आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
एंटरटेन्मेंट डेस्क : भारतीय सिनेसृष्टीत काही कलाकारांनी बालवयापासूनच अत्यंत सुरेख अभिनयाचे दर्शन घडवत रसिकांची मने जिंकली आहेत. यात ब्लॅक अँड व्हाईटच्या जमान्यापासून मराठमोळ्या बालकलाकारांचाही फार मोलाचा वाटा आहे. या परंपरेतील सहजसुंदर अभिनयाचा वारसा जपत मराठी सिनेमांसोबतच हिंदीतही आपल्या अभिनयाचा जलवा दाखवणारी मृणाल जाधव ही चुणचुणीत बालकलाकार आता एका नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'भयभीत' या आगामी मराठी सिनेमात मृणाल एका महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन दीपक नायडू यांनी केले आहे. 'अॅक्च्युअल मुव्हीज प्रोडक्शन्स’ आणि 'ब्राऊन सॅक फिल्म्स प्रा.लि’ यांची प्रस्तुती असलेल्या 'भयभीत' सिनेमाची निर्मिती शंकर रोहरा, दिपक नारायणी यांनी केली आहे.
मृणालचे नाव घेताच अजय देवगण अभिनीत 'दृश्यम' या हिंदी रहस्यपटातील छोट्या मुलीचा चेहरा डोळ्यांसमोर उभा राहतो. 'दृश्यम'सोबतच 'तू ही रे', 'लय भारी', 'नागरीक', 'कोर्ट', 'टाईमपास २', 'अ पेईंग घोस्ट' आणि 'अंड्याचा फंडा' या मराठी सिनेमांमध्येही प्रेक्षकांना मृणालच्या अभिनयाची जादू पहायला मिळाली आहे. 'राधा ही बावरी' या मालिकेद्वारे अभिनयात पदार्पण करणाऱ्या मृणालची 'उंच माझा झोका' या मालिकेतील भूमिकाही स्मरणात राहण्याजोगी होती. बालवयातच गाठीशी आलेल्या अभिनयाच्या अनुभवावर मृणालने 'भयभीत' या आगामी मराठी सिनेमात आणखी एक लक्षवेधी व्यक्तिरेखा साकारली आहे. हा सस्पेंस-थ्रीलर पठडीत मोडणारा सिनेमा असल्याचे शीर्षकावरूनच लक्षात येते. मृणालने साकारलेली श्रेया ही व्यक्तिरेखाही सिनेमाच्या जॅानरला पूरक ठरणारी आहे.
कथानकासोबतच आपापल्या व्यक्तिरेखांआधारे यातील कलाकार २८ फेब्रुवारीपासून प्रेक्षकांना 'भयभीत' करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.