आता दारू पिण्याचा परवाना मिळणार ऑनलाइन, विक्री आणि वाहतुकीसाठीही संगणकीय व्यवस्था

दिव्य मराठी

Apr 22,2019 10:48:00 AM IST

अकोला - राज्य उत्पादन शुल्क (दारूबंदी) विभागातील सेवांनाही आता ऑनलाइनचे कोंदण प्राप्त झाले आहे. त्यामुळे स्थानिक जिल्हा कार्यालयांतून दिल्या जाणाऱ्या सेवा यापुढे ऑनलाइन प्राप्त केल्या जातील. दारू पिण्याचा परवाना (एकदिवसीय व कायमस्वरूपी), विदेशी मद्याच्या घाऊक विक्रीची (एफएल वन) अनुज्ञप्ती, बिअर शॉपीचे (एफएलबीआर टू) लायसन्स, एफएल फोर म्हणजे दारू पिण्याचा एकदिवसीय परवाना अशा विविध सुविधा आता ऑनलाइन मिळणार आहेत. यापूर्वी या सर्व सेवा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील राज्य उत्पादन शुल्क विभागातून पुरवल्या जात होत्या.

आतापर्यंत या सेवा घेण्यासाठी संबंधितांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात पोहोचून अर्ज भरून द्यावा लागत होता. यापुढे मात्र तशी गरज भासणार नसून या व्यक्ती ऑनलाइन साधनांचा वापर करून घरबसल्या अर्ज करू शकतात. केवळ अर्जच करू शकत नाहीत, तर त्या अर्जाला प्रतिसाद देत संबंधितांना ही सेवाही ऑनलाइनच पुरवली जाते. विविध ठिकाणाहून अन्य ठिकाणी दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनाचा वाहतूक परवानासुद्धा (टीपी) ऑनलाइन पुरवला जाणार असून दारूविक्रीपोटी प्राप्त होणारी कराची रक्कम, घाऊक आणि किरकोळ विक्रेत्यांची संख्या, टीपी किती वाहनांची आदी प्रश्नांची उत्तरेही ऑनलाइनच प्राप्त होणार आहेत. त्यासाठीची संपूर्ण तयारी झाली असून स्थानिक कार्यालयाने हे आव्हान स्वीकारल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अकोल्याचे जिल्हा अधीक्षक राजेश कावळे यांनी सांगितले.

ऑनलाइन परवान्याचा देशातील पहिलाच प्रयोग
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त प्राजक्ता लवंगारे (वर्मा) यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेला हा प्रकल्प अशा प्रकारचा देशातील पहिलाच प्रकल्प आहे. त्यांच्या मार्गदर्शनात तो राज्यभरात हाती घेण्यात आला आहे. महाराष्ट्रातील सर्व कार्यालयांसाठी सप्टेंबरअखेर ही त्याची डेडलाइन आहे. परंतु स्थानिक पातळीवर हे काम एप्रिल संपण्यापूर्वीच पूर्णत्वास जाईल, असा विश्वास जिल्हा अधीक्षक राजेश कावळे यांनी व्यक्त केला आहे.

X