची भीती दाखवली जाते. त्याप्रमाणेच राजकारणात एखाद्या नेत्याचा ‘गेम’ करायचा असेल तर त्याला हटकून बारामतीची उमेदवारी देऊन तोफेच्या तोंडी दिले जाते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

बारामतीत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याविरोधात भाजपने गोपीचंद पडळकर यांना उतरवले आहे. गोपीचंद यांचा मूळ मतदारसंघ हा खानापूर म्हणजे सांगली जिल्ह्यात आहे. २०१४ ला खानापूरमध्ये गोपीचंद भाजपचे उमेदवार होते व मतदानात ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले.
 

या वेळी गोपीचंद यांना काँग्रेस-राष्ट्रवादीने खानापूरची आॅफर दिली होती. मात्र गोपीचंद यांचा आग्रह सांगोला या मतदारसंघाचा होता. पण आघाडीने त्यांना नकार दिला. ती जागा ११ वेळा विजयी झालेल्या शेकापच्या गणपतराव देशमुख यांची आहे. तेथे गणपतरावांचा नातू सध्या रिंगणात आहे. त्यामुळे गोपीचंद बारामतीत आले. बारामती हा मराठा व धनगरबहुल असा मतदारसंघ आहे. गोपीचंद हे धनगर असल्याने भाजपने त्यांना बारामतीत उतरवले. मात्र २०१४ मध्ये येथे भाजपने बाळासाहेब गावडे हे धनगर उमेदवार दिले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा झाली होती तरीही अजित पवार हे ९० हजारांच्या फरकाने विजयी झाले होते. पडळकर यांना बारामती इतकी सोपी नाही. मात्र ते हरले तरी त्यांना विधान परिषदेवर घेण्याचे व मंत्रिपद देण्याचे भाजपने वचन दिल्याचे सांगितले जाते. त्यामुळे गोपीचंद यांनी बारामतीत ‘तोफेच्या तोंडी’ जाण्याचे धाडस केल्याचे सांगण्यात येते.  
 

दुसरी बाब म्हणजे महादेव जानकर यांनी रासपच्या चिन्हावरच निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला होता. धनगर समाजात जानकर यांना  पर्यायी नेतृत्व भाजप तयार करू इच्छिते. त्यासाठी गोपीचंद यांचे भाजप अधिक महत्त्व वाढवत आहे. बारामतीच्या लढतीविषयी अजित पवार निश्चिंत आहेत. आमच्याविरोधात आजपर्यंत भाजप हेच कार्ड खेळत आला आहे. या वेळी मी लाखाच्या फरकाने जिंकणार असे त्यांचे म्हणणे आहे.
 

धनगर उमेदवारावर विरोधकांचा जोर
राष्ट्रवादी काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या बारामतीत सर्वाधिक धनगर समाजाचे प्राबल्य आहे. यामुळेच येथे दरवेळी विरोधक धनगर समाजाचाच उमेदवार देतात. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने बाळासाहेब गावडे हे धनगर समाजाचे उमेदवार दिले होते. त्या वेळी अजित पवार ९० हजारांच्या फरकांनी जिंकले होते. आताही वंचित आघाडीने अविनाश गोफणे यांच्या रूपाने धनगर समाजाचा उमेदवार दिलाय. त्यामुळे आता धनगर समाजाच्या मतांत विभाजन होऊ शकते.

गोफणेंची उमेदवारी पडळकरांना माहिती : अॅड. प्रकाश आंबेडकर
वंचितचा बारामतीचा उमेदवार धनगर आहेच, पण तो स्थानिकही आहे. गोपीचंद पडळकर हे  सांगली जिल्ह्यातील आहेत. अजित पवार जसे साखर कारखानदार आहेत तसाच वंचितचा उमेदवारसुद्धा साखर कारखानदार आहे. अविनाश गोफणे यांची उमेदवारी निश्चित करताना पडळकर हे वंचित आघाडीत होते. त्यांना वंचितच्या बारामतीतील संभाव्य उमेदवाराची माहिती होती, असे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.

बातम्या आणखी आहेत...