आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहशतवाद्यांकडून दक्षिण भाग, सरक्रीक खाडीतून हल्ल्याची शक्यता : एस.के. सैनी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - भारत- पाकिस्तान सीमारेषेवरील गुजरातजवळील ९६ किलाेमीटरचा सरक्रीक येथील खाडी प्रदेशाबाबत भारत आणि पाकिस्तानमध्ये अद्याप सीमा निश्चिती झाली नाही. या ठिकाणाहून तसेच दक्षिण भागातून दहशतवादी हल्ला करू शकतात, अशी गुप्तचरांकडून माहिती मिळाली आहे. या भागात सुरक्षेच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत, अशी माहिती लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल एस.के.सैनी यांनी सोमवारी दिली. सैनी म्हणाले, सरक्रीक भागात सोडून देण्यात आलेल्या काही बोटी सापडल्या आहेत. लष्कर याबाबत तपास करत आहे. सरक्रीक भागातील दहशतवादी हल्ल्याचा धोका लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून त्या भागातील लष्करी क्षमता वाढवण्यात आली आहे. सरक्रीक संदर्भातील सीमावाद संपुष्टात येण्यासाठी दाेन्ही देशादरम्यान अनेक बैठका झाल्या असून अद्याप त्यावर अंतिम ताेडगा निघाला नाही. दक्षिण भारताच्या भूभागावर दहशतवादी हल्ला होऊ शकतो. याअनुषंगाने सुरक्षा उपाययोजना केल्या जात आहेत. शत्रुराष्ट्र किंवा दहशतवादी संघटना यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा हल्ला झाल्यास त्यांना समर्थपणे तोंड देण्यास आम्ही सक्षम आहोत. तशा प्रकारची अधिकची तयारी आम्ही करत असून शत्रूला यशस्वी हाेऊ देणार नाही. काश्मीरमधील संघर्षाला काही अंतर्गत बाबी बरोबरच बाह्यशक्ती कारणीभूत आहे. काश्मीरबाबत भारताचे धोरण स्पष्ट आहे. या भागात होणाऱ्या संघर्षाला तोंड देण्याची तयारी केंद्र सरकारची आहे. तसेच काेणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी लष्कर पूर्णपणे तयार असल्याचे ते म्हणाले. दरियानी ट्रस्टकडून लष्कराला जमिनीची देणगी दक्षिण मुंबईचे समाजसेवक आणि राधा कलिंदस दरियानी ट्रस्टचे प्रमुख प्रेम दरियानी यांनी पुन्हा एकदा त्यांच्या मालकीची कान्हे येथील जमीन सैन्याला देण्यास पुढाकार घेतला आहे. या जमिनीवर महाराष्ट्रातील प्रथम आणि देशातील द्वितीय आर्मी लॉ महाविद्यालयाचा विस्तार केला जाईल. आजवर ट्रस्टने लष्कराला एकूण ४० कोटी किमतीच्या जमिनीची देणगी दिली असून दरियानी ट्रस्ट ही देशातील लष्कराचा सर्वात मोठी देणगीदार बनला आहे.   

बातम्या आणखी आहेत...