आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तळ्यातल्या वेलींचा विळखा जणू

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अतूट स्नेहानं बांधलेली दोन मनं कितीही दूर असली तरी एकमेकांच्या जवळच असतात. प्रत्यक्ष कडकडून भेटण्याचा आनंद त्यांच्या नशिबी क्वचित येतो. आणि म्हणूनच पत्रांमधून होणारी शब्दभेट आणि त्यातून जागवल्या जाणाऱ्या आठवणी यांचं मोल अशा नात्यांमध्ये काही औरच असतं. आजच्या पत्रात बालपणीच्या फुलपंखी दिवसांतल्या स्नेहसंमेलनाच्या जागवलेल्या आठवणींची उजळणी...

 

प्रिय अव्वा,
तुझं पत्र आलं त्या दिवशी मी घरीच होते, याचा मला सर्वाधिक आनंद झाला. पत्र आलं तेव्हा तासभर तरी मी ते पाकीट उलटसुलट करून नुसतीच बघत बसले. आणि सावकाश दुपारी ते फाडून मग पत्र वाचायला घेतलं. आणि मला आठवलं की, ही आता दहा दिवसांपूर्वी आपली तब्बल अडीच मिनिटं धावती भेट झाली आणि त्या ओझरत्या भेटीची रुखरुख मनात असताना पत्रातून तू सविस्तर आणि नेमकी सापडलीस!


तू म्हणतेयस त्याप्रमाणे मला पत्रोत्तराला तसाही उशीरच झाला आहे. म्हणजे आता तूही त्या लग्नाच्या धावपळीतून मोकळी झाली असशीलच. अगं, आमच्याकडे स्नेहसंमेलन होतं. स्नेहसंमेलन म्हणजे आठ दिवस आधी आणि आठ दिवस नंतर असा संमेलनपूर्व आणि संमेलनोत्तर फीव्हर असतो. आणि मधल्या मध्ये संमेलनाच्या दिवसांत तर तो ज्वर अगदी शिगेला पोहोचलेला असतो. सबंध वर्षभरात गाजलेली तमाम गाणी याच काळात ऐकायला मिळतात. शिवाय जे बिचारे कधीच वर्गात बोलत नाहीत, अशा मुलांचे सुप्त गुण कळू लागतात. मुख्य म्हणजे आषाढी-कार्तिकीला वर्गात उगवणारी मंडळी संमेलनकाळात अगदी रोजच उपस्थित असतात. त्या निमित्ताने त्यांचं दर्शन झालं. रागावणार नसतेच मी, कारण या काळात उत्साहाची कारंजी अगदी उसळून नाचत असतात. 


त्या सर्व गडबडीत तुला पत्र लिहिणं मला जमलं नाही. पण तरीही तेवढ्या तीनचार दिवसांनी मन अगदी भूतकाळात गेलं गं. तुझ्या पत्रात तू लिहिलंस ना फोटोबद्दल, ते सगळे जुने फोटो आणि आपले स्नेहसंमेलन दिवस आठवले. तसा फार फरक पडला नाही बरं. आजही गोऱ्या आणि लांब केसांच्या (आणि जिच्या घरी लाल काठाची पांढरी साडी असेल) तिलाच भारतमाता बनवतात! भारतमाता लांब केसांची आणि गोरीच होती हे कुठे लिहिलंय? आणि जर तसाच विचार केला तर भारतभूमीला माता म्हटलंय ना? मग ती माती तर काळी असते! आपल्या ‘आमची माती आमची माणसं’ कार्यक्रमात गायचे नाही का? “ही काळी आई, धनधान्य देई...” मग तरीही भारतमातेला गोरी गोरी पान, फुलासारखी छान करण्यात काय अर्थ तो मला आजही कळला नाही. तो मी कधी विचारलाही नाही. आम्ही आपले कायमच केस लहान असल्याने कोळी नृत्यातदेखील त्रिकोणी लुंगी नेसून मुलगाच झालो. आम्हाला ना नववार, ना वेण्या, ना नथी! त्यातही आम्ही मागे. आमचा पाय कधी ठेक्यात पडला नाही, समोरच्या मुली नाचतात तसं पाहून नाचायचं. नृत्यात आपण फक्त “कोरम” पूर्ण करायला आहोत हे तेव्हाही समजलं होतं गं! 


पण आता काळ इतका बदलूनदेखील या गोष्टी बदलल्या नाहीतच. म्हणूनच ना अव्वा, मला स्नेहसंमेलनात त्या मुलामुलींबद्दल खूप आत्मीयता वाटते, ज्यांची वेणी सुटते, ज्यांना पुढल्या स्टेप्स आठवत नाही, ज्यांची नथ पडते आणि जे मागेच राहतात. त्यांच्यात स्वत:ला पाहिल्यासारखं वाटू लागतं!


पण माझ्या मनात आहेतच या गोष्टी, एक दिवस तरी मी सावळ्या, छोट्या केसांच्या मुलीला भारतमाता करणार! तिला भुईच्या रंगाची सुंदर साडी नेसवणार, तिच्या हनुवटीवर गोंदण रेखणार आणि ती आशीर्वाद मुद्रेत नाही तर हसरी, मोकळी दाखवणार! 


एखाद्या नृत्यात बॉबकटवाल्या मुलीला सर्वात पुढे मुलीची भूमिकाच देणार आणि कोणत्याच सावळ्या, काळ्या, उंच मुलीला कृत्रिम मिशा काढून मुलगा हो म्हणणार नाही. आता तर असं झालंय की, मुलींना हे सांगावं पण लागत नाही. त्या आपोआपच आपल्या भूमिका मनातून ठरवून स्वीकारतातदेखील.


ते सोड! 


त्या दिवशी किती घाईत भेटलीस? याला काय भेट म्हणतात का? पण तू किती गोड दिसत होतीस आव्वे!


मला पौषातल्या गव्हाच्या खिरीचीच आठवण झाली तुला पाहून. त्या दिवशी तुझ्या साडीवरची फुलं आणि त्या सुंदर एकात एक गुंतलेल्या वेली पाहून मला ना माझ्या लहानपणाच्या तळ्याची आठवण झाली. आणि तेव्हा मी मुद्दाम तुझ्या जवळ येऊन उभारले. तुलाही तसाच ओलसर, हिरवा गंध येतोय का बघायला. 


त्या सगळ्या सुंदर पाणवेली आणि त्याच्या भोवती कमळं फुललेली असलं ते आमचं म्याड तळं! आणि तुला माहितेय का? पाण्यात पोहायला उतरल्यावर त्या वेलींचा विळखा बसायचा! तुझं गारूड आहे ना माझ्यावर अगदी तसाच! मला माहितेय आता हे वाचून तू एकटीच हसत असशील. कदाचित स्वयंपाकघराच्या कट्ट्याला रेलून उभी असशील किंवा त्या खिडकीला  टेकून पत्र वाचत असशील. 


तुझं पत्र वाचताना मला एक लक्षात आलं की, तुझं अक्षर किती बदललं आहे. एरवी ते किती वेगळं होतं. या वेळी घाईत लिहिलं नाहीय हे तर अगदी पहिल्या ‘श्री’वरूनच ओळखलं मी! म्हणजे चला तुला थोडा तरी निवांतपणा मिळाला तर. याचाच आनंद झाला.


या पत्रात तुला तिळगूळ पाठवायचा वाह्यातपणा करणार नाहीय. एकदा आठवतं ना? मी मारे कौतुकाने पत्रातच हलव्याचे दाणे घालून पाठवले आणि ते वितळून पत्रातली शाई विस्कटली, पसरली आणि पत्राचे बारा वाजले. आणि काय गं... तुला कितीही तिळगूळ दिला तरी द्यायच्या त्या शिव्या तू मला देणारच, घालायचे ते धपाटे (शाब्दिक जास्त) तू घालणारच. विनाकारणच गोग्गोड बोलत बसणारी तू नाहीयेस. त्यामुळे बायो, आहेस तशीच राहा माझ्यासाठी, हेच काय ते सांगायचं!


बाकी माझा यंदाचा तिळगूळ बिघडला हेही एक कारण आहे. ते स्पष्टच सांगून देते.
तुझ्या उत्तराची वाट  बघते.


तुझी मनी.


ता.क. – तू मला मागे एकदा वारली प्रिंट असलेलं एक सुरेख फोल्डर दिलं होतंस आठवतं? त्यात तुझी पत्रं जपून ठेवणार आहे! हां हां मला माहितेय तुला इजाजत आठवला आहे. ‘इस में तो तुम्हारे गहने थे...” महेंद्र म्हणतो. मग सुधा म्हणते, “हां, मैंने अपने निकाल कर तुम्हारे रख दिये.” हो ना?


भेट गं एकदा. आणि खूप सविस्तर, ऐसपैस भेट!


 

बातम्या आणखी आहेत...