आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोळंके, पंडित, आडसकर, मुंडे, क्षीरसागर घराण्यांचा पन्नास वर्षांपासून बीडच्या राजकारणात दबदबा!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड जिल्ह्यातील राजकारणावर मागील ५० वर्षांत पंडित, सोळंके, आडसकर, क्षीरसागर, मुंडे  या पाच बड्या घराण्यांचा दबदबा राहिला आहे. दांडगा जनसंपर्क, साखर कारखाने, शिक्षण संस्था, स्थानिक स्वराज्य संस्थांवरील वर्चस्व, स्थानिकांना आपल्या संस्थांतून मिळवून दिलेल्या नोकऱ्या अशा कारणांमुळेच या बड्या घराण्यांचा बीड जिल्ह्याच्या राजकारणात दबदबा राहिला. 


या पाचही घराण्यांकडे कधी कधी सत्ता राहिली तर कधी सत्तेपासून दूर राहूनही  ते राजकारणात टिकून राहिले. निवडणुकीतील पराभवाने ही घराणी  कधी खचली नाहीत. या नेत्यांनी आजवर नाती गोती जपली. पंरतु आता मुंडे आणि क्षीरसागर घराण्यांत अलीकडच्या काळात काका - पुतण्याचा संघर्ष पाहावयास मिळत आहे .  


एकेकाळी कम्युनिस्टांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणारा बीडचा लोकसभा मतदार काही काळ काँग्रेसकडे झुकला. त्यानंतर मात्र  बीड लोकसभेत चार टर्मपासून  भाजपच्या माथी गुलाल लागत आहे.   मात्र बीडने अनेकदा सत्तांतरेही पाहिली आहेत. या लोकसभा निवडणुकीत मतदारांचा कौल कोणते घराणे मिळवणार, हे पाहणे तेवढेच रंजक ठरणार आहे. 


कधी सत्तेत तर कधी सत्तेपासून दूर, तरीही जनसामान्यांशी नाळ जोडत नातीगोतीही जपली
गोपीनाथराव मुंडे : आणीबाणीत तुरुंगवास भोगल्यानंतर वंजारी समाजाचे केले नेतृत्व
अंबाजोगाईत काॅलेजमध्ये असताना गोपीनाथ मुंडे यांची प्रमोद महाजन व जयसिंग गायकवाड यांच्याशी मैत्री झाली.  गोपीनाथराव यांचा प्रमोद महाजन यांची बहिणी प्रज्ञाताई यांच्याशी प्रेमविवाह झाल्याने मैत्रीचा हा धागा आणखी मजबूत झाला. महाजनांमुळे मुंडे आधी संघ व नंतर भाजपच्या जवळ गेले. आणीबाणीत १८ महिने कारावास भाेगणारे मुंडे पुढे राजकारणात सक्रिय होत  वंजारी समाजाचे नेतृत्व करू लागले. त्यांचे प्रश्न लावून धरल्याने मुंडेंची ही व्होट बँक झाली. परळीत वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना उभा करत मुंडेंनी राज्यातील तेरा सहकारी साखर कारखाने चालवले.  आजारी कारखाने चालवायला घेतले.  परळीतून धनंजय मुंडे यांना विधानसभेची उमेदवारी डावलल्याने काका गोपीनाथराव व पुतणे धनंजय यांच्यात सत्ता संघर्ष होऊन धनंजय हे राष्ट्रवादीत गेले. सध्या कन्या पंकजा मुंडे या ग्रामविकास मंत्री तर दुसरी कन्या डॉ. प्रीतम मुंडे या बीडच्या खासदारआहेत. 


केशरकाकू क्षीरसागर : ग्रामपंचायतींसह बीड पालिकेवर वर्चस्व सिद्ध करत खासदारकी
बीड तालुक्यातील नवगणराजुरी ग्रामपंचायतच्या सरपंच म्हणून राजकारणात सक्रिय झालेल्या केशरकाकू यांनी सुरुवातीला पंचायत समिती सभापती, त्यानंतर आमदार झाल्या. राजुरीत गजानन सहकारी साखर कारखाना उभा करणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या.  चौसाळा मतदार संघ व बीडवर त्यांनी वर्चस्व कायम ठेवले. प्राथमिक शाळा ते मेडिकल कॉलेज, सहकारी संस्था, बाजार समिती, खरेदी विक्री संघ, दूध संघ, नगर पालिका ,सूतगिरणी अशा संस्थांवर  आपली पकड मजबूत करत काकू जिल्ह्याच्या खासदार झाल्या.  सध्या जयदत्त क्षीरसागर हे राष्ट्रवादीचे आमदार, डॉ. भारतभूषण क्षीरसागर हे बीडचे नगराध्यक्ष तर रवींद्र क्षीरसागर हे गजानन कारखान्याचे अध्यक्ष आहेत. पालिका निवडणुकीत  भारतभूषण व पुतणे संदीप यांच्यात  संघर्ष होऊन दोघे वेगळे झाले.  संदीप हे बीड विधानसभेचे राकाँचे उमेदवार आहेत. जयदत्त यांना पक्षाकडून डावलले जात असल्याने ते भाजपच्या वाटेवर आहेत.


बाबूराव आडसकर :  आमदार ठरवण्याची ताकद असलेले बीड जिल्ह्यातील घराणे
बीड जिल्ह्यातील राजकारणातील हाबाडा फेम बाबूराव आडसकर  हे केज मतदार संघाचे लोकप्रिय आमदार होते. दांडगा जनसंपर्क, अस्सल ग्रामीण नेता म्हणून त्यांची ओळख होती. केज मतदार संघाचा आमदार कोण ठरवायचा ही ताकद या घराण्यात आहे. समाजवादी नेते माजी खा. बापूसाहेब काळदाते यांना विधानसभेत बाबूराव आडसकर यांनी पराभूत केले होते. जेंव्हा आडसकर मुंबईत गेले होते तेंव्हा त्यांना पाहण्यासाठी गर्दी झाली होती. पुढे केज मतदार संघ आरक्षित झाल्यामुळे या मतदार संघात दिवंगत मंत्री विमल मुंदडा यांचे वर्चस्व वाढत गेले. बाबूराव आडसकरांचे पुत्र रमेश यांनी वडिलांचा  वारसा घेत जि. प.च्या सत्तेत दबदबा निर्माण केला. पत्नी अर्चना  यांना उपाध्यक्षपद मिळवून दिले. २००९ च्या  लोकसभेत रमेश आडसकर यांनी गोपीनाथ मुंडे यांना कडवे आव्हान दिले होते.आज आडसकर भाजपत आहेत. माजलगाव विधानसभेसाठी भाजपकडून त्यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे.


शिवाजीराव पंडित  : ग्रामीण भागातील संपर्कामुळे स्वतंत्र अस्तित्व
गेवराईत ग्रामीण भागात सुरुवातीपासूनच आपला संपर्क वाढवून शिवाजीराव पंडित यांनी आपले स्वातंत्र अस्तित्व निर्माण केले होते. शरद पवारांनी त्यांना साथ दिल्याने पंडित मंत्री झाले.  पुढे  त्यांचे चुलत बंधू बदामराव यांनी त्यांना आव्हान दिल्याने काही काळ बदामराव आमदार राहिले. पंडितांचे व्याही  लक्ष्मण पवार हे गेवराईचे भाजपचे आमदार असून मागील निवडणुकीत अमरसिंह यांचा त्यांनी पराभव केला होता. आता अमरसिंह  लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत तर बंधू  विजयसिंह  गेवराई विधानसभेसाठी राष्ट्रवादीकडून तर काका बदामराव शिवसेनकडून रिंगणात उतरणार आहेत. 


सुंदरराव सोळंके : राजकारण आणि सहकार क्षेत्रात वेगळा ठसा
बीड जि. प.चे पहिले अध्यक्ष राहिलले सुंदरराव सोळंके हे एकाच वेळी केज व माजलगाव मतदार संघातून आमदार म्हणून विजयी झाले होते. पुढे राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले होते. त्यांच्याच काळात  माजलगावचा प्रकल्प उभारला गेला. सोळंके यांनी तेलगाव येथे साखर कारखाना उभारून सहकारात पाऊल टाकले. प्रकाश सोळंके हे राष्ट्रवादीत आमदार होऊन मंत्री झाले तर धैर्यशील सोळंके हे बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष राहिले. आता प्रकाश सोळंके हे माजलगाव मतदार संघातून राष्ट्रवादीकडून विधानसभेसाठी लढणार आहेत. 

बातम्या आणखी आहेत...