आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाषाण खदानीच्या पाण्यावर ठिबक करून वकिलांनी जगवली दीर्घायुषी झाडे; डोंगराळ, झुडपे असलेल्या भीती वाटणाऱ्या जागेचे सुशोभीकरण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना  - जालना न्यायालयाचा पाठीमागचा हा परिसर अनेक दिवसांपासून ओसाड होता. खोलपर्यंत खदान, डोंगराळ भाग, काट्या कुपाट्या यामुळे या भागात जाणेही धोकादायक होते. दरम्यान, वकील संघाने पुढाकार घेऊन लोकसहभागातून प्रत्येकी ५०० रुपये गोळा करून निधी गोळा केला. यातून विविध जातींची दीर्घायुषी एक एकर परिसरात ५५ झाडे लावली. या परिसरातील खदानीतील पाणी वाया जात होते. पाषाण असलेल्या या खदानीत विद्युत पंप टाकून त्या पाण्यावर ठिबक सिंचन करून झाडांना पाणी दिले जात आहे. संवर्धनासाठी मोती तलावातून सहा टिप्पर गाळ आणून त्यावर लागवड केली. 


आता ही झाडे चांगली मोठी होत असल्याने सुशोभीकरणात भर पडली. खदानीच्या काठावरच असलेल्या हॉटेलमध्ये चहा घेण्यासाठी आलेल्या तणावग्रस्त व्यक्तींचे काही प्रमाणात का होईना मन प्रसन्न ठेवण्यासाठी मदत होत आहे. कोर्ट कचेरी म्हटले की, ताण, तणाव आलाच. शिवाय अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली प्रकरणांमुळे प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या तणावाखाली असतो. अनेकांना वारंवार कोर्टाच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात.  कोर्टाच्या समोरील भागात बरेचशे सुशाेभीकरण केले आहे. नागरिकांसाठीही चांगली जागा केली आहे. परंतु, कोर्टामागचा परिसर  सामसुम  होता.   जंगल, डांेंगर, खदान यामुळे या परिसरात कुणीच जात नव्हते.   
  शासकीय विभाग, सामाजिक संस्था, मंडळे पुढाकार घेऊन त्यांच्या परीने लागवड करत आहेत. याचाच एक भाग म्हणून वकील संघानेही पुढाकार घेतला.  प्रत्येकी वकिलाने ५०० रुपये लोकसहभाग म्हणून दिले. या रकमेतून ५५ वृक्षांना ट्री गार्ड करण्यात आले. तसेच त्यांच्या संवर्धनासाठीही   ही रक्कम वापरली जात आहे. 


झाडांच्या संवर्धनासाठी बाजूलाच असलेल्या खदानीतील पाण्यात मोटार टाकून त्या झाडांना ठिबक केले. या उपक्रमासाठी प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीपाद टेकाळे, सुनील वेदपाठक यांच्या मार्गदर्शनाखाली वकील संघाचे अध्यक्ष अॅड. लक्ष्मण उढाण, अॅड. दिनेश भाेजने, अॅड. भूषण तवरावाला, अॅड. अंकुश लकडे, अॅड. प्रशांत लाखे, अॅड. सचिन खटकळ, अॅड. सोपान शेजूळ, अॅड. डी. के. कुलकर्णी, अॅड. सुरेश कुलकर्णी, अॅड. बलवंत नाईक, अॅड. गोपाल मोरे, अॅड. शैलेश देशमुख, अॅड. विलास भुतेकर, अॅड. गजानन घुले, अॅड. बाळासाहेब भुतेकर, अॅड. उमर परसुवाले, अॅड. संजय चाटे, अॅड. भगवान वीर, अॅड. लक्ष्मण गायकवाड, अॅड. महेश वाघुंडे, अॅड. मयूर ढवळे आदींनी पुढाकार घेतला आहे.  
 

 

या वृक्षांची केली लागवड 
जालना न्यायालयाच्या पाठीमागच्या परिसरात लिंब, पिंपळ, वड, जांभूळ, चिंच, उंबर या दीर्घायुषी वृक्षांसह तप्तपर्णी, गुलमोहर आदी सुशोभीकरण वाढवणाऱ्या वृक्षांची लागवड केली आहे. या झाडांमुळे हा परिसर रमणीय ठरत आहे. तसेच या परिसरात मोठी खदान आहे. या खदानीत पाणी, त्याला लागूनच असलेल्या हॉटेलमुळे हा परिसर पर्यटनासारखा ठरत आहे. 


वकिलांचे श्रमदान महत्त्वाचे
झाडे जगवण्यासाठी जेसीबीने खड्डे खोदले. यानंतर मोती तलावातून गाळ आणून या भागात वृक्षांची लागवड झाली आहे. यात वकिलांनी श्रमदान करून ही लागवड केली. आगामी काळात सर्व झाडे जगवून हा परिसर सुशोभित करणार आहे. 
अॅड. लक्ष्मण उढाण, अध्यक्ष, वकील संघ, जालना.