लोकसभा रिपोर्ट कार्ड / लोकसभा रिपोर्ट कार्ड : प्रश्न विचारणाऱ्या अव्वल दहा खासदारांमध्ये आठ महाराष्ट्राचे; सुप्रियांचे 1181 प्रश्न, उदयनराजेंचे शून्य 

प्रतिनिधी

Feb 15,2019 08:38:00 AM IST

औरंगाबाद- सोळाव्या लोकसभेचे शेवटचे अधिवेशन बुधवारी संपले. लोकसभेत ५ वर्षांतील खासदारांची सक्रियता व त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची आकडेवारी 'पीआरएस लेजिस्लेटिव्ह रिसर्च' वेब पोर्टलने नुकतीच जारी केली आहे. या रिपोर्ट कार्डनुसार सोळाव्या लोकसभेत पाच वर्षांत प्रश्न विचारणाऱ्या देशभरातील टॉप-१० खासदारांपैकी एकट्या महाराष्ट्राचे ८ खासदार आहेत. देशातील ९३ टक्के खासदारांनी १.४२ लाखांपेक्षा जास्त प्रश्न विचारले. सर्वाधिक प्रश्न शेतकरी आत्महत्यांवर विचारण्यात आले.

राष्ट्रवादी : सुप्रियाच टॉपर
राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांनी ११८१ प्रश्न विचारले. त्यांची उपस्थिती ९६% होती. ६५ चर्चांत सहभागी होत त्यांनी २२ खासगी विधेयके मांडली. विजयसिंह मोहिते पाटील यांनी ११३४ प्रश्न विचारले. त्यांची हजेरी ६२% होती. धनंजय महाडिक यांनीही ११७० प्रश्न विचारत ६५ चर्चांत सहभाग नोंदवला. त्यांनी ३ खासगी विधेयके आणली. त्यांची उपस्थिती ७२ टक्क इतकी होती.

काँग्रेस : खा. सातव दमदार
नांदेडचे खासदार अशोक चव्हाण यांची उपस्थिती ४२% इतकीच होती. त्यांनी ९०३ प्रश्न विचारले. ९ चर्चांत सहभागी झाले. खासगी विधेयक आणले नाही. हिंगोलीचे खासदार राजीव सातव यांची उपस्थिती ८१% राहिली. त्यांनी १११५ प्रश्न विचारले. तसेच २०५ चर्चांत सहभागी होत २३ खासगी विधेयकही मांडली.

उदयनराजे अखेर 'राजे'च
साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे संसदीय कामगिरीच्या बाबतीत महाराष्ट्रातील सर्वात कमकुवत खासदार ठरले आहेत. ५ वर्षांच्या टर्ममध्ये त्यांची लोकसभेतील उपस्थिती केवळ २७% इतकीच राहिली. या काळात एकही प्रश्न विचारला नाही, ना कोणत्या चर्चेत सहभाग घेतला. तसेच एकही खासगी विधेयक मांडले नाही.

सभागृहात ५ वर्षांत ९३% सदस्यांचे १.४२ लाखावर प्रश्न
हजेरी : गोपाळ शेट्टींची १००% हजेरी

लोकसभेत सर्वाधिक उपस्थित राहणाऱ्या राज्यातील खासदारांत अव्वल-५ मध्ये मुंबईतील भाजपचे गोपाळ शेट्टी (१००%) पहिल्या क्रमांकावर आहेत. यानंतर अरविंद सावंत, किरीट सोमय्या, सुप्रिया सुळे, सुनील गायकवाड यांचा क्रमांक आहे.

खासगी विधेयके : शेट्टीच अव्वल
लोकसभेत सर्वाधिक खासगी विधेयके आणणाऱ्या महाराष्ट्रातील खासदारांत गोपाळ शेट्टी (३२) हे पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यानंतर राजीव सातव (२३) आणि सुप्रिया सुळे (२२), श्रीरंग बारणे (२०) आणि चंद्रकांत खैरे (१६) यांचा क्रमांक आहे.

लोकसभेत सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्यांत टॉप-१० मध्ये पहिल्या क्रमांकावर सुप्रिया सुळे (११८१ प्रश्न) आहेत. यानंतर धनंजय महाडिक, विजयसिंह मोहिते पाटील, राजीव सातव, श्रीरंग बारणे, शिवाजी आढळराव पाटील, हिना गावित, आनंदराव अडसूळ यांचा क्रमांक आहे. चर्चांत सहभागी होणाऱ्या महाराष्ट्रातील खासदारांत श्रीरंग बारणे हे (२८९) हे प्रथम क्रमांकावर आहेत. यानंतर अरविंद सावंत व राहुल शेवाळे यांचा क्रमांक आहे.

X
COMMENT