inspiration from great / १९९८ मध्ये पहिला अल्बम झाला प्रदर्शित, २०१७ मध्ये ‘डेस्पसिटो’ मुळे मिळाली आंतरराष्ट्रीय ओळख; जाणून घ्या गायक लुई फोन्सीविषयी

एक कलाकार म्हणून सतत शिकत राहणे फार महत्त्वाचे असते - लुई फोन्सी

दिव्य मराठी

Jun 30,2019 12:16:40 PM IST

> नाव- लुई फोन्सी

> व्यवसाय- गायक, लेखक आणि अभिनेता

> एकूण संपत्ती- ११० कोटी रुपये

फाेन्सीबाबत यासाठी हे वाचा- स्पॅनिश गाणे ‘डेस्पसिटो’चा गायक आहे.

लुई फोन्सी केवळ एका गाण्यामुळे जगात लोकप्रिय झालेला गायक अाहे. लुईने गायलेले स्पॅनिश गाणे ‘डेस्पसिटो’ यूट्यूबवर सर्वात जास्त हिट्स मिळालेले गाणे होय. १२ जानेवारी २०१७ रोजी हे गाणे यूट्यूबवर प्रथम प्रदर्शित झाले. पाहता पाहता हे गाणे इतके लोकप्रिय झाले की, जगातील सर्व भाषांत हे गाणे भाषांतरित केले गेले. या गाण्यासाठी लुई फोन्सीने चार लॅटिन अॅवॉर्डस मिळविले. ही एक असाधारण बाब होय. रॅप गायक डॅडी येंकीसमवेत हे गाणे तयार केले गेले.


लुई फोन्सीचा जन्म १५ एप्रिल १९७८ रोजी सॅन जुएन, पोर्तोरिको येथे झाला. वडिलांचे नाव अल्फोन्सो रॉड्रिग्ज आणि आईचे नाव डेलिया आहे. त्यांना एक लहान भाऊ आणि बहीणही आहे. लुईला लहानपणापासूनच संगीताची आवड होती. ते ‘मेन्युडो’ नावाच्या बँडसोबत गातही होते. येथूनच त्यांच्या गायन कारकिर्दीला सुरुवात झाली. आपले स्वप्न साकार करण्यासाठी ते ‘सॅन जुएन चिल्ड्रन्स कॉयर’मध्ये सामील झाले. तेथे फक्त सहा वर्षाच्या मुलांनाच प्रवेश होता. हायस्कूलमध्ये शिकताना त्यांनी ‘बिग गाइज’नाचा ग्रुप जॉइन केला. हा ग्रुप स्थानिक कार्यक्रम आणि शाळेतील पार्ट्यांंमध्ये गायनाचे कार्यक्रम करत असे.


अशा प्रकारे लहानपणापासूनच गायकांच्या ग्रुपमध्ये कार्यक्रम सादर करण्याची सवय झाल्याने गर्दीची भीती तेव्हापासूनच वाटेनाशी झाली. यातूनच त्यांना संगीत शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळाली. या मदतीतूनच त्यांनी फ्लोरिडा स्टेट विद्यापीठात प्रवेश घेतला. शिक्षण घेतानाच अनेक देशांमध्ये गायनाचे कार्यक्रम करण्याची संधी मिळाली. लवकरच त्यांना म्युझिक रेकॉर्डिंग कंपनी ‘युनिव्हर्सल म्युझिक लॅटिन’ ने करारबद्ध केले.


१९९८ साली त्यांचा पहिला अल्बम ‘कॉमनजेर’ रिलीज झाला. हा अल्बम बराच प्रसिद्ध झाला आणि बिलबोर्डच्या लॅटिन अल्बम चार्टवर तो अकराव्या क्रमांकावर राहिला. २००० मध्ये लुई यांचा पुढचा अल्बम रिलीज झाला. ‘एटर्नो’ हे त्याचे नाव. यानंतर ‘अमॉर सीक्रिटो’, ‘फाइट द फीलिंग’, ‘अब्रेजर ला विडा’, ‘पासो अ पासो’ आणि ‘८’ असे अल्बम रिलीज झाले. ९-११ च्या हल्ल्यात मारले गेलेल्या लोकांसाठी त्यांनी व्हाइट हाउसमध्येही गाणे म्हटले. २००८ मध्ये आलेले ‘नो मी डॉय पोर वेन्सीडो’ हे गाणेही बरेच लोक्रपिय झाले. या गाण्याला ‘लॅटिन साँग ऑफ द डेकेड’ असे म्हटले जाते. २००९ मध्ये लुई ला ‘एकुई एस्टॉय यो’ साठी लॅटिन ग्रॅमी अवॉर्डही मिळाले. पण त्यांना आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी मिळाली ती २०१७ मध्ये आलेल्या ‘डेस्पसिटो’ गाण्याने.


तसे हे गाणे २०१६ मध्येच रेकॉर्ड केले गेले होते. पण १२ जानेवारी २०१७ साली प्रदर्शित करण्यात आले. हे गाणे १९९६ नंतर बिलबोर्डच्या चार्टवर पहिल्या शंभरात आलेले गाणे होते. या अगोदर स्पॅनिश गाणे ‘माकारीना’ला हा मान मिळाला होता. ‘डेस्पसिटो’ रिलीज झाल्यानंतर जस्टिन बीबरने १७ एप्रिल २०१७ रोजी याचे रीमिक्स रूप सादर केले. यालाही पहिल्या २४ तासांतच यूट्यूबवर दोन कोटीपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले होते.

लुईपासून मिळालेली शिकवण...
> या विभागलेल्या जगात संगीतच आम्हाला जोडते.
> एक कलाकार म्हणून सतत शिकत राहणे फार महत्त्वाचे असते.
> तुम्ही प्रत्येक कामात हळूहळू प्रगती करता.

X