यशोगाथा / डोळे गमावले; पण प्रेमानेच पोलादाची छाती दिली! पहिल्या दिव्यांग आयर्नमॅन निकेतची डोळस प्रेमकथा

निकेत आज प्रेमाच्या बळावरच देशातील पहिला तर जगातील पाचवा दिव्यांग आयर्नमॅन ठरला

दिव्य मराठी

Feb 14,2020 07:34:00 AM IST

एकनाथ पाठक

औरंगाबाद - “लव्ह अॅट फर्स्ट साइट’च्या खूप कथा तुम्ही ऐकल्या असतील. पण ही कथा आहे “लव्ह विथ नो साइट’ची. देशातील पहिला आणि जगातील पाचवा दिव्यांग आयर्नमॅन ठरलेला निकेत दलाल आणि त्याची बालमैत्रीण पल्लवी यांच्या “डोळस’ प्रेमाची. प्रेमात आंधळं होणं ही म्हणच फिकी पडावी असं यांचं नातं.


दुसरीत असताना सायकलचा स्पोक लागला आणि निकेतच्या एका डोळ्याची दृष्टी गेली. पुढे दुसऱ्या डोळ्याला ल्युकेमियानं ग्रासलं आणि भविष्यातील अंधाराची जाणीव झाली. पण याच वाटेवर निकेतच्या आयुष्यात पल्लवीची पालवी फुलली. नववीतील पल्लवीनं दहावीतल्या निकेतला ‘प्रपोज’ केलं आणि भविष्यात दृष्टी जाणार याची कल्पना असूनही प्रेमाच्या प्रकाशमान प्रवासाची दोघांनी निवड केली. प्रेमाच्या नात्यात शिरताना आयुष्याच्या सुखदु:खात साथ देण्याच्या आणाभाका सगळेच घेतात, पण त्या निभावण्याची ताकद असलेले विरळ. निकेत आणि पल्लवीच्या डोळस प्रेमकहाणीने आयुष्यातील सुखदु:खांच्या साऱ्या सीमा अोलांडून असाध्यावर बाजी मारली आहे. बालपणीच्या अतूट मैत्रीतून फुललेली ही प्रेमकहाणी सोपी नव्हती. जात, राजकीय विचार, सामाजिक स्तर साऱ्या मोजपट्ट्यांवर यांच्या प्रेमाला दोन्ही घरांमधून विरोध झाला. भविष्यात दृष्टी जाऊ शकते या धोक्याची शक्यता हे या विरोधामागील महत्त्वाचे कारण होते. पण त्या साऱ्याला न जुमानता “हम साथ साथ है’ म्हणत त्यांच्यातील प्रेम फुलतच गेलं आणि एका अनपेक्षित क्षणी लग्नाच्या बेडीतही अडकलं. अर्थात लग्नाची ही बेडी दोघांचे प्रेमळ बंध अधिकच दृढ करणारी ठरली. प्रत्येकाचे करिअर, संसार आणि चिलया नावाचा दहा वर्षांचा चिमुरडा असा प्रवास करीत त्यांच्या प्रेमानं अनेक असाध्य गोष्टी साध्य केल्या आहेत.


साईट गेली, व्हीजन नाही! :

दिसेनासं झाल्यावर मला ही जाणीव झाली की आपली साईट गेली आहे, व्हीजन नाही. त्यामुळेच मी अर्थपूर्ण जगू शकलो. हे सारं शक्य झालं पल्लवीच्या प्रेमामुळेच. दृष्टी जाणार याची कल्पना असल्याने मी आधी लग्नाला तयार नव्हतो, पण पल्लवीच्या प्रेमाची ताकदच एवढी होती की ती मागे हटलीच नाही

प्रेमाच्या बळावरच ठरला आयर्नमॅन


निकेत आज प्रेमाच्या बळावरच देशातील पहिला तर जगातील पाचवा दिव्यांग आयर्नमॅन ठरला. दुबईतील स्पर्धेत निकेतने स्विमिंग, सायकलिंग आणि रनिंग हा अवघड प्रवास ७ तास ४४ मिनिटे ७ सेकंदांत पार करून अभिमानास्पद राष्ट्रीय विक्रम केला आहे.

दुसऱ्यांदा सुरू केला संसार : पल्लवी

उमेदीच्या काळात दृष्टी गमावणे हे खूप वेदनादायी होतं. निकेतपेक्षा माझ्यासाठी अधिक आव्हानात्मक. निकेत नेहमी म्हणतो, “आय लॉस्ट माय साइट, नॉट व्हिजन.’ या त्याच्या विचारानं मलाही ती ताकद दिली. खरं तर दृष्टी गेल्यावर आमच्या दुसऱ्या संसाराला सुरुवात झाली. तो खडतर होता, पण तेवढाच अधिक प्रेमळ ठरला.

X