Maha Janadesh / मुख्यमंत्र्यांच्या सोलापूर दौऱ्यापूर्वी माढ्यातील शेतकरी ताब्यात, काळे झेंडे दाखवण्याचा दिला होता इशारा

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वीच माढ्यातील आंदोलक शेतकरी पोलिसांच्या ताब्यात

Sep 01,2019 12:11:00 PM IST

माढा (सोलापूर) - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महा जनादेश यात्रेचा समारोप कार्यक्रम रविवारी सोलापुरात आयोजित करण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर माढा तालुक्यातील आंदोलक शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिला होता. परंतु, मुख्यमंत्री येण्यापूर्वी सुरक्षिततेचा उपाय म्हणून त्या सर्वांना वेठीस धरण्यात आले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, सोलापुरात या समारोपाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थिती लावणार आहेत.


सिना माढा उपसा सिंचन योजनेचे पाणी 31 ऑगस्टपर्यंत माढा, कुर्डू व मोडनिंब भागापर्यंत यावे. अन्यथा एक सप्टेंबरला सोलापुरात येणाऱ्या मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवू असा इशारा या शेतकऱ्यांनी दिला होता. त्याच प्रकरणात पोलिस निरीक्षक भगवान खारतोडे यांच्या नेतृत्वाखालील टीमने वरिष्ठांच्या आदेशानंतर शेतकऱ्यांना ताब्यात घेतले. तसेच त्यांना कॅबिनमध्ये बसवण्यात आले आहे. सीना माढा योजनेच्या पाणी वितरणाचा प्रश्न अनेक दिवसांपासून चिघळतच चाललेला आहे. माढ्यातील शेतकरी या योजनेचे पाणी टेल भागापर्यत येण्यासाठी सातत्याने संघर्ष करत आहेत.


शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 26 ऑगस्टला तहसीलदार राजेश चव्हाण यांनी शेतकरी आणि अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत शेतकऱ्यांनी योजनेचे अभियंता नारायण आल्हाट यांना तहसीलदाराच्या समक्ष हा इशारा दिला होता. बळीराजा शेतकरी संघटनेचे संजय पाटील घाटणेकर यांच्यासह अन्य शेतकऱ्यांचा पोलिस तपास करत आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या इतर शेतकऱ्यांमध्ये शरद भांगे, पोपट भांगे, बापू जाधव, शंभू साठे, प्रकाश कदम, बापू भांगे, अशोक राऊत, शरद वारगड, समाधान राऊत, सुहास राऊत, अमजद कोरबू आणि भीमराव भांगे यांचा समावेश आहे.

X