आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाषाभान : भाषाविज्ञानाचा पुनर्विचार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. दिलीप चव्हाण

मानवी जीवन अधिक समृद्ध, उन्नत, न्यायाधिष्ठित करण्यासाठी भाषेसंदर्भातील धारणा, संकल्पना, सिद्धांतांचे पुनर्मूल्यांकन करावे लागेल. भाषेशिवाय आपली अभिव्यक्ती आणि विकास अशक्य असल्याने ते अत्यावश्यक बनले आहे. अशा पुनर्मूल्यांकनाचा शोध घेत नव्या भाषिक जाणिवा विकसित करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे.

जरा आठवून बघा, शाळेत असताना आपल्याला व्याकरणाचा तास किती कंटाळवाणा वाटायचा! खरंच, भाषेची ओळख करून देणारे व्याकरण अवघड होते की त्याची रचनाच मुळात अवघड वाटावी, अशी केली होती? कारण भारतीय सामाजिक परिप्रेक्ष्यात भाषा आणि विषमता यांचाही जवळचा संबंध आहे. भाषेचा विषमतेशी काय संबंध आहे? ती विषमतेच्या निर्मितीत काही भूमिका निभावते काय? भाषेतून समाजात अस्तित्वात असलेल्या विषमतेला खतपाणी मिळते का? विषमतेला पूरक असलेल्या धारणा, अपधारणा, मत-मतांतरे, दुजाभाव, पूर्वग्रह यांना भाषेच्या माध्यमातून पुष्टी मिळते का? समाजातील स्त्री-पुरुष विषमतेला भाषा गोंजारते का? भाषेद्वारे वंशभेद, जातिभेद, प्रांतभेद यांचे दृढीकरण केले जाते का? असे प्रश्न अलीकडे उपस्थित होत आहेत.

थॉमस पिकेटी यांचे 'कॅपिटल इन द ट्वेंटीएथ सेन्चुरी' हे पुस्तक २०१३ मध्ये प्रसिद्ध झाले. अर्थशास्त्रातील हे एक महत्त्वाचे पुस्तक मानले जाते. पुस्तकाचा विषय आहे जगभरात आकाराला आलेली आर्थिक विषमता. कार्ल मार्क्स यांच्या 'दास कॅपिटल' या ग्रंथानंतरचा भांडवल या विषयावरील हा सर्वांत महत्त्वाचा ग्रंथ मानला जातो. जगभरात आर्थिक विषमतेने किती भयावह रूप धारण केले आहे, याची चर्चा या पुस्तकात केली आहे. साधारणपणे विषमतेची चर्चा ही आर्थिक परिभाषेतच केली जाते. आर्थिक विषमता मापनाच्या रीतीदेखील विकसित झाल्या आहेत. सांस्कृतिक वा सामाजिक विषमतेच्या वस्तुनिष्ठ मापनाच्या रीतीभाती विकसित झालेल्या नाहीत. तरीही, विषमतेच्या निर्मितीत आर्थिक घटकांव्यतिरिक्त जे घटक कारणीभूत असतात, त्याची चर्चा अलीकडच्या काळात केली जात आहे. भाषेचा पद्धतशीरपणे अभ्यास करणारी विद्याशाखा म्हणजे भाषाविज्ञान होय! ही काहीशी दुर्लक्षित आणि अप्रिय असलेली विद्याशाखा आहे.

एक प्रकारचा अभिजनवाद या विद्याशाखेच्या मुळाशी जखडून राहिला आहे. त्यामुळे भाषाविज्ञानाचा एक विद्याशाखा म्हणून पुरेसा विकास झाला नाही. भाषाविज्ञान ही आधुनिक काळात विकास पावलेली विद्याशाखा नाही; तर तिची मुळं आपल्याला युरोप आणि प्राचीन भारतात शोधावी लागतात. थोडक्यात, भाषाविज्ञान ही प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेली विद्याशाखा आहे. ती जेवढी प्राचीन आहे, तेवढीच कर्मठ आहे. नवे बदल स्वीकारून स्वत:ला अद्ययावत करण्यात ही विद्याशाखा फारशी खुली राहिली नाही. भाषा वैविध्याने भारलेली असते, या वास्तवाकडे दुर्लक्ष करून भाषेचा वापर समाजातील सर्व घटक एकसंधपणे करीत असतात, या गृहितकावर भाषाविज्ञान उभे राहिले. या गृहितकामागे विशिष्ट असा समूह स्वार्थ होता. सांस्कृतिक आणि राजकीयदृष्ट्या वरती असलेल्या समूहांच्या भाषांच्या अभ्यासावर भाषाविज्ञान उभे राहिले. खालच्या वर्गाचा भाषिक विनियोग या प्रक्रियेत लक्षात घेतला गेला नाही. त्याचे भिनत्वदेखील अधोरेखित करण्यात आले नाही. याउलट, कनिष्ठवर्गीय समूह ज्या भाषा किंवा भाषा प्रकार वापरतात, त्यांच्याविषयी एक प्रकारची घृणा पारंपरिक भाषा अभ्यासकांमध्ये होती.

संस्कृत भाषेत एक श्लोक आहे. हा श्लोक बंगाली भाषेच्या वापरावरील प्रतिबंधाबाबत आहे. ज्याचा अर्थ असा आहे की, अठरा पुराणे आणि रामायण यांतील कथा कुणी बंगाली भाषेत सांगितल्या, तर त्यांना रौरव नरकात जावे लागेल. एखाद्या देशातील भाषिक वास्तव हे किती क्लिष्ट आणि दमनकारी असू शकते, हे यावरून लक्षात यावे. पारंपरिक भाषाविज्ञानाने या प्रश्नांकडे लक्ष दिले नाही. परिणामी, या भाषाविज्ञानाच्या प्रभावातून बाहेर पडून सामाजिक भाषाविज्ञानासारख्या अनेक नव्या विद्याशाखा निर्माण झाल्या. आज जगभरातील असंख्य भाषांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. इंग्रजी, हिंदी किंवा मराठीसारख्या ज्या भाषा मोठ्या प्रमाणावर वापरल्या जात आहेत, त्यांच्यावरही संबंधित भाषिक समूहातील अभिजनांनी वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

लेखकाचा संपर्क : 9420641519
डॉ. दिलीप चव्हाण
dilipchavan@gmail.com

बातम्या आणखी आहेत...