आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजीची ताटातूट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रेल्वेने परळी ते परभणी प्रवासासाठी डब्यात शिरलो. तेथे जेमतेम प्रवासी होते. माझ्या समोरच्या बाजूला एक 10-11 वर्षांची मुलगी सारखी रडत असताना दिसली. आजूबाजूला असलेल्या महिलांनी तिची प्रेमाने विचारपूस केली. त्या तिला समजावण्याचा प्रयत्न करू लागल्यावर ती अधिकच रडू लागली. काहीबाही कारणे सांगत असावी. तिच्यासोबत असलेल्या तिच्या काकाला ‘मला परभणीला जायचे नाही. तेथे कशाला नेताय? अंबाजोगाईला आजीकडे सोडा,’ असे सतत म्हणत होती. सोबत असलेला मुलगा तरुण होता. तो तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत होता. त्यामुळे शेजारी बसलेल्या महिलांना वेगळाच संशय आला. परंतु अधिक माहिती घेण्याचे कोणी धाडस करत नव्हते. मुलीची अस्वस्थता पाहून एका महिलेला राहवले नाही. त्यांनी मला त्या मुलीची माहिती जाणून घेण्याची विनंती केली. काही वेळाने तो मुलगा बाजूच्या कंपार्टमेंटमध्ये गेल्याची संधी साधून मी त्या मुलीला जवळ बोलावले. तिच्याकडून माहिती जाणून घेतली. मला असे समजले की, तिची आई लहानपणीच वारली होती. वडिलांनी दुसरे लग्न केले होते. सावत्र आई व वडिलांचेही तिला प्रेम मिळत नव्हते. वेळेवर धड जेवणही नाही, अशी बिकट परिस्थिती तिच्यावर ओढवलेली होती. लहानपणापासून तिचा सांभाळ तिच्या अंबाजोगाईच्या आजीने केलेला होता. त्यामुळे तिला आजीचा खूप लळा लागलेला होता. तिला परभणीला वडिलांकडे अजिबात राहायचे नव्हते. तिच्या मनाच्या विरुद्ध ही सगळी कामे चालली होती. आजीकडून जबरदस्तीने तिला नेण्यात येत होते. तिच्यावर होणार्‍या अत्याचाराच्या घटनेचे डब्यातील महिलांनाही वाईट वाटत होते. मी कशीबशी तिची समजूत घातली. तिच्या आजीशी संपर्क साधून तिच्याशी बोलणे करून दिले. सोबतच्या मुलास (काकास) योग्य शब्दात समज दिली. एवढ्या लहानवयात त्या मुलीच्या मनात बापाबद्दल असलेला तिरस्कार आणि आजीच्या पे्रमाला पारखे होण्याचा प्रसंग बरेच काही सांगून जातो.