Magazine / कबीरांपासून कबीरसिंग पर्यंत...

साहेब पिक्चर लई भारी बनवलाय, पण आम्हास्नी जरा खटकलाच

माधव जायभाये

Jul 09,2019 12:06:00 AM IST

प्रिय सदीप वंगा साहेब,
तुमचा नवा पिक्चर लई सुपरहिट होतोय त्याबद्दल तुमचं अभिनंदन. लई लोकांकडून तुमच्या पिक्चरबद्दल ऐकलं होतं. म्हणून म्या पण गेलो बघाया. साहेब पिक्चर लई भारी बनवलाय, पण आम्हास्नी जरा खटकलाच. साहेब, माफ करा, तुमच्या त्या मेट्रो शहरातल्या लोकास्नी लई आवडंल बी पिक्चर, पण माझ्यासारख्या गावाकडच्या माणसाला नाही आवडलं राव. थेटरात सगळे तरुण पोरंपोरीच होते बघायला. पण मधात असे काही सीन आले की कोणी एकमेकांकडं बघायला तयार नव्हतं. एवढंच नाही तर मधी जी इंटरवल झाली त्यात मी जागंवरून उठलो पण नाही. कारण लाइटीच्या उजेडात ओळखीपाळखीचं कोणी आपल्याला बघंन अन् त्यो आपल्याबद्दल काय इचार करील म्हणून तोंड झाकून बसूनच राहिलो बुवा.


तुमचा त्यो हीरोनी सगळ्या पिक्चरभर ट्रक भरून तरी सिगारेटी ओढल्या असतील. अन् किमान एक टेम्पो भरून दारूच्या बाटल्या संपिवल्या अस्तिन. पण आम्ही मात्र पोरांना आयुष्यभर व्यसनापासून दूर राहायला शिकवलंय. साहेब, ती तुमची नटी दिसायला लई सुंदर होती, पण त्या हीरोनी पहिल्याच भेटीत तिची पप्पी घेतली तरी ती काहीच बोलली नाही. तिच्या जागंवर आमच्या गावाकडची एखादी पोरगी असती ना तर ‘कानफाड’ फोडलं असतं त्याचं... पुन्हा आयुष्यभर कोण्या पोरीच्या गालाकडं त्याचं ताँड गेलं नसतं. त्या हीरोला सगळ्या बायांचं फक्त शरीरच दिसायचं हो.पण शरीराकडं जाण्याचा मार्ग बाईच्या मनातून जातो हे नाही सांगितलं तुम्ही आम्हाला. किती सर्किट दाखवला आहे राव तुमचा तो ‘कबीर’..इतका सर्किटपना व्यवहारात नाही चालत राव. लई मार खाईल त्यो. आम्ही मात्र आमच्या पोरांना रागावर नियंत्रण कसं मिळवायचं हे शिकवितो. सगळं कॉलेज जणू काही त्याच्या बापाची जहागीरदारी आहे असं वागतो तो. असं कुठं असतंय होय? साहेब बिनलग्नाची ते दोघं एका खोलीत झोपतात, सगळंच करतात. आमची महान भारतीय संस्कृती असं कधीच शिकवीत नाही. साहेब त्या हीरोचा प्रेमभंग झाला म्हणून एवढा वाया गेला.

आमच्या गावात नव्वद टक्के प्रेम करणारांचे प्रेमभंग होतात. तुमचा पिचर पाहून जर सगळे वाया गेले तर गावाचं कसं होईल? किती दारूच्या बाटल्या अन् किती सिगारेट लागतील? साहेब, हे पत्र लिव्हायचं एकच कारण हाई. नाही म्हणलं तरी आपण कोणताही पिचर बघितला तर त्यातून आपण काहीना काही घेतोच अन् तरुण पोरांवर तर त्याचा लई प्रभाव पडतो. साहेब, आम्ही पोरांना व्यसनापासून दूर राहायला शिकवतो. तुम्ही मात्र सगळं व्यसनच दाखवलं. आम्ही लहानपणापासून लेकरांची लई काळजी घेतो राव. आम्ही त्यांच्यापुढे संत कबीरांचा आदर्श ठेवतो राव, पण तुम्ही मात्र वेगळाच कबीर दाखवला. एक फॅमिली आपल्या तरुण मुलगा आनी मुलीला पिचर पाहायला घेऊन आली होती. जाताना त्या आईवडिलांचा चेहरा पाहून गहिवरून आलं साहेब...


चूकभूल माफ असावी.
आपलाच,
गावाकडच्या शाळेतील एक मास्तर

X
COMMENT