आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्थानिक पोलिस ‘फेल’; एसपी, आयजी यांच्या पथकांकडून कारवाईला सुरुवात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना - जिल्ह्यात १७ पोलिस ठाणे आणि त्यात दीड हजारावर  पोलिसांची संख्या आहे. तरीही जिल्ह्यात चोरी व दरोड्यांच्या घटनांत वाढत असल्याने आता पोलिस अधीक्षक आणि विशेष पोलिस महानिरीक्षकांनी स्वत:ची पथके स्थापन करून गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.  चालू वर्षात ऑक्टोबर अखेरपर्यंत तब्बल ४ हजार ८८६ गुन्हे घडले. यात दरोड्यांचे अनेक गुन्हे तपासाअभावी प्रलंबित आहेत. वारंवार  दरोड्याच्या घटना घडत असल्याने अनेक गावे दहशतीखाली  आहेत. दरम्यान, २०  दिवसांत चार घटनांमध्ये  तब्बल ७६ लाखांचा ऐवज  चोर-दरोडेखोरांनी लंपास केला आहे.  जालना पोलिस तपासात अपयशी ठरत असल्याने आता विशेष पोलिस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल यांच्या पथकांनीही जिल्ह्यात टेहळणी सुरू केली आहे. 


जिल्ह्यात दर वर्षाला ३ हजारावर  गुन्हे घडतात. यात बहुतांश गुन्हे चोरी, लूटमार व दरोड्यांसारखे असल्यामुळे पोलिसांवरचा ताण वाढत चालला आहे. जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांपासून विविध ठिकाणी दरोडे पडले आहेत. यातील  बोटावर मोजण्याइतकेच दरोडे पोलिसांकडून उघडकीस झाले आहेत. परंतु, ज्या दरोड्यांनी गावेच्या गावे धास्तीखाली आहेत ते गुन्हे मात्र,  जालना पोलिसांना उघडकीस आणता आले नाहीत.   तीन महिन्यांपूर्वी आष्टीतील  दरोडा, घनसावंगी तालुक्यातील राजाटाकळी गावात एकाच रात्री अकरा तर भोकरदन शहरातही एकाच रात्रीत सात घरांमध्ये चोऱ्या झाल्या. पोलिसांनी पथके स्थापनही करूनही आरोपी  सापडले नसल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे मुत्याल यांनीच यात लक्ष घालून तपासासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

 

२० दिवसांतील चार घटनांची उकल नाही 

रेल्वे स्थानक > २६ ऑक्टोबर : जालना रेल्वे स्थानकात उभ्या असलेल्या व्यापाऱ्याला धारदार शस्त्र लावून २७ लाख असलेली बॅग लंपास.

 
नवीन मोंढा >०४ नोव्हेंबर : सीसीटीव्ही व दुकानाचे शटर तोडून ४५ लाखांचे सिगारेटचे खोके चोरट्यांनी केले लंपास.  


पिंपरखेड ता. अंबड >०५ नोव्हेंबर : धारदार शस्त्राचा वार करून महिलांच्या अंगावरील २० हजारांचे दागिने ओरबाडले. बाप-लेक गंभीर जखमी.  


आष्टी ता. परतूर >१० नोव्हेंबर : व्यापाऱ्याच्या घरी दरोडा टाकून ६ लाख रुपयांचा ऐवज लंपास. (परराज्यातून तीन संशयित ताब्यात)

 

अनेक ठिकाणी झाली लूटमार
जालना जिल्ह्यात ५ सप्टेंबर रोजी परतूर तालुक्यातील आष्टी येथे दरोडेखोरांनी महिलेच्या गळ्याला धारदार शस्त्र लावून ५ लाख ३६ हजारांचा ऐवज लुटला. ८ सप्टेंबर रोजी अंबड तालुक्यातील कुरण शिवारात पती-पत्नीला शस्त्राचा धाक दाखवून ३ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटला. ९ सप्टेंबर रोजी अंबड तालुक्यातील वडीकाळ्या येथे वृद्ध दांपत्यावर शस्त्राने वार करून ५० हजारांचा मुद्देमाल लंपास केला. आमदार राजेश टोपे यांचे पीए गणेश भवर यांचे घर भरदिवसा फोडून आठ तोळे सोन्यासह ४ लाख ५८ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

 

आयजींची पथके कार्यरत
जालना पोलिसांना गुन्ह्यांची उकल होत नसल्यामुळे आयजींच्या पथकाने जिल्ह्यात टेहळणी सुरू केली. बारा दिवसांपूर्वीच जालना शहरातून गांजाचे प्रकरण उघडकीस आणले. जिल्ह्यात खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, दरोडा, जबरी चोरी, चेन स्नॅचिंग, घरफोडी,, मोबाइल चोरी, दुचाकी, चारचाकी चोरी, विनयभंग आदी गुन्हे घडतच आहेत. जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांतील पोलिस निरीक्षकांनाही अपयश येत असल्याने अपर पोलिस अधीक्षक समाधान पवार यांचे  पथक तालुका, शहर, गाव पातळीवरील असलेले गुन्हे उघडकीस आणत आहेत. 

 

सदर बाजार पोलिस ठाणे तपासात सर्वात खाली : जालना शहरासाठी असलेले सदर बाजार पोलिस ठाणे गुन्ह्यांची उकल करण्यात सर्वांत खाली आहे.  वर्षात ३०० गुन्हे दाखल झाले असून केवळ २०४ गुन्हे उघड केले. जिल्ह्यातील सतरा पोलिस ठाण्यांपैकी सदर बाजार ठाण्याकडून वर्षभरात केवळ ६८ टक्केच गुन्ह्यांची उकल झाली आहे.

 

सीसीटीव्हीत कैद  आरोपीही सापडेनात
जालना शहरातील नवीन मोंढा भागात ४ नोव्हेंबर रोजी झालेल्या चोरीत आरोपी स्पष्ट कैद झाले आहेत. परंतु, यानंतरही जालना पोलिसांना ते ताब्यात घेता आलेला नाही.  पोलिसांचे खबरेही थंडावल्याचे दिसत आहे.

 

प्रलंबित गुन्ह्यांचा तपास  
प्रलंबित गुन्ह्यांच्या तपासासाठी विविध जिल्ह्यातील पथकांची मदत घेतली जाते.  प्रलंबित गुन्ह्यांचा तपास लावण्याचे आदेश दिले आहेत.  
- प्रकाश मुत्याल, विशेष पोलिस महानिरीक्षक

 

तपासासाठी वरिष्ठांची मदत घेतोय 
जिल्ह्यातील  दरोड्यांच्या तपासासाठी वरिष्ठ पातळीवरूनही मदत घेतली जात आहे. सध्या जिल्ह्यात पेट्रोलिंग वाढवण्यात आली  आहे.     
- एस. चैतन्य, पोलिस अधीक्षक, जालना. 

बातम्या आणखी आहेत...