आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गॅसचा स्फोट; चिमुकल्या भावंडांचा होरपळून मृत्यू, आजीसोबत आई गेली होती मजुरीला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोणार  - गॅसचा स्फोट हाेऊन घराला लागलेल्या आगीत चिमुकल्या बहिणी-भावाचा जळून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी दुपारी दोन वाजता बुलडाणा जिल्ह्यातील पिंपळखुटा येथे घडली. या आगीत दोन घरे जळून खाक झाली असून संसारोपयोगी वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, दोन चिमुकल्यांच्या हृदयद्रावक मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


लोणार शहरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या पिंपळखुटा येथे सत्यभामाबाई प्रकाश घनवट ही महिला वास्तव्यास आहे. गेल्या पाच वर्षांपासून तिची मुलगी प्रेरणा माधव रसाळ हीसुद्धा आपल्या दोन चिमुकल्यांसाेबत  येथे राहत आहे. सोमवारी सकाळी दोघी मायलेकी नेहमीप्रमाणे मोलमजुरी करण्यासाठी शेतात गेल्या होत्या, तर प्रेरणा रसाळ यांचा ७ वर्षीय मुलगा ज्ञानेश्वर माधव रसाळ व ५ वर्षांची मुलगी काजल रसाळ हे दोघे भाऊ- बहीण घरात खेळत होते. दुपारी २ वाजेच्या सुमारास अचानक घरातील गॅसचा स्फोट झाल्यामुळे घराला आग लागली. मोठा आवाज आल्याने शेजाऱ्यांनी घराकडे धाव घेतली. काही  जणांनी पाण्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग आटोक्यात येत नव्हती. त्यानंतर लोणार येथील अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. मात्र, आग  विझवेपर्यंत दोन्ही चिमुकल्यांचा अक्षरश: कोळसा झाला होता. दरम्यान, दोन्ही मुलांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आहे.


संसारोपयोगी साहित्य जळून खाक
या आगीत घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे.  घटनेची माहिती मिळताच पथकासह नागरिकांनी पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळवले. परंतु तोपर्यंत दोन्ही चिमुकली मुले व घरातील साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. या घटनेची माहिती मिळताच नायब तहसीलदार हेमंत पाटील, सहायक गटविकास अधिकारी रवींद्र मापारी तलाठी व  मंडळ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर नुकसानग्रस्त महिलेस मदत जाहीर केली.

बातम्या आणखी आहेत...