आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Lok Sabha Has A Huge Uproar Over Rahul Gandhi's Shocking Statement: 'The Country Is Not Currently In Make In India But Rap In India'

'देशात सध्या मेक इन इंडिया नाही तर रेप इन इंडिया...', राहुल गांधींनी माफी मागावी; स्मृती ईरानींची मागणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राहुल गांधींनी माफी मागण्याची भाजप खासदारांची मागणी

नवी दिल्ली - काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या 'रेप इन इंडिया' या विधानावरून शुक्रवारी लोकसभेत भाजपच्या सदस्यांनी राहुल यांनी माफी मागावी, अशी मागणी केली. तसे करण्यास राहुल यांनी नकार दिल्याने सभागृहात गदारोळ झाला. अशा वक्तव्यामुळे सदस्याला संसदेत राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार उरलेला नाही, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले. त्याच वेळी भाजपच्या महिला खासदारांनी वेलजवळ गर्दी केली. त्यामुळे गदारोळात जास्तच भर पडल्याचे पाहायला मिळाले.

भाजपच्या महिला खासदारांनी गर्दी केल्यामुळे लोकसभा अध्यक्ष आेम बिर्ला यांनी लोकसभेचे कामकाज दोनवेळा तहकूब केले. त्यानंतर पुन्हा कामकाज सुरू झाले. परंतु, गदारोळ थांबला नाही. या गोंधळात द्रमुकच्या कनिमोझी यांनी गांधी यांच्या वक्तव्याचे समर्थन केले. गांधींनी हे विधान सभागृहाबाहेर केले आहे. त्याचबरोबर ते देशातील वाढत्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांच्या संदर्भात बोलत होते, असे त्यांनी सांगितले.

त्याचवेळी काँग्रेसचे सदस्य गांधी यांना पाठिंबा देण्यासाठी घोषणाबाजी करत आसनावर वेलच्या दिशेने आले. प्रश्नोत्तरात तणाव वाढला. गांधींच्या वक्तव्याप्रकरणात भाजपच्या अनेक सदस्यांनी स्थगन प्रस्तावाची मागणी केली. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी घणाघाती टीका केली. राहुल यांनी देशातील पुरुष व महिलांचा अपमान केला आहे. त्यांनी तत्काळ माफी मागितली पाहिजे. गांधी कुटुंबातील एखाद्या मुलाने भारतातील महिलांवर अत्याचार होत असल्यावरून इतिहासात पहिल्यांदाच आवाज उठवला आहे.

परंतु, त्यांनी देशातील बलात्काराच्या घटनांचे राजकारण केले आहे. देशातील सर्व पुरुष राहुल यांच्या नजरेत अत्याचारी आहेत का, असा प्रश्नही इराणी यांनी संसदेबाहेर देखील पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला. त्याला सत्ताधारी पक्षाने तीव्र आक्षेप घेतला आहे. राहुल यांनी सभागृहालाच नव्हे देशाला वेदना दिल्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले.

राहुल यांनी गुरुवारी झारखंडमधील निवडणूक प्रचारसभेत 'मेक इन इंडिया' आता 'रेप इन इंडिया' झाले आहे, असे वक्तव्य केले होते. तत्पूर्वी, सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी २००१ मध्ये संसदेवरील हल्ल्यातील पीडितांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर कामकाज सुरू होताच निषेध आणि घोषणाबाजी सुरू झाली.

अधिवेशनात दोन्ही सभागृहांत १५ विधेयके पारित, यशस्वी कामकाज
संसदेचे हिवाळी अधिवेशन यंदा यशस्वी ठरल्याचे मानले जाते. दोन्ही सभागृहांत मिळून सरासरी १५ विधेयकांना या अधिवेशन काळात मंजुरी मिळाली. लोकसभेत एकूण १८ विधेयके मांडण्यात आली होती. त्यापैकी १४ तर राज्यसभेत १५ विधेयके पारित झाली. संपूर्ण हिवाळी अधिवेशनाच्या कामाच्या दृष्टीने उत्पादकतेचा विचार केल्यास लोकसभेत यंदा ११६ टक्के काम झाले, तर राज्यसभेत हेच प्रमाण ९९ टक्के राहिले. संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी शुक्रवारी पत्रकारांना याबद्दल माहिती दिली.

बातम्या आणखी आहेत...