Home | Magazine | Madhurima | madhavi bhat writes about beauty beauty parlour

पार्लरमधल्या ‘सुंदर’ गप्पा

माधवी भट | Update - Mar 12, 2019, 10:49 AM IST

प्रिय मने तुझ्या पत्राचीच वाट बघत होते. काल दुपारी नाही आलं तेव्हा मी तुला चार शिव्या दिल्या आणि मनात म्हटलं देखील की झा

 • madhavi bhat writes about beauty beauty parlour

  प्रिय मने
  तुझ्या पत्राचीच वाट बघत होते. काल दुपारी नाही आलं तेव्हा मी तुला चार शिव्या दिल्या आणि मनात म्हटलं देखील की झालं, हिचा उल्हास संपला! आरंभशूर आहेस तू हे काय मला माहिती नाही का? त्यामुळे आता काही तू पत्र लिहिणार नाहीस हे समजून आज मी तावातावात पार्लरमध्ये गेले. भुवया कोरायच्या राहिल्या होत्या. एक तर माझी नेहमीची पार्लरवाली कुठल्याशा लग्नाचा मेकप करायला वरातीसोबत गेली होती त्यामुळे अशा वेळी आपल्याकडे जी आकस्मिक पार्लरवाली असते तिच्याकडे गेले. तर तिच्याकडेही रांग होती. मग उन्हात फिरण्यापेक्षा मी तिथंच वाट बघत राहायचं ठरवलं. पार्लरमध्ये हल्ली गाणी वाजवतात. या पार्लरात मंद आवाजात नक्की काय सुरू होतं ते समजलं नाही. माझी पार्लरवाली बरी आहे, अगदी जग उलट्याचं सुलट जरी झालं तरी फक्त विविधभारती सुरू असतं. त्यामुळे ओळखीच्या आणि आवडत्या गाण्यावर अहाहा... म्हणता येतं. इथं मला गाणंच ऐकू येत नव्हतं. त्यात आणि पुन्हा माझ्यासोबतच वाट बघणाऱ्या दोन बायका तिथं पसरवून ठेवलेली खास “बायकांची” मासिकं वाचत होत्या आणि त्यातलं काय काय एकमेकींना दाखवून फिदीफिदी हसत होत्या.


  मला अशा वेळी ना तुझी फार आठवण येते. म्हणजे त्या इजाहीन मासिकात लपवून दाखवण्यासारखं काय असतं? त्यातही असं चावट हसण्यासारखं? फालतू “ताईवाहिनीचा सल्ला“ छाप सदर आणि त्यात विचारलेले तितकेच भयानक प्रश्न! “वहिनी, माझं अमकीवर प्रेम आहे पण ती तमक्यावर प्रेम करते पण तो जो तमका आहे तो प्रेम नाही टाइमपास करतोय. हे हिला समजत नाही. आता मी काय करू?” या प्रश्नावर आपण काय उत्तर दिलं असतं? आणि ती सदर चालवणारी वहिनी काय बोलते? पडताळा कर आणि मग आपण बोलू. तू असतीस तर तू लिहिलं असतंस, “अबे भैताडा, सोड ना तिला. जिला साधी चालबाजी समजत नाही अशा मठ्ठ मुलीसाठी झुरण्यात काय अर्थ आहे साल्या?” हो ना? मला ना तेव्हा तुझी आठवण येऊन असं फिस्सकन हसू आलं गं. शप्पथ सांगते! पण सदरात दिलं असतं – “जमेल तेव्हा प्रयत्न करून तिला सत्य सांगण्याचा प्रयत्न करावा आणि आपले प्रेम व्यक्त करावे.” आता हे तरी बरंच सौम्य आहे. पण याखेरीज त्यात इतकं काय काय लिहून असतं की, आपल्याकडच्या स्त्रिया स्वत:चे नेमके कसले कसले बॅकलॉग ही मासिकं वाचून भरून काढत असतील, त्याचा विचार करून मला खूप करुण वाटू लागलं यार! मनात आलं खरंच असे प्रश्न विचारायला पत्र पाठवत असतील का लोक? माणसं अनेक प्रकारचे गुंते सोडवत असतातच आपापल्या आयुष्यात, पण खरंच ते प्रश्न जाहीरपणे सांगत असतील की तो मासिकवाल्यांचाच एक स्टंट असतो? पण एक मात्र खरं की, आपल्याकडे बहुतेक स्त्रिया ही मासिकं वाचतात. दुपारी तर हमखास!


  आता तू म्हणशील की मला कसं माहीत? तर उत्तर साधं सोप्पं आणि सरळ आहे की, मी पण ती कधी काळी वाचली आहेत. कॉलेजात असताना वगैरे भयंकर लाट होती याची! म्हणजे सोबतच्या मुली एखादी फॅशन किंवा पदार्थाची रेसिपी या नावाने ते घेऊन त्यातलं काय काय वाचायच्या हे मलाही माहितेय. पण लवकरच ते बोअर वाटू लागतं! त्यामुळे मन रमत नाही. मग माझा नंबर आला आणि खुर्चीत जाऊन बसले तर पार्लर कन्यका आणि त्या दोन बायका यांचं आजकालची लग्ने आणि त्याभोवतीच्या इतर गोष्टींवर चर्चा सुरू झाल्या. त्यातही एकदोन आचरट वाक्ये ऐकू आलीतच. मला फार काही नवल वाटलं नाही. कारण बायका फार मोकळ्या बोलतील अशा मोजक्या जागांत पार्लर ही एक महत्त्वाची जागा आहे. तिथून निघाल्यावर मात्र मला तुझी प्रचंड आठवण येऊ लागली आणि मी मनातच ठरवलं की, आज जर तुझं पत्र आलं नसेल तर तुला फोन करून खूप झापायचं आणि भांडण करायचं. पण तसं झालं नाही.


  घरी आले आणि तुझं पत्र टीपॉयवर हसताना दिसलं. मग मी चहा करून घेतला आणि निवांत वाचत बसले. खूप शांत वाटलं. आणि माझ्या त्या दहा मिनिटांच्या रागाचा विचार करताना जाणवलं की, आजूबाजूला चार मैत्रिणी खुदुखुदू हसताना बोलताना दिसल्या की, आपल्याला एकुटवाणं, अनाथ वाटू लागतं. आणि आपल्या मैत्रिणीची आठवण येऊ लागते.


  आता तू म्हणशील की, फोन का केला नाहीस तर ऐक, पत्राची वाट बघत होते ना? म्हणून फोन नाही केला. पण जर पत्र आलं नसतं तर केलाच असता की! तू पत्रात लिहिलेल्या रंगाचा विषय काय किंवा आज हा मासिकांचा विषय काय, विचार केलास तर जाणवेल की, ही एक माळ आहे. सलग! अनेक विषय ओवलेली. असं वाटून मला थकवाच आला गं. मी झोपलेच. जाग आली ती व्हॉट्सअॅपच्या पिंगने. मग सगळं आवरून तुला लिहायला बसले. सगळं लिहून झाल्यावर आता जरा शांत वाटू लागलंय!
  आपल्या भेटीचे सगळे प्लान्स एकतर फिसकटतात किंवा पोस्टपोन होतात. त्यामुळे आता आपण काहीच ठरवू नकोया!
  आणि हो, मी कूर्गला जातेय तिथून काही मागवायचं असेल तर जरूर सांग.
  थांबते.
  तुझी
  मी
  ता.क. – कूर्गला जातेयस तर साऊला निरोप सांग वगैरे रोमँटिक बोलू नकोस हा! कारण यावर माझं उत्तर आहे – “कभी कभी लागता है कि आपणच साऊ आहोत!” समजलं? तर तिथून तुझ्यासाठी कॉफी सीड्स आणीन. हे वचन!
  इजाजतच्या आठवणी नको ना काढत जाऊस, त्रास होतो! माज़ी को माज़ी ही रहने दो!


  माधवी भट, चंद्रपूर
  madhavpriya.bhat86@gmail.com

Trending