आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली- माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी शुक्रवारी पंचतत्त्वात विलीन झाले. त्यांच्या शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. राजघाटाजवळील राष्ट्रीय स्मारकाच्या ठिकाणी त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. अंत्यसंस्कारापूर्वी भाजपच्या मुख्यालयातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यात्रेत चार किलोमीटर पायी चालले. त्यांच्यासमवेत अनेक केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्रीही सहभागी झाले होते. तत्पूर्वी वाजपेयी यांच्या निवासस्थानावर त्यांच्या अंत्यदर्शनासाठी गुरुवारी रात्रीपासूनच समर्थकांनी गर्दी करायला सुरुवात केली होती. वाजपेयींची दत्तक कन्या नमिता भट्टाचार्यने भडाग्नी दिला.
३१ पैकी २६ राज्यांचे मुख्यमंत्री, संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ सहभागी
अमेरिका : वाजपेयींच्या दूरदृष्टीमुळे आज भारत व अमेरिका संबंध सुधारले आहेत. या देशांतील लोकशाही मूल्यांची जाण वाजपेयींना पूर्वीपासून होती, असे अमेरिकी विदेशमंत्री माइक पोंपियो म्हणाले.
बांगलादेश : आमच्या स्वातंत्र्यलढ्यातील वाजपेयी यांचे योगदान आमची जनता कधीही विसरू शकणार नाही. त्यांना बंगाली संगीताची खूप आवड होती, असे बांगलादेशचे विदेशमंत्री अब्दुल हसन म्हणाले.
ब्रिटन : वाजपेयी यांच्या सन्मानार्थ मॉरिशस आणि भूतान या देशांनी राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर घेतले. दिल्लीत ब्रिटिश वकिलातीनेही युनियन जॅक अर्ध्यावर घेऊन श्रद्धांजली अर्पण केली.
> ८ सार्क देशांसह २०हून अधिक देशांचे प्रतिनिधी उपस्थित. भूतान नरेश वांगचूक, बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका आणि नेपाळच्या मंत्र्यांची श्रद्धांजली.
> एनडीएच्या १८ राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी. ८ इतर सीएमची श्रद्धांजली.
दत्तक कन्या नमिता भट्टाचार्यने भडाग्नी दिला
नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयापासून माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची अंत्ययात्रा सुरू झाली. त्यांचे पार्थिव गुरुवारी रात्री ६-कृष्ण मार्गावर निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात अाले हाेते.
अंत्यदर्शनानंतर त्यांचे पार्थिव १० वाजून १४ मिनिटांनी भाजपच्या मुख्यालयाकडे निघाले. त्यांचे पार्थिव व अंत्ययात्रेसाठी लष्कराने गन कॅरेज (विशेष व्यक्तींच्या पार्थिवाला नेण्यासाठी वापरले जाणारे वाहन) तयार केले होते. हे संपूर्ण वाहन फुलांनी सजवलेले होते. वाजपेयींचे पार्थिव अकबर रोड, इंडिया गेट, टिळक मार्ग, दीनदयाल मार्गाने ११ वाजून ४ मिनिटांनी भाजपच्या मुख्यालयात पोहोचले. येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शहा प्रवेशद्वारावर उभे होते. त्या अगोदर मार्गावर लोकांनी वाहनावर फुले उधळून आपल्या लाडक्या अटलजींना अखेरचा निरोप दिला. मार्गावर ‘अटलजी अमर रहें, अमर रहें’, ‘भारतमाता की जय’, ‘वंदेमातरम्’ अशा घोषणा दिल्या जात होत्या.
खिसेकापू होते सक्रिय
वाजपेयींच्या अंत्ययात्रेत खिसेकापूदेखील सक्रिय होते. गर्दीचा फायदा घेत चोरांनी मोबाइलवर डल्ला मारला. पीडितांनी वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत त्याबद्दलच्या तक्रारी नोंदवल्या आहेत. भाजपचे कार्यकर्ते जे. श्रीनिवास म्हणाले, अंत्यदर्शन करताना माझे पैशांचे पाकीट लांबवले. त्यात ४ एटीएम, पॅन कार्ड, आधार कार्ड व रोख ४ हजार रुपये होते.
अटलजींना जाणून घेऊया त्यांचे निकटवर्तीय अडवाणी यांच्या नजरेतून...
अटलजीच कुटुंबप्रमुख होते...
सत्तेच्या खेळाने प्रेरित असलेले राजकारण स्पर्धात्मक व कलहाचे कारण ठरते. दशकांपासून माझे व अटलजींचे संबंध मात्र अशा कोणत्याच स्पर्धेत नव्हते. माझे विचार आधी पक्ष व नंतर सरकार असे होते. त्यात अटलजींचे वाक्य मात्र अंतिम असावे , असे मला वाटत. सामूहिक नेतृत्व कधीही एका नेत्याद्वारे कधीच श्रेष्ठ ठरू शकत नाही. कुटुंबप्रमुखाशिवाय कुटुंब टिकत नसते.
अटलजी नकारात्मक विचारांपासून नेहमीच दूर राहिले, त्यांच्या विडंबनावर लोक संतापत, पण व्यथित मुळीच होत नसत
अटलजी बहुतांश वेळा विरोधी बाकावर राहिले. दीर्घकाळ विरोधी पक्षात राहणाऱ्या नेत्यांत अनेकदा कटुता येते. ते टीकाकार होतात. मात्र, अटलजी नकारात्मक विचारांपासून दूर होते. सत्ताधारी पक्षावर अनेक गंभीर आरोप करताना मी त्यांना अनेकदा पाहिले. उपरोधिक शैलीतून ते बोलत. त्यामुळे संताप निर्माण झाला तरी कोणी व्यथित झाले नाही. अटलजी व संघाचा संबंध वादाचा विषय राहिला आहे. जनता पार्टीने त्यांना केलेला विरोध मला चांगला आठवतो. अटलजींना परराष्ट्रमंत्री करण्यास तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी प्रस्ताव मांडला होता. त्यास तीव्र आक्षेप घेतल्याचा प्रसंग मला आठवतो. वाजपेयी संघाचे आहेत. पाकिस्तानसोबतचे आपले संबंध बिघडतील, असा तो आक्षेप होता. पण १९७७-७९ दरम्यान अटलजी परराष्ट्रमंत्री होते तेव्हा भारत-पाक संंबंधाचा सुवर्णकाळ होता, हे सर्वच मान्य करतात. १९९१ मध्ये पाकचे पंतप्रधान शरीफ राजीव गांधी यांच्या अंत्यसंस्कारासाठी दिल्लीला आले होते. त्यांच्या निमंत्रणावर अटलजी व मी अशोक हॉटेलला गेलो होतो. तेव्हा शरीफ म्हणाले होते, ‘वाजपेयीजी, मी तुम्हाला कधीही भेटलो नाही. दोन्ही देशांतील संबंध तुमच्यामुळे अत्यंत मधुर राहिले होते, हे सांगायला मला संकोच वाटत नाही. त्यानंतर मात्र संबंध तसे राहिले नाहीत.’
राम रथयात्रेनंतर मीडियाने अटलजींना उदार व मला कट्टर हिंदुत्ववादी बनवले...
१९९० मध्ये अयोध्या आंदोलनाच्या समर्थनासाठी मी राम रथयात्रा काढली होती. त्यानंतर प्रसार माध्यमांनी अटलजी व मला वेगवेगळ्या रुपांत मांडायला सुरूवात केली. अटलजींना उदार संबोधले गेले व मला कट्टर हिंदू. सुरूवातीला मी या गोष्टीने व्यथित झालो. कारण हा दावा वास्तवाला धरून नव्हता. माझ्या या चिंतेवर काही सहकाऱ्यांनी मला चिंता करू नका, असा सल्ला दिला. त्यातून भाजपला दोन्ही प्रतिमांचा लाभ होईल, असे त्यांचे म्हणणे होते. एक नेता उदार दुसरा कट्टर हिंदू.१९९५ मध्ये पक्षाच्या मुंबईतील अधिवेशनात तशाच प्रकारचा संदेश बाहेर आला. तेव्हा अध्यक्ष या नात्याने मी आगामी निवडणुकीसाठी अटलजींना भाजपकडून पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून जाहीर केले. पक्ष व संघाच्या लोकांनी मला या घोषणेबद्दल झिडकारले होते. ‘ जनादेशानंतर सरकार चालवण्यासाठी तुम्हीच योग्य आहात’, असे त्यांनी मला सांगितले होते. मी तुमच्या मताशी सहमत नाही. लोकांच्या नजरेत जननायकाच्या तुलनेत विचारवंत जास्त मानले जाते, असे मी त्यांना सांगितले.
मतभेद : गोध्रा कांडानंतर गुजरातमधील हिंसाचाराबद्दल अटलजींच्या मनावर आेझे
दोन मुद्दे मी सांगतो. तेव्हा अटलजी व माझ्यात खूप मतभेद निर्माण झाले होते. अयोध्या आंदोलनाशी भाजपला थेट जोडण्याचाही एक मुद्दा होता. त्यावर वाजपेयींना आक्षेप होता. परंतु धारणा व स्वभावाने लोकशाहीवादी असल्याने सर्वसहमती घेण्यात आली. त्यानंतर अटलजींनी पक्षाचा निर्णय स्वीकारला.
दुसरे उदाहरण २००२ मधील गोध्रामधील कारसेवकांच्या नरसंहारानंतर गुजरातमध्ये उसळलेल्या दंगलीचे आहे. विरोधकांनी तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याची मागणी केली. रालोआमधील काही लोकांना मोदींनी पद सोडावे असे वाटत होते. परंतु माझा विचार वेगळा होता. गुजरातमध्ये समाजाच्या विविध वर्गांशी केलेल्या चर्चेनंतर मोदींना
निशाणा करणे योग्य नसल्याचे लक्षात आले. गुजरातच्या घटनेमुळे अटलजी व्यथित झाले होते, हे मला ठाऊक होते. अटलजींचा मनावरील ते आेझे बनले होते. काहीतरी ठोस व सकारात्मक केले पाहिजे, असे त्यांना वाटत.
वर्ल्ड लीडर.....
बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी अटलजींचे योगदान स्मरते : हसन
बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री अब्दुल हसन महमूद अली यांनी अटलजींना श्रद्धांजली अर्पण केली. ते म्हणाले, बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यात अटलजींचे महत्त्वाचे योगदान होते. ही गोष्ट जनतेला ठाऊक आहे. त्यांना बांग्ली संगीत खूप आवडायचे.
वाजपेयींनी अमेरिका-भारत संबंध सुधारले : माइक पॉम्पिआे
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिआे म्हणाले, माजी पंतप्रधान वाजपेयी यांचा दृष्टिकोनामुळेच भारत व अमेरिकेत आज चांगले संबंध आहेत. त्यांनी फार पूर्वीच दोन्ही देशांतील लोकशाही मूल्यांना आेळखले होते.
अटलजींचे शांतता प्रयत्न आम्ही सदैव स्मरणात ठेवू : इम्रान खान
भारत-पाकिस्तान यांच्यातील शांतता प्रक्रियेत अटलजींनी दिलेल्या योगदानाचे आम्ही सदैव स्मरण करू. अटलजींनी उपखंडातील मोठे नेते होते. भारत-पाक संबंध सुधारण्यासाठी ते प्रयत्नशील होते, असे इम्रान खान यांनी म्हटले आहे.
मैत्रीचा संदेश घेऊन बसने आले होते...
भारतानंतर पाकिस्तानातील लोकांनी अटलजींचे सर्वात जास्त स्मरण केले. पाक खासदार मुशाहिद हुसैन सय्यद म्हणाले, भारताचा महानायक जाणे ही मोठी हानी आहे. दुसऱ्या नेत्यांनी शांततेसाठी केवळ भाषणे ठोकली. परंतु वाजपेयींनी चर्चेच्या पुढे जाऊन नैतिक साहस दाखवले होते. १९९८ मध्ये अण्वस्त्र चाचणीनंतर दोन्ही देशांनी नवीन सुरूवात केली पाहिजे, याची त्यांना जाणीव होती.
वर्ल्ड मीडिया.....
अमेरिका, ब्रिटन, जपानसह जगभरातील मीडियाने संबोधले, ‘भारताने सर्वात करिश्मा असलेला नेता गमावला..’
अटलजींच्या निधनाला जगभरातील प्रसार माध्यमांनी ठळक स्थान दिले. दक्षिण आशिया, अमेरिका, जपान, रशिया, ब्रिटनच्या वृत्तपत्रांनी त्यांच्याविषयी म्हटले की, भारताने आपला सर्वात करिश्मा असलेला नेता गमावला. त्यांनी भारताला अण्वस्रसज्ज तर बनवलेच. परंतु शांती प्रक्रियेला देखील गती दिली होती. त्यामुळे दक्षिण आशियात शांतता प्रस्थापित होऊ शकली. सर्व देशांतील माध्यमांनी अटलजींच्या परराष्ट्र धोरणाचे कौतुक केले. ते प्रखर वक्ता, कवी, पत्रकार व वकील होते, याचाही उल्लेख केला. जागतिक मीडियाने त्यांना जंटलमन, असेही संबोधले. त्यांचे परराष्ट्र धाेरण कमालीचे होते. त्यामुळे भारताला बळकटी मिळाली.
वॉशिंग्टन पोस्ट : अटलजींमुळेच २० वर्षांनंतर अमेरिकी राष्ट्राध्यक्षांचे भारतात झाले होते आगमन
वॉशिंग्टन पोस्ट लिहिते, भारताला अण्वस्त्रसज्ज करणारे पंतप्रधान वाजपेयी यांचे ९३ व्या वर्षी निधन झाले. त्यांनी भारताला आण्विक शक्ती संपन्न राष्ट्र बनवण्याबरोबरच अमेरिकेसोबतच्या संबंधांना तणावमुक्त केले. अमेरिकेने अण्वस्त्र चाचणीनंतर भारताशी चर्चा बंद करताना निर्बंध लादले होते. पण वाजपेयींनी मागील दाराने राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्याशी मैत्रीपूर्ण चर्चा केली. त्यामुळे २००० मध्ये क्लिंटन भारतात आले. दोन दशकांनंतर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा ही पहिलीच भारत भेट होती.
द गार्डियन : सीमेच्या दोन्ही बाजूस शांततेसाठी अटलजींचे अथक प्रयत्न
अटलजींना तीनवेळचे पंतप्रधान, एक हिंदुत्ववादी नेता म्हणून जगात आेळखले जाईल. त्यांनी पाकिस्तानसोबत अण्वस्त्र स्पर्धा सुरू केली. राजकीय नेता म्हणून त्यांनी सीमेपलिकडे तसेच देशात शांततेसाठी प्रयत्न केले होते. त्यासाठी ते १९९९ मध्ये लाहौरला गेले होते. तेव्हा अटलजींनी जगाला ब्लॅक अँड व्हाईट लेन्सने पाहायला लावल्याचे गार्डियनने म्हटले होते.
> बीबीसी व न्यूयॉर्क टाइम्स म्हणाले की, ‘दोन दशकांपूर्वी अण्वस्त्र चाचणी करून जगाला चकीत केले होते. पुढे त्यांनी शांतता प्रक्रियेला पुढे नेण्यासाठी कोणतीही कसर सोडली नव्हती. ’
पुढच्या स्लाइडवर पाहा, अंत्यदर्शन घेताना मान्यवर नेते...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.