Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | loksabha election ravikant tupkar from madha sharad pawar

माढ्यातून पवारांविरुद्ध ‘स्वाभिमानी’चे तुपकर? वेळापुरात घाईघाईने मेळाव्याचे आयोजन, तुपकरांचीही उपस्थिती

प्रतिनिधी | Update - Feb 26, 2019, 08:40 AM IST

अपमानास्पद तडजोड कदापि स्वीकारणार नाही : तुपकर

 • loksabha election ravikant tupkar from madha sharad pawar

  सोलापूर - काँग्रेस व राष्ट्रवादीची स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी जागावाटपाची तडजोड अजूनही लटकलेलीच आहे. दोन दिवस यशस्वी बोलणी झाल्याचा दावा दोन्ही बाजूंचे नेते करत असले तरी दुसरीकडे तुपकरांनी माढ्यातून पवारांच्या विरोधात लढण्याची तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसवर दबावतंत्र म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अतिशय घाईघाईत माढा मतदारसंघातील वेळापूर येथे एल्गार मेळाव्याचे आयाेजन केले असून त्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर उपस्थित राहणार आहेत. शरद पवार यांची माढ्यातून निवडणूक लढवण्याच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानीशी तडजोड हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. एकीकडे तडजोडीची बोलणी सुरू असली तरी दुसरीकडे एल्गार परिषदेचे आयाेजन, अशी दुहेरी रणनीती स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चालवली आहे. माढ्यातून शरद पवार यांच्या विरोधात रविकांत तुपकर लढण्याची चिन्हे आहेत.


  त्या दृष्टीनेच घाईतल्या एल्गार मेळाव्यासाठी तुपकरांची उपस्थिती ही महत्त्वपूर्ण आहे. गेले दोन दिवस राष्ट्रवादी काँग्रेसशी जागा वाटपाबाबतची बोलणी सुरू आहे. वाटाघाटीच्या या अगोदरच्या फेरीत तुपकर व अजित पवार, धनंजय मुंडे, जयंत पाटील यांच्यात चर्चा झाली. तर, सोमवारी राष्ट्रवादीच्याच निमंत्रणावरून तुपकर यांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यावेळी जितेंद्र आव्हाडही उपस्थित होते. विशेष म्हणजे रविवाारी व मंगळवारी झालेल्या बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राजू शेट्टी उपस्थित नव्हते. त्यांच्या गैरहजेरीतच दोन दिवसांची बोलणी झाली. त्यामुळेच त्यांच्या गैरहजेरीत झालेली बोलणी, ही एक फक्त औपचारिकताच आहे की काय? अशी शंका जाणकारांनी व्यक्त केली. तडजोडीबाबतचा अंतिम निर्णय २८ फेब्रुवारी रोजी पुण्यात होणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकारिणीमध्ये होईल.


  बुलडाणा अन्् वर्धा...
  राजू शेट्टी मागत असलेल्या तीन जागांपैकी बुलडाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा तर वर्ध्यामध्ये काँग्रेसचा खासदार आहे. बुलडाण्याची जागा हाच कळीचा मुद्दा ठरत असून, त्यावरूनच स्वाभिमानीशी आघाडी होणार किंवा नाही, हे ठरेल. सोमवारच्या वाटाघाटीसंदर्भात पवार म्हणाले, ‘स्वाभिमानी शेतकरी संघटना ही आघाडीसोबत राहणे महत्त्वाचे आहे. ते विरोधात गेल्यास आघाडीचे नुकसान व भाजपचा फायदा होईल. बुलडाण्याच्या जागेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसलाच निर्णय करावा लागेल. वर्ध्याची जागा काँग्रेसची आहे. ती स्वाभिमानीसाठी सोडण्याबाबत आपण काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी बोलू.’ माढा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे व कार्यकर्त्यांचे या तडजोडीकडे लक्ष लागले आहे. शरद पवार यांच्या उमेदवारीच्या दृष्टीने मत विभागणी टाळण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी तडजोड होणे महत्त्वाचे मानले जात आहे.


  ... तीन जागा, वर दोन मागण्याही
  या पार्श्वभूमीवर स्वाभिमानीच्या पुण्यातील कार्यकारिणीकडे लक्ष लागून आहे. तीन जागांच्या मागणीव्यतिरिक्त स्वाभिमानी दोन मागण्यांबाबत आग्रही आहे. आघाडी सत्तेत आल्यास शेतमालास दीडपट हमीभाव व संपूर्ण कर्जमुक्ती ही राजू शेट्टी यांची दोन विधेयके मंजूर झाली पाहिजेत. शिवाय आघाडीच्या निवडणूक जाहीरनाम्यात या दोन्ही मुद्द्यांचा समावेश केला हवा, अशा या मागण्या आहेत.


  अपमानास्पद तडजोड कदापि स्वीकारणार नाही : तुपकर
  तुपकर यांनी सांगितले, ‘अपमानास्पद तडजोड स्वीकारणार नाही. गरज त्यांना आहे. सत्तेत त्यांना यायचे आहे. अन्यथा आम्ही विरोधात असतोच. त्याची सवयही आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीशी तडजोड म्हणून हातकणंगले, बुलडाणा व वर्धा या तीन जागा मिळाल्यास आघाडीमध्ये सामील व्हायला आम्ही तयार आहोत, अन्यथा आमची ९ उमेदवारांची यादी तयार आहे. आणखी चार जागांवर उमेदवार उभे करण्याची तयारी सुरू आहे.

Trending