आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउस्मानाबाद : उस्मानाबादेत सुरू असलेले ९३ वे मराठी साहित्य संमेलन अराजकीय करण्याची नवी परंपरा जन्माला घालताना महामंडळाने लोकप्रतिनिधींनाही मंचापासून दूर ठेवले. त्यामुळे जिल्ह्यातील एकही आमदार, खासदार तसेच ज्या शहरात संमेलन होत आहे, त्या शहराचे प्रथम नागरिक तथा नगराध्यक्षही संमेलनाकडे फिरकले नाहीत. नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी तर अराजकीय संमेलन करा, पण मग राजकीय नेत्यांकडून मदत कशाला घेता, असा सवाल केला. ते म्हणाले, आमचा नव्हे नगराध्यक्षांच्या खुर्चीचा तरी मान राखायला हवा होता.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने यावर्षीपासून संमेलन अराजकीय करण्याचा निश्चय केला होता. या संमेलनातून अनेक मापदंड घातले जातील, असे संयोजकांकडूनही संागण्यात येत होते. त्याची प्रचिती संमेलनाच्या पहिल्या दिवशी अर्थात उद्घाटन सत्राच्या कार्यक्रमातून आली. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौितकराव ठाले-पाटील यांनी संमेलनात कुठल्याही राजकीय नेत्याला मंचावर स्थान दिले जाणार नाही, मात्र, ते संमेलनाला येऊ शकतात, असे १५ दिवसांपूर्वीच जाहीर केले होते. त्यानुसार संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेत एकाही राजकीय नेत्याचे किंवा स्थानिक लोकप्रतिनिधींचे नाव नव्हते. त्यामुळे संमेलनाच्या आयोजनापासून राजकीय नेते तसेच त्यांचे कार्यकर्ते अलिप्त राहीले.
संमेलनाच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी सकाळी ग्रंथदिंडीच्या उद्घाटनादरम्यान शिक्षक आमदार विक्रम काळे जिल्हा क्रीडा संकुलावर आले होते. मात्र,त्यांचा विशेष सन्मान झाला नाही किंवा नामोल्लेख करण्यात आला नव्हता. उमरग्याचे आमदार ज्ञानराज चौगुलेही काही वेळापुरतेच ग्रंथदिंडीमध्ये दिसले. सायंकाळी संमेलनाच्या मुख्य उद्घाटन समारंभात मंचावर महामंडळाचे पदाधिकारी, संमेलनाचे अध्यक्ष, मावळत्या अध्यक्षा, स्थानिक समितीमधील पदाधिाकरी उपस्थित होते. या दरम्यान लातूरचे पालकमंत्री तथा सांस्कृतीकमंत्री अमित देशमुख, राज्यमंत्री संजय बनसोडे देखील संमेलनाला आले होते.
मात्र, त्यांना मंचावर न बोलावता समोर विशेष निमंत्रितांमध्ये आसनव्यवस्था करण्यात आली. त्यांच्यासमवेत शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे, पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण हेही संमेलनाला आले. त्यांनाही मंचासमोरील निमंत्रितामध्ये स्थान मिळाले. मंचावरील मान्यवरांप्रमाणे या लोकप्रतिनिधींचा सन्मान करण्यात आला. मात्र, काही वेळातच दोन्ही आमदार कार्यक्रमातून उठून गेले. त्यामुळे त्यांची नाराजी लपून राहीली नव्हती. तर सगळ्यात महत्वाचे म्हणजे उस्मानाबादेत संमेलन होत असल्याने नगर पालिकेने संमेलनाला मोठ्या प्रमाणात मदत केली होती. यामध्ये अर्थातच नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांचीही महत्वाची भूमिका होती. मात्र, त्यांच्या नावाचाही पत्रिकेत उल्लेख नव्हता. त्यामुळे ते संमेलनाच्या मुख्य उद्घाटन सोहळ्याला अनुपस्थित राहिले. त्यांची अनुपस्थिती चर्चेची ठरली.
संमेलन अराजकीय, मदत कशाला घेता, खुर्चीचा मान राखायला हवा : नगराध्यक्ष
यासंदर्भात संपर्क साधला असता नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर म्हणाले, नगर पालिकेकडून संमेलनाला सुमारे २५ लाख रुपयांपर्यंतची मदत करण्यात आली आहे. आपल्या शहरात संमेलन होत असल्याने मदतीची भावना होती. मात्र, दोन दिवसांपूर्वी पत्रिका आली. त्यात नावाचा उल्लेख नव्हता. अशा संमेलनाला का जायचे, संमेलन अराजकीय करायचे तर मग राजकीय नेत्यांची मदत कशासाठी घ्यायची, स्वागत समितीमध्ये राजकीय नेते कसे काय, वैयक्तीक मान नव्हे, मात्र, खुर्चीचा मान राखायला हवा होता, असे नगराध्यक्ष म्हणाले.
नगराध्यक्षांसह स्थानिक आमदार-खासदारांची संमेलनाला अनुपस्थिती
नगराध्यक्ष मकरंदराजे शुक्रवारी शहरात होते. मात्र, तरीही पत्रिकेत नाव नसल्याने त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करत संमेलनाकडे न जाण्याचा निर्णय घेतला. खासदार ओमराजे निंबाळकर दिल्लीला बैठकीला गेल्याने उपस्थित राहू शकले नाहीत. आमदार कैलास पाटील पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलाविल्याने औरंगाबादला गेले होते. परंड्याचे आमदार डॉ.तानाजी सावंत, तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील हेही संमेलनाला अनुपस्थित राहीले.दीड वर्षापूर्वी झालेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे स्वागतध्यक्ष राहीलेेले परंड्यातील भाजपचे विधान परिषद सदस्य सुजितसिंह ठाकूर यांनीही संमेलनाकडे पाठ फिरवली.
मी नाराज नाही, बैठकीसाठी बाहेर होतो
संमेलनाच्या पत्रिकेत नाव नसले तरी मी नाराज वगैरे नाही. सर्व जिल्हाप्रमुखांची बैठक असल्याने मी औरंगाबादला गेलो होतो. उद्या मुंबईत बैठक असल्याने तिकडे जावे लागत आहे. -कैलास पाटील, आमदार
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.