आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युतीतील छोट्या मित्रपक्षांचा चौथ्या आघाडीचा इशारा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - युतीच्या जागावाटपात भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला आलेल्या पंचवीसपैकी किमान पंधरा उमेदवारांची पहिली यादी आगामी ४-५ दिवसांमध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीकडून जाहीर होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच भारतीय जनता पक्षाने  उमेदवार निवडीच्या प्रक्रियेला गती दिली असून उमेदवार निश्चितीसाठी सोमवारी मुंबईत राज्याच्या संसदीय समितीची बैठक कोणत्याही अंतिम निर्णयाविना पार पडली. मात्र, येत्या एक दोन दिवसांत उमेदवार निश्चितीसाठी याच संसदीय समितीची आणखी एक बैठक होणार असून या बैठकीत उमेदवारांची अंतिम यादी करून भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याचे समजते.


रविवारी सायंकाळी सतराव्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहिर झाल्यानंतर भाजपमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. सोमवारी दिवसभर मुंबई भाजपच्या दादर येथील वसंत स्मृती कार्यालयामध्ये पक्षातील विविध नेत्यांच्या बैठकांचे सत्र सुरू होते. सकाळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक प्रचार समितीची बैठक पार पडली. 


तीन टप्प्यांमध्ये झालेल्या बैठकीत सुरुवातीला राज्यातील भाजपच्या जिल्हाध्यक्षांशी चर्चा करण्यात आली. तर दुसऱ्या टप्प्यात शासकीय योजनांचे लाभ घेतलेल्या लाभार्थी प्रमुखांची आणि अखेरच्या टप्प्यात पक्षाच्या जिल्हा संघटन मंत्र्यांशी चर्चा करून राजकीय सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. या बैठका पार पडल्यानंतर दुपारच्या सत्रात राज्याच्या संसदीय समितीची बैठकही पार पडली. या बैठकीत भाजपच्या संभाव्य उमेदवारांच्या नावांवर चर्चा करण्यात आल्याचे समजते. 


शिवसेनेसोबतच्या युतीच्या जागावाटपात भाजपच्या वाट्याला पंचवीस जागा आल्या असून त्यापैकी किती जागा मित्र पक्षाला देण्यात याव्यात याबाबतही खल करण्यात आला. मात्र, या बैठकीत कोणताही निर्णय झाला नसून येत्या एक दोन दिवसांत संसदीय समितीची आणखी एक बैठक होणार आहे. त्या बैठकीत संभाव्य उमेदवारांची अंतिम यादी तयार करून ती भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याची माहिती भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने दिली. त्या यादीतील नावांवर अंतिम निर्णय घेऊन या आठवड्याच्या अखेरीस दिल्लीतून भाजपची राज्यातील उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात येणार आहे. पहिल्या यादीत अनेक विद्यमान खासदार आणि ज्यांच्या उमेदवारीला स्थानिक स्तरावर विरोध नाही अशा नावांची घोषणा होणार आहे. सोमवारी झालेल्या संसदीय समितीच्या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, सुभाष देशमुख, आशीष शेलार आणि सुजितसिंह ठाकूर हे नेते उपस्थित होते.


मित्रपक्षांना समाधानकारक जागा द्या : खोत, जानकर
येत्या आठवड्याभरात शिवसेना - भाजपने मित्र पक्षांना समाधानकारक जागा देण्याचा निर्णय जाहीर करावा, अन्यथा चौथी आघाडी स्थापन करण्याचे सुतोवाच राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर आणि रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी केले आहे. युतीतील सेना भाजपपुरता जागावाटपाचा तिढा सुटला असून मित्र पक्षांना किती जागा मिळणार याबाबत स्पष्टता होऊ न शकल्याने युतीतील मित्रपक्ष नाराज आहेत. सेना भाजपने आम्हा छोट्या पक्षांना गृहित धरू नये. आम्ही प्रत्येकी फक्त एक जागा मागत आहोत, आमच्या मागणीवर सकारात्मक विचार करून सेना भाजपने निर्णय घ्यावा असेही जानकर आणि खोत यांनी स्पष्ट केले आहे. दुसरीकडे आठवलेंनीही एका जागेची मागणी केली असल्याने सेना भाजपसमोरील अडचणी वाढल्याचे चित्र आहे.

बातम्या आणखी आहेत...