आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासगी सावकारांनी कार्यक्षेत्राच्या बाहेर शेतकऱ्यांना दिलेली कर्जेही आता माफ

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : विदर्भ व मराठवाड्यातील सावकारांनी त्यांच्या परवान्यात नमूद क्षेत्राच्या बाहेरील शेतकऱ्यांना दिलेली कर्जे माफ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय साेमवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. येत्या चार-पाच दिवसांत विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे, या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारने शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत एकाच दिवशी सुमारे ३७ निर्णयांचा धडाका लावला.

यापूर्वी राज्य शासनाने एप्रिल २०१५ मध्ये दुष्काळग्रस्त विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकारांकडून घेतलेली कर्जे माफ करण्याचा निर्णय घेतला हाेता. त्यानुसार १९ जिल्ह्यांमध्ये समित्यांची स्थापना करण्यात आली होती. या समितीच्या मंजुरीनुसार ३१ मार्च २०१८ पर्यंत ४६ हजार ७३५ शेतकऱ्यांची ५५ कोटी ९६ लाख ६५ हजार रुपयांची मुद्दल आणि १० कोटी ५९ लाख ७३ हजार रुपयांचे व्याज असे एकूण ६६ कोटी ५६ लाख ३८ हजार रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले आहेत. ही रक्कम संबंधित १३९३ सावकारांना देण्यात आली आहे. मात्र १० एप्रिल २०१५ च्या आदेशानुसार, शासनाने संबंधित सावकाराने परवाना क्षेत्राबाहेरील व्यक्तीस दिलेले कर्ज अपात्र ठरवले हाेते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या डाेक्यावरील कर्ज तसेच राहिले. अशा शेतकऱ्यांना सावकारी कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी कार्यक्षेत्राची अट शिथिल करण्याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी मागवला हाेता. त्यास मंजुरी देण्यात आली. या याेजनेत शेतकऱ्यांना दिलेले ३० नोव्हेंबर २०१४ पर्यंतचे कर्ज वैध ठरेल.

सर्वांसाठीच अच्छे दिन : शेतकरी, शिक्षक, महिला बचत गटांना केले खुश
तंत्रश‍िक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील १३३ शासकीय तथा अशासकीय अनुदानित पदवी व पदविका संस्थांमधील ३,५२८ शिक्षक व समकक्ष पदांना सातव्या वेतन आयोगाच्या सुधारित वेतन संरचना १.१.२०१६ पासून लागू करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.

लातूर, उस्मानाबाद वॉटरग्रीड; ३१२२ कोटींच्या निविदा
लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांसाठी प्रस्तावित ग्रीडच्या मुख्य व दुय्यम जलवाहिन्या, जलशुद्धीकरण यंत्रणा आदी कामांसाठी ३,१२२ कोटींच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. हायब्रीड ॲन्युटी तत्त्वावर या कामांसाठी निविदा काढण्यात येणार आहे. या कामासाठी इस्रायल मेकोरोट डेव्हलपमेंट अँड एंटरप्रायजेस कंपनीसोबत करार करण्यात आला. या प्रकल्पात लातूर जिल्ह्यासाठी १११.२८ किमी एमएस पाइप, तर ४९५.८५ किमी डीआय पाइपलाइन अशी ६०७.१३ किमी पाइपलाइन प्रस्तावित आहे. तर उस्मानाबाद जिल्ह्यासाठी ३७.९२ किमी एमएस पाइप, तर ६६५.७५ किमी डीआय पाइपलाइन अशी ७०३.६७ किमी पाइपलाइन प्रस्तावित आहे. 

पीएचडीधारक अधिव्याख्यात्यांना १९९६ पासून दोन वेतनवाढी
राज्यातील अकृषी विद्यापीठे व संलग्नित अशासकीय अनुदानित महाविद्यालयांतील १ जानेवारी १९९६ पूर्वी पीएचडी पूर्ण करणाऱ्या अधिव्याख्यात्यांना १ जानेवारी १९९६ पासून दोन आगाऊ वेतनवाढी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. या अध्यापकांना २७ जुलै १९९८ पासून या वेतनवाढी यापूर्वीच देण्यात आल्या होत्या. राज्यातील पीएचडी अर्हताप्राप्त अधिव्याख्यात्यांना दोन वेतनवाढी मंजूर करण्यात आल्या होत्या. मात्र, या वेतनवाढी १९९६ पासून करण्याचे शासनाच्या विचाराधीन होते. त्यानुसार हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

विदर्भ, मराठवाड्यातील बचत गटांत कुक्कुट विकास कार्यक्रम
विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातील १९ जिल्ह्यांमध्ये प्रती जिल्हा १०० बचत गटातील एक हजार लाभार्थी याप्रमाणे १९ हजार लाभार्थींना कोंबड्यांचे गट वाटप आणि कुक्कुट विकासाचे निर्धारित उपक्रम राबवण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या १९ जिल्ह्यातील प्रत्येकी १ हजार लाभार्थींना सुधारित देशी जातीच्या १०० कोंबड्या ५०% अनुदानावर पुरवल्या जातील.

शासकीय सेवा देऊ इच्छिणाऱ्यांना वैद्यकीय प्रवेशात आरक्षण
शासकीय वैद्यकीय सेवेमध्ये दीर्घकाळ काम करण्यास इच्छुकांना शासकीय व पालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांत प्रवेशासाठी आरक्षण देण्याच्या विधेयकास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. पदवी अभ्यासक्रमासाठी १०%, तर पदव्युत्तरसाठी २०% राखीव जागा असतील. पदवीधारक उमेदवारांना ५ वर्षे, तर पदव्युत्तर उमेदवारांना ७ वर्षे शासकीय सेवा देणे सक्तीचे असेल.

 

कृषी व ग्रामीण परिवर्तनासाठी स्मार्ट प्रकल्पास मंजुरी
कृषिपूरक उत्पादनांसाठी तसेच विविध पिकांच्या काढणीपश्चात हाताळणी, व्यवस्थापन, प्रक्रिया उद्योग व बाजार जोडणी व्यवस्था निर्माण करण्यासाठी राज्यात ६ वर्षांसाठी महाराष्ट्र राज्य कृषी व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) राबवण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. शेतकऱ्यांच्या संस्थांना 'मूल्य साखळी प्रकल्प' उभारण्यासाठी या प्रकल्पातून अर्थसाहाय्य दिले जाईल.
 

बातम्या आणखी आहेत...