आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसची कोंडी : स्वाभिमानीचे राजू शेट्टी, आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचाही दणका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - विधानसभेचे विराेधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डाॅ. सुजय विखे यांनी अखेर मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा बहुचर्चित प्रवेश सोहळा पार पडला. दरम्यान, भाजपने सुजय यांच्या पक्षप्रवेशानंतर लगेच नगर लाेकसभा मतदारसंघातून त्यांची उमेदवारी जाहीर करत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला माेठा धक्का दिला. 


एकिकडे सुजय यांच्या भाजप प्रवेशाने काँग्रेसची नगरमध्ये कोंडी झालेली असताना वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी यांनीही काँग्रेसला साथ देण्यास नकार दिल्याने ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसची चहूबाजूंनी काेंडी झाली आहे. ‘आमच्या मागण्यांवर काेणताही सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने काँग्रेसशी चर्चेचे सर्व प्रस्ताव आता संपले आहेत. त्यामुळे ४८ मतदारसंघांत १५ मार्चला वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जाहीर केले जातील,’ अशी घाेषणा अॅड. आंबेडकर यांनी केली. दुसरीकडे, ३ जागांचा प्रस्ताव बुधवारपर्यंत मान्य न केल्यास माढ्यासह १५ मतदारसंघांत उमेदवार जाहीर करू, असा इशारा खा. शेट्टींनी काँग्रेस आघाडीला दिला.


विखे गटाचा उपद्रव 
नगरची जागा राष्ट्रवादीने प्रतिष्ठेची करत स्वत:कडे ठेवली असली तरी आता सुजय विखेंच्या भाजप प्रवेशामुळे आघाडीचा विजय अवघड मानला जाताे. सुजय यांचे वडील राधाकृष्ण विखे पाटील व त्यांचे समर्थक राष्ट्रवादीच्या उमेदवाराला कितपत साथ देतील याविषयी शंका उपस्थित हाेत आहेत.


वंचित बहुजन आघाडी 
दलित व मुस्लिम ही काँग्रेसची पारंपरिक व्हाेट बँक. यंदा प्रकाश आंबेडकर व एमआयएमने एकत्र येत या व्हाेट बँकेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काँग्रेस नेते धास्तावले आहेत. वारंवार आघाडीचा प्रस्ताव देऊनही आंबेडकरांनी प्रतिसाद न दिल्याने दलित, मुस्लिमबहुल क्षेत्रात तिहेरी लढत झाल्यास युतीला लाभ.


स्वाभिमानी संघटना
खा. राजू शेट्टी यांनी काँग्रेस आघाडीकडे ३ जागांची मागणी केली हाेती. मात्र केवळ २ जागा देण्यास आघाडी तयार आहे. माेदी सरकारच्या धाेरणांविराेधात शेट्टींनी आवाज उठवल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी वर्ग शेट्टींच्या मागे आहे.  त्यांनी स्वतंत्र जागा लढवल्यास किमान १५ मतदारसंघांत तरी आघाडीच्या मतांचे विभाजन हाेऊन युतीला लाभ हाेईल.


राजीनामा नाहीच : विखे
सुजय यांच्या भाजप प्रवेशानंतर राधाकृष्ण विखे यांची काँग्रेसमध्ये कोंडी होऊ शकते. विखे पाटील विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देणार अशीही चर्चा आहे. मात्र ‘राजीनामा देण्याचा काेणताही विचार नाही,’ अशी प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे यांनी दिली.


सुजयचा हट्ट मी कसा पुरवू
सुजय विखे पाटील हे काही राज्यस्तरावरील मोठे नेते नाहीत. त्यामुळे त्यांचा उमेदवारीचा हट्ट पुरवण्याची जबाबदारी माझी नव्हे तर त्यांच्या वडिलांचीच आहे. मी फार तर माझ्या घरातल्या मुलांचा हट्ट पुरवू शकतो, असा सणसणीत टोला शरद पवार यांनी लगावला आहे.

बातम्या आणखी आहेत...