आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माॅब लिंचिंग : ४९ मान्यवरांचे मोदींना पत्र; म्हणाले- ‘जय श्रीराम’ हिंसाचार भडकावण्याचा नारा झालाय, हत्या रोखण्याची केली मागणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - माॅब लिंचिंग म्हणजेच समूहाच्या हातून हाेणाऱ्या हिंसाचाराच्या घटनांना विराेध करत चित्रपट, साहित्यासह इतर क्षेत्रांतील ४९ नामांकित व्यक्तींनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना पत्र लिहिले आहे. त्यात ‘जय श्रीराम’ हा हिंसाचार भडकावणारा नारा बनल्याचे सांगून या नावावरून अनेक जणांची बेदम मारहाण करून हत्या करण्यात आल्याचे संबंधितांनी म्हटलेय. २३ जुलै राेजी लिहिलेल्या या पत्रावर चित्रपट निर्माते-दिग्दर्शक श्याम बेनेगल, मणिरत्नम, अनुराग कश्यप, अभिनेत्री काेंकणा सेन-शर्मा, अपर्णा सेन, साैमित्र चटर्जी व इतिहासकार रामचंद्र गुहा आदी मान्यवर व्यक्तींच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

लाेकशाही ही असहमतीशिवाय असू शकत नाही; परंतु देशात सध्या असहमतीला पायदळी तुडवले जात असून असा प्रकार लाेकशाहीसाठी घातक आहे. देशात असे वातावरण तयार केले जाऊ नये. या मुद्द्यावर पंतप्रधानांनी केवळ दु:ख व्यक्त किंवा टीका करणे पुरेसे नाही, तर ठाेस कारवाई झाली पाहिजे. देशात हल्ली घडणाऱ्या माॅब लिंचिंगनी चिंता वाढवली आहे. घटनेनुसार सर्व नागरिक समान आहेत. त्यामुळे माॅब लिंचिंगच्या माध्यमातून दलित, मुस्लिम आदी नागरिकांवर हाेणाऱ्या हल्ल्यांच्या घटना राेखल्या पाहिजेत. 

एनसीआरबीनुसार २०१६ मध्ये दलितांवर अत्याचाराच्या ८४० घटना घडल्या हाेत्या. तसेच २००९ ते २०१८ दरम्यान धर्माच्या आेळखीवरून घडलेल्या २५४ गुन्हेगारी घटनांत ९१ जणांची हत्या केली गेली हाेती व सुमारे ५७९ जण जखमी झाले हाेते. त्यातील ६२ % घटनांत मुस्लिमांना लक्ष्य बनवण्यात आले. ‘जय श्रीराम’ जयघाेषामुळे कायदा-सुव्यवस्था धाेक्यात येत आहे. त्यामुळे सरकारने याप्रकरणी कठाेर पावले उचलावीत व माॅब लिंचिंगविराेधात आवाज उठवणाऱ्यांना राष्ट्रद्राेही किंवा शहरी नक्षलवादी ठरवण्यात येऊ नये, असेही या पत्रात वरील मान्यवरांनी नमूद केले आहे. 


नक्वींनी आरोप फेटाळला, म्हणाले - देशात दलित, मुस्लिम सर्व नागरिक सुरक्षित
देशात असे काेणतेही वातावरण नसून दलित व अल्पसंख्याक वर्गातील नागरिक सुरक्षित असल्याचे अल्पसंख्याक प्रकरणांचे केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटलेय. माॅब लिंचिंगबाबतचे सर्व आराेप फेटाळून लावत नक्वी म्हणाले की,लाेकसभा निवडणुकीत पराभूत झालेले व त्यातून बाहेर न निघालेले लाेकच अशा घटनांचे सांप्रदायिकीकरण करत आहेत. कारण २०१४ च्या निवडणुकीदरम्यानही अवाॅर्ड वापसीच्या नावावर असे प्रकार दिसले हाेते.