आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्य, कलेच्या जोपासनेतूनच विवेकाची रुजवण, अर्थमंत्री पाटील यांचे प्रतिपादन

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

पुणे : समाजात वावरत असताना विवेक' अस्तित्वात आहे की नाही, हा प्रश्न मला पडतो. साहित्य आणि कलेची ज्या ज्या ठिकाणी जोपासना होते तिथे विवेक नांदतो. जोपर्यंत राजकारणी साहित्य आणि कलेचा आदर करणार नाहीत, तोपर्यंत समाजात विवेक रुजणार नाही, असे मत अर्थमंत्री जयंत पाटील यांनी शनिवारी येथे व्यक्त केले. येथील साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानतर्फे आयोजित १९ व्या साहित्यिक कलावंत संमेलनाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते.

यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित या दोनदिवसीय संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी व्यासपीठावर या संमेलनाचे अध्यक्ष संत साहित्य आणि लोकसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक, विचारवंत आणि लेखक डॉ. रामचंद्र देखणे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, प्रसिद्ध चित्रकार रविमुकुल, साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि संमेलनाचे स्वागताध्यक्ष दिलीप बराटे, रमेश गरवारे ट्रस्टचे संचालक डॉ.राजपाठक आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी मान्यवरांच्या हस्ते संमेलनाच्या स्मरणिकेचे आणि डॉ. राजेंद्र थोरात लिखित वारकरी संतदर्शन' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

पाटील म्हणाले की, भौतिकवादाचा पाठपुरावा करणारा आणि कला-साहित्याला दुय्यम स्थान देणारा समाज कालांतराने लोप पावतो, हा इतिहास आहे. आज विविध प्रश्नांनी देश पेटून उठलेला असताना महाराष्ट्र तुलनेने शांत आहे, याचे श्रेय साहित्य आणि कलेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील समाजात रुजलेल्या विवेकाला द्यावे लागेल. कला आणि साहित्याची जोपासना करणे, हे समाजातील प्रत्येक घटकाचे आद्य कर्तव्य आहे. त्याच कर्तव्याला जागत मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे. गिरगाव, दादर, गोरेगाव या मराठी बहुभाषिक भागातून मराठी माणसे आणि मराठी भाषा हद्दपार झाली आहे. आज मुंबईत मराठीतून कुणी संवाद साधल्यास समोरची व्यक्ती आपल्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहते. या पार्श्वभूमीवर पुण्याकडून लोकांच्या अपेक्षा खूप उंचावल्या असल्याचे ते म्हणाले.

विधानसभेतही भारुडाचे साक्षीदार...

या वेळी बोलताना जयंत पाटील यांनी राजकीय कोट्या करीत कोपरखळ्या मारल्या. ते म्हणालेे की, मागील पाच वर्षांत कोणत्याच साहित्य संमेलनाला आम्ही निमंत्रित नव्हतो. परंतु, आता आमंत्रणे यायला लागली आहेत आणि दिलीपभाऊ बराटे हे आमचेच असल्याने या निमंत्रणाचा स्वीकार केला. संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे हे या संमेलनाचे अध्यक्ष असून त्यांचा भारुडाचा कार्यक्रम आम्ही अनेकदा अनुभवला आहे. परंतु, आता विधानसभेच्या विरोधी बाकावरून भारूड सादर केले जाते आणि आम्हाला त्याचे साक्षीदार व्हावे लागते.
 

बातम्या आणखी आहेत...